इंदूर - भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा स्पोटक फलंदाजीचे दर्शन घडवले. श्रीलंकेविरुद्ध इंदूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 लढतीत रोहितने चौकार-षटकारांची बरसात करत अवघ्या 35 चेंडूत शतकाला गवसणी घातली. त्याबरोबरच टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. आता आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील वेगवान शतकाचा विक्रम रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मीलरच्या नावे झाला आहे. तर टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळताना 30 चेंडूत शतक झळकावले होते.
श्रीलंकन गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला रोहित शर्मा 43 चेंडूत 10 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 118 धावा फटकावत माघारी परतला. मात्र तोपर्यंत त्याने टी-20मधील अनेक विक्रम उदध्वस्त केले होते.
दुसऱ्या टी-20 लढतीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर पहिल्या 3 षटकांत भारताच्या अवघ्या 18 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने मैदानावर वादळ आणले आणि या वादळात श्रीलंकेचे गोलंदाज पाल्यापाचोळ्यासारखे उडाले.
चौथ्या षटकात आपल्या फलंदाजीचा गिअर बदलणारा रोहित शर्मा लंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. चौकार षटकारांची मालिका लावणाऱ्या रोहितने संघाला नवव्याच षटकात शंभरीपार पोहोचवले. त्यादरम्यान रोहितने 35 चेंडूत शतकाला गवसणी घातली. यादरम्यान रोहितने लोकेश राहुलसमवेत सलामीसाठी 165 धावांची भागीदारी केली. अखेर तो 118 धावा काढून दुष्मंता चमिराची शिकार झाला. रोहित शर्माच्या 118 धावा ह्या कुठल्याही भारतीयाने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एका डावात फटकावलेल्या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत.
रोहित शर्माने रचलेले विक्रम
- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील संयुक्तरित्या सर्वात वेगवान शतक
- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा फटकावणारा भारताचा कर्णधार
- रोहितच्या ११८ धावा ह्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या फलंदाजाने एका डावाता फटकावलेल्या सर्वाधिक धावा
- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक १० षटकार ठोकणारा फलंदाज, याआधी एका डावात सर्वाधिक ७ षटकार युवराज सिंगने फटकावले होते.
-२३ चेंडूत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या रोहितने पुढच्या ५० धावा अवघ्या १२ चेंडूत फटकावल्या
- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन शकते फटकावणारा रोहित शर्मा भारताचा पहिला फलंदाज
Web Title: Rohit again superhit! Toss of 100 balls in 35 balls equaled the fastest century in Twenty20 history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.