वैभव राऊतच्या घरी पुन्हा एटीएसचे पथक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 03:52 PM2018-08-15T15:52:24+5:302018-08-15T21:03:09+5:30
आता नुकतेच एटीएसचे पथक नालासोपाऱ्यातून वैभवच्या घरून निघाले असून त्याच्या घराच्या मागच्या बाजूस उभी असलेली इंनोवा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
मुंबई - मागच्या शुक्रवारी नालासोपाऱ्यात भंडारअळी गावातून वैभव राऊत आणि शरद कळसकर यांच्या घरात धाड घालत दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दोघांना अटक केली होती. त्यानंतर पुण्यातून अटक केलेला आरोपी सुधन्वा आणि वैभवच्या घरी एटीएसने पुन्हा सोमवारी धाड घातली. यावेळी एटीएसने वैभवच्या घरातून आठ पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि शस्रांचे अनेक सुटे भाग हस्तगत केले. त्याशिवाय दुसरा आरोपी सुधन्वा गोंधळेकर हा टेक्निकल एक्सपर्ट असल्याची माहिती समोर आली आहे. सुधन्वाच्या घरातून एटीएसने ६ हार्ड डिस्क, लॅपटाॅप, नऊ मोबाईल, अनेक सीमकार्ड जप्त केले असून एक कार आणि मोटारसायकलही जप्त केली होती. याआधी एटीएसने सुधन्वाच्या घरातून शस्त्रसाठा जप्त केला होता. इतका शस्त्रसाठा कशासाठी या दोघांनी केला होता याबाबत एटीएसने कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान एटीएसचे पथक तिसऱ्यांदा पुन्हा आज दुपारी वैभव राऊतच्या घरी धडकले होते. आज दुपारी ३ वाजता एटीएसने अचानक एसआरपी व लोकल पोलिसांना सोबत घेत वैभवला त्याच्या भंडारआळीतील त्याच्या निवासस्थानी पुन्हा चौकशीसाठी आणले होते.यावेळी साधारण ५० मिनीटे त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी त्याची इंनोवा गाडी (एमएच ४८ , एके २६२६) जप्त केली. यावेळी एटीएसच्या पथकासोबत आलेल्या वैभवने काही वेळ कुटुंबियांशी संवाद साधला असून मी लवकरच घरी येईन असे वैभवने कुटुंबियांना सांगितले आहे.