माजलगावात ब्लॅकमेल करुन महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार; अल्पवयीन मुलीसह तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:52 PM2018-08-19T15:52:15+5:302018-08-19T15:56:15+5:30
मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोवरुन ब्लॅकमेल करीत एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना माजलगावात उघडकीस आली आहे.
बीड / माजलगाव : मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोवरुन ब्लॅकमेल करीत एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना माजलगावात उघडकीस आली आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन घेत पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना ताब्यात घेतले आहे. आणखी एक आरोपी फरार असून, तिच्या शोधात पथके रवाना झाली आहेत.
माजलगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयात पीडित तरुणी शिक्षण घेत होती. ग्रामीण भागातील असल्याने ती शहरातच किरायाने राहत होती. येथेच तिची एका मुलीसोबत मैत्री झाली. मैत्रिणीने पीडितेच्या एका मुलासोबत ओळख करुन दिली. तिच्याच खोलीवर नेले. तेथे प्रकरणातील मुख्य आरोपी आशिश ओमप्रकाश बोरा या तरुणाला बोलावून घेतले. दोघांना कोंडून घेतले. आशिशने पीडितेशी अश्लील चाळे केल्याचे फोटो त्या मैत्रिणीने टिपले. याच फोटोवरुन तिला ब्लॅकमेल केले जात असे.
हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्या मैत्रिणीने आपल्या दुसरा मित्र मनोज फुलारे यालाही ते फोटो पाठविले. मनोजनेही पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हा त्रास असह्य झाल्याने पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने यात ती बचावली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठत झालेला अन्याय कथन केला. त्याप्रमाणे पीडितेची मैत्रिण, आशिश बोरा, मनोज फुलारे, प्रमोद कदम व अन्य एका महिलेविरोधात अत्याचार, विनयभंग, पोक्सो, आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. उप विभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके, पोलीस निरीक्षक एस. डी. महाजन यांनी या प्रकरणात तपास चालू केला आहे. माजलगाव पोलीस या प्रकरणात खोलवर जाऊन मुख्य आरोपींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मुख्य आरोपीला पुण्यात बेड्या
प्रकरणातील मुख्य आरोपी आशिश बोरा याला पुण्यातून बेड्या ठोकल्या, तर मनोज फुलारे व पीडितेची मैत्रिण यांना माजलगावातच ताब्यात घेतले. यापूर्वीच प्रमोद कदम याला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करणारी मुख्य महिला आरोपी अद्यापही फरार आहे. तिलाही लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास माजलगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे.