मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 05:17 PM2018-11-02T17:17:20+5:302018-11-02T17:19:07+5:30
शुक्रवार पेठेत दोन गटात झालेल्या वादावादीतून झालेल्या गोळीबारानंतर दहशत निर्माण केल्याप्रकरणी मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील यांच्यासह पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : शुक्रवार पेठेत दोन गटात झालेल्या वादावादीतून झालेल्या गोळीबारानंतर दहशत निर्माण केल्याप्रकरणी मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील यांच्यासह पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी भरदिवसा गोळीबार झाल्याने शहराच्या मध्यभागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या महिला शहराध्यक्षा असलेल्या पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने मनसेत गोंधळ उडाला आहे.
मनीषा धुमाळ (वय ३५, रा. धुमाळ निवास, शुक्रवार पेठ) यांनी यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दंगल, जीवे मारण्याची धमकी देणे, महाराष्ट्र पोलीस कायद्यााअंतर्गत माजी नगरसेविका रूपाली पाटील, प्रियांका पाटील, पाटील यांचा मोटारचालक, अनुजा पाटील यांच्यासह पंधराजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक व्ही. डी. केसरकर तपास करत आहेत.
काय आहे प्रकार ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली पाटील यांचा भाऊ रूपेश पाटील याची मंगेश धुमाळ, मंदार धुमाळ यांच्याबरोबर वाद झाला होता. या कारणावरून पाटील आणि धुमाळ यांच्या साथीदारांमध्ये बुधवारी दुपारी मंडईजवळ असलेल्या शिंदे आळीत हाणामारी झाली. पाटील अणि साथीदारांकडून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला तसेच मंगेश धुमाळ याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. धुमाळ याच्या साथीदारांनी पाटील, विशाल गुंड यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेनंतर रूपाली पाटील, प्रियांका पाटील, अनुजा पाटील आणि साथीदार मनीषा धुमाळ यांच्या घरात शिरले. मनीषा यांचा पुतण्या मंगेश आणि मंदारने केलेल्या मारहाणीचा जाब विचारून त्यांनी शिवीगाळ केली. धुमाळ यांच्या दरवाज्यावर लाथा मारण्यात आल्या. दहशत निर्माण करण्यासाठी तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखविण्यात आला, असे मनीषा धुमाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे.