आसिफ खान यांची हत्या करून मृतदेह पूर्णा नदी पात्रात फेकला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:00 PM2018-08-20T14:00:25+5:302018-08-20T14:06:21+5:30
आसिफ खान यांची हत्या करून त्यांचा मृतदेह पूर्णा नदी पात्रात फेकल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भारिप-बमसंचे नेते वाडेगावचे माजी सरपंच आसिफ खान मुस्तफा खान हे १६ आॅगस्टपासून बेपत्ता आहेत. त्यांची कार म्हैसांग परिसरात पूर्णा नदीच्या काठावर बेवारस मिळून आली. आसिफ खान यांची हत्या करून त्यांचा मृतदेह पूर्णा नदी पात्रात फेकल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
आसिफ खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून, पोलीस शोध घेत आहेत. त्यासंबंधी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे सोमवारी या घटनेचा उलगडा करण्याची शक्यता आहे.
भारिप-बमसंचे नेते आसिफ खान हे १६ आॅगस्ट रोजी रात्री बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा डॉ. सोहेल खान याने बाळापूर पोलीस ठाण्यात नोंदविली. त्याच्या तक्रारीनुसार त्याचे वडील आसिफ खान यांना वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ज्योती गणेशपुरे यांनी फोन करून मूर्तिजापूर येथील त्यांच्या बहिणीकडे बोलविले होते, असे नमूद केले आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत आसिफ खान यांना जीवे मारून त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पुलावरून पूर्णा नदीच्या पात्रामध्ये फेकून दिल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलिसांना मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आसिफ खान यांची एमएच 0१ सीए १३३९ क्रमांकाची कार शनिवारी म्हैसांग परिसरातील पूर्णा नदीच्या काठावर बेवारस स्थितीत आढळून आली होती. एवढेच नाही, तर कारच्या स्टेअरिंग आणि मागील सिटवर रक्ताचे थेंब पडलेले असल्याचे पोलिसांना दिसून आले.
यावरून आसिफ खान यांचा काही घातपात तर करण्यात आला नाही ना, असा पोलिसांना दाट संशय होता. पूर्णा नदीच्या काठावर पोलीस आसिफ खान यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.
प्रकरणाला महिलेच्या संबंधाची किनार?
वाशिम येथील जिल्हा परिषदेच्या माजी महिला अध्यक्षा गणेशपुरे यांनी आसिफ खान यांना बोलाविल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावरून सदर प्रकरणात महिलेच्या संबंधाची किनार असून, यातूनच हे प्रकरण घडल्याचे दिसत आहे. त्या दिशेने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस, बोरगाव मंजू पोलीस आणि बाळापूर पोलीस तपास करीत आहेत.
मित्राने केला होता परावृत्त करण्याचा प्रयत्न
आसिफ खान यांचे १६ आॅगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास मित्र सैयद परवेज यांच्यासोबत मोबाइल फोनवर बोलणे झाले. त्यावेळी आसिफ खान यांनी वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या बहिणीच्या घरी मूर्तिजापूरला जात असल्याचे सैयद परवेज यांना सांगितले होते. त्यावेळी सैयद परवेज यांनी त्यांना मूर्तिजापूर न जाण्यासाठी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला; परंतु आसिफ खान यांनी त्यांचे ऐकले नाही. पोलिसांनी सैयद परवेज यांचीसुद्धा चौकशी केली.
नदीपात्रात दुसऱ्या दिवशीही राबवली शोध मोहीम
बोरगाव मंजू : आसिफ खान यांची कार म्हैसांग येथील नदीपात्रात आढळल्यानंतर दुसºया दिवशीही पोलिसांनी शोध मोहीम राबवली. या मोहिमेत संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकानेही सहभाग घेतला. आसिफ खान यांची कार म्हैसाग शिवारात पूर्णा नदी पात्रानजीक शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांना आढळून आली होती. बोरगाव मंजूचे ठाणेदार विजय मगर यांनी कार जप्त केली. तसेच शनिवारी दिवसभर शोध मोहीम राबवली. यावेळी ठसे तज्ज्ञानांही पाचारण करण्यात आले होते. ठाणेदार विजय मगर यांच्यासह पोलिसांनी लाखपुरी, मूर्तिजापूर, म्हैसांग परिसर, पूर्णा नदी पात्र ठिकाणी शोध घेतला. पोलिसांना घातपाताचा संशय असल्याने रविवारी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने युद्ध पातळीवर नदीच्या पात्रात शोध मोहीम राबविली. मात्र, या पथकाला आसिफ खान यांचा शोध घेण्यात अपयश आले. दरम्यान, घटनास्थळाला रविवारी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, उप विभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, बोरगाव मंजूचे ठाणेदार विजय मगर, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी. के. आव्हाळे, बाळापूर ठाणेदार विनोद ठाकरे आदींनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, आसिफ खान यांना शोधण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजतापासून पूर्णा नदी पात्रात म्हैसांग येथून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात महेश साबळे, सुरज ठाकूर, महेश लकडे, ऋतिक सदाफळे यांनी कट्यारपर्यंत ही मोहीम राबवली. सायंकाळी अंधार झाल्याने मोहीम भयखेडजवळ परत येऊन थांबवण्यात आली. सोमवारी सकाळी ८ वाजतापासून पुन्हा मोहीम सुरू करण्यात येणार आहे.