मुंब्य्रात पावणे १६ लाखांच्या बनावट ७८८ नोटा जप्त; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 08:17 PM2019-03-30T20:17:41+5:302019-03-30T20:21:30+5:30
जाैनकुमार छुन्नुलाल (41), मोहम्मद दिलशाद शराजुद्दीन (26) आणि जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी (30) या त्रिकुटाला मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली.
ठाणे - पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेशातून मुंब्य्रात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेल्या जाैनकुमार छुन्नुलाल (41), मोहम्मद दिलशाद शराजुद्दीन (26) आणि जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी (30) या त्रिकुटाला मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. तसेच त्यांच्याकडून भारतीय चलनातील दोन हजार रु पायांच्या पावणे सोळा लाख रुपये किंमतीच्या 788 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्या त्रिकुटाला येत्या 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती ठाणे परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.
मुंब्य्रातील किस्मत कॉलनी परिसरात काहीजण बनावट नोटांसह येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक ए.टी.बडे यांना मिळाली होती.त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधूकर कड यांच्या पथकाने त्या परिसरात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या उत्तरप्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील जौन आणि मोहम्मद तसेच मुंब्य्रातील जावेद या तिघांना ताब्यात घेत, चौकशी केली असता छुन्नुलाल याच्या बॅगमध्ये कपडयात बांधलेल्या दोन हजार रपये किंमतीच्या 15 लाख 76 हजार रु पायांच्या 788 बनावट नोटा आढळल्यावर याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवी 489 (क), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 5 एप्रिलपर्यंत कोठडी मिळाली. त्यांनी त्या नोटा पश्चिम बंगाल येथून उत्तरप्रदेशात नेल्या होत्या. तेथून त्या महाराष्ट्रात चलनात आणण्यासाठी आले होते. तद्पूर्वीच त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर करत आहेत.