ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ, सोनसाखळ्या हिसकावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 02:22 AM2018-11-10T02:22:47+5:302018-11-10T02:22:54+5:30
दिवाळी सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीने चोरटे सक्रिय झाले आहेत. यात खरेदीकरिता बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर हल्ला करून त्यांच्याकडून मौल्यवान ऐवज हिसकावून घेतला आहे.
पुणे - दिवाळी सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीने चोरटे सक्रिय झाले आहेत. यात खरेदीकरिता बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर हल्ला करून त्यांच्याकडून मौल्यवान ऐवज हिसकावून घेतला आहे. विशेषत: महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत चोरट्यांनी महिलांकडील सोन्याचे दागिने हिसकावून नेले.
वारजे भागात मुंबई-बंगळुरू मार्गावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दुचाकीस्वार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चांदणी चौकातील वेदभवननजीक एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणातील तक्रारदार महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नाना पेठेत चोरट्यांनी ढकलून दिल्याने महिला किरकोळ जखमी झाली. अनुतेज सिंफनी सोसायटीच्या आवारात पाडव्याच्या गुरुवारी (दि. ८) दिवशी ही घटना घडली. एका ५२ वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सोसायटीच्या आवारातून जात होती. चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ९५ हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
चोरटा महिलेला ढकलून पसार झाला. झटापटीत तक्रारदार महिलेला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे. सहायक फौजदार एम. बी. बढे तपास करीत आहेत.
डायस प्लॉट येथे नागरिकांनी चोरट्याला पकडले
गुलटेकडीतील डायस प्लॉट भागात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक महिला सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुलटेकडी भागातून जात होती. त्या वेळी एकाने तिच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी विशाल काते (वय २८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.