विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १०२ तरुणांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:36 AM2018-12-26T06:36:52+5:302018-12-26T06:37:05+5:30

दक्षिण आशियातील बु्रनेई देशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १०२ पेक्षा जास्त तरुणांना ३० लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे.

 102 youths cheating with bait for jobs abroad | विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १०२ तरुणांची फसवणूक

विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १०२ तरुणांची फसवणूक

Next

नवी मुंबई : दक्षिण आशियातील बु्रनेई देशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १०२ पेक्षा जास्त तरुणांना ३० लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट पासपोर्ट व नियुक्तीपत्रेही जप्त केली आहेत.
मुकेश विजयनन पनीकर व जितेंद्र देवी सिंग ऊर्फ जयप्रकाश अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी जे. पी. इंटरप्रायझेस, इंजिनीअरिंग अँड सिव्हिल वर्क कन्सल्टंसी या नावाने बोगस कंपनी स्थापन केली होती. कामोठे सेक्टर २१ मधील वरद को-आॅप. हाउसिंग सोसायटीमध्ये कार्यालय सुरू केले होते. मुंबई, नवी मुंबई व देशभरातील तरुणांना दक्षिण आशियातील ब्रुनेई देशात नोकरी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. नोकरी लावण्यासाठी ५० हजार रुपये, वैद्यकीय तपासणीसाठी ४५०० रुपये व इतर गोष्टींसाठी पैसे उकळण्यात आले होते. २० डिसेंबरला ६० तरुणांना पैसे घेवून बोलावले होते. ३० लाख रुपये घेवून खोटी नियुक्तीपत्रे व पासपोर्ट देवून कार्यालय बंद करून पळून जाण्याचे नियोजन केले होते.
खंडणी विरोधी पथकाला याविषयी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार व त्यांच्या पथकाने कार्यालयावर धाड टाकून मुकेश व जितेंद्र या दोघांनाही अटक केली आहे. कार्यालयाची झडती घेतली असता तेथे १०२ उमेदवारांचे बनावट पासपोर्ट, उमेदवारांची दिशाभूल करण्यासाठी कार्यालयात लावलेली खोटी प्रमाणपत्रे, खोटे रबरी शिक्के, ९५ उमेदवारांचे ब्रुनेई देशात नोकरी लागल्याची प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तपास केला असता तरुणांकडून वैद्यकीय तपासणी व विदेशात पाठविण्यासाठी मोठी रक्कम वसूल केली असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुकेश पनीकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी मुंबई, झारखंड व इतर ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी अजूनही तरुणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. हे रॅकेट उघडकीस आणण्यामध्ये आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार,सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक योगेश वाघमारे व पथकाने मेहनत घेतली आहे.

‘तरुणांनी सावध राहावे’

विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. अशा कंपन्यांचे कार्यालय, त्यांची नोंदणी व सर्व माहिती तपासून पाहावी. कंपनी किती वर्षांपासून काम करत आहे. वारंवार कार्यालयांचे पत्ते बदलत आहेत का, याचीही तपासणी करावी व कोणाचेही व्यवहार संशयास्पद वाटल्यास तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 

Web Title:  102 youths cheating with bait for jobs abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.