आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलगी आणि जावयाला पेटवलं; मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:25 PM2019-05-06T12:25:14+5:302019-05-06T16:27:52+5:30
मुलीच्या काका, मामाला अटक; वडील फरार
पुणे/अहमदनगर: आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडला. यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या पतीवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या मामा व काकाला अटक केली असून वडील फरार आहेत.
रूक्मिणी मंगेश रणसिंग (वय १९, रा. निघोज, ता. पारनेर) असे मृत मुलीचे नाव आहे. पती मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे जखमी आहेत. मंगेश व रूक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्यांचा आंतरजातीय विवाह होता. मंगेश हा निघोज येथे गवंडी काम करायचा. रूक्मिणीचे वडील, काका व मामा यांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे ‘एक ना एक दिवस त्यांचा काटा काढायचा’ असा या तिघांचा प्रयत्न होता. ते निमित्त अखेर त्यांना मिळाले. पती-पत्नीमध्ये स्वयंपाक करण्यावरून भांडण झाले होते. त्यामुळे रूक्मिणी माहेरी निघून गेली होती.
१ मे रोजी निघोज येथील वाघाचा वाडा येथे मंगेश हा रूक्मिणीला भेटण्यासाठी माहेरी घरी गेला होता. रूक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रूक्मिणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली. यावेळी रूक्मिणी मात्र मंगेश बरोबर जाण्यास निघाली. त्यावेळी वरील तिघांनी या पती-पत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. घराला बाहेरून कूलूप लावून निघून गेले. त्या दोघांचा आरडाओरड ऐकून शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले.
अधिक भाजल्यामुळे त्या दाम्पत्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीररित्या भाजलेल्या रूक्मिणीचा मृत्यू झाला. तत्पूर्वी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी मंगेश व रूक्मिणी यांचा जबाब शनिवारी (दि.४) घेतला आहे. त्यात या पती-पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला ही बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी मुलीचा मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले. रूक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हा फरार आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई श्रीनाथ गवळी व पोलीस तपास करीत आहेत.