कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर आजपर्यंतचा मोठा सायबर हल्ला; ९४ कोटींची लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 09:23 AM2018-08-14T09:23:39+5:302018-08-14T11:25:54+5:30
कॅनडासह २४ देशांतून काढले गेले पैसे
पुणे : गणेशखिंड रोडवरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर सायबर हल्ला झाला असून हॅकरने जवळपास १५ हजाराहून अधिक व्यवहार करुन व्हिसा आणि रुपे कार्डद्वारे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये हाँगकाँगला वळते केले आहेत. या सर्व प्रकारामुळे बँक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
हा प्रकार ११ ऑगस्टला दुपारी ३ ते रात्री १० आणि १३ ऑगस्टला सकाळी साडेअकरापर्यंत घडला. ११ ऑगस्टला झालेल्या हल्ल्यात कॅनडा सह २४ देशातून केवळ २ तासात ८० कोटी रुपये काढले गेले. तर १३ ऑगस्टला दुपारी १३ कोटी ९२ लाख रुपये काही मिनिटांत हाँगकाँगमधील एका खात्यात वळविण्यात आले व तातडीने ते काढून घेतले गेले.
याबाबत बँकेच्या एका वरिष्ठांनी सांगितले की, शनिवारी जेव्हा हा सायबर हल्ला झाला त्यात एकाचवेळी इतके इंटरनॅशनल व्यवहार होत असल्याचे पाहून व्हिसा कार्ड देणाऱ्या कंपनीने ही बाब रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तातडीने कॉसमॉस बँकेला याची कल्पना दिली. रविवारी संपूर्ण दिवस बँकेचे अधिकारी व तज्ज्ञ या सर्व व्यवहाराची माहिती घेत होते. त्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा झालेल्या सायबर हल्ल्यात १३ कोटी ९२ लाख रुपये हाँगकाँगला वळविण्यात आले.
याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालक सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती आणि हाँगकाँग मधील एएलएम ट्रेडिंग कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कॉसमॉस बँकेचे गणेशखिंड रोडवर कॉसमॉस टॉवर येथे मुख्यालय आहे. तेथे असलेल्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर कोणीतरी मालवेअरचा हल्ला करुन बँकेच्या काही व्हिसा व रुपी डेबीट कार्डधारकांची माहिती चोरुन त्याद्वारे व्हिसाचे अंदाजे १२ हजार व्यवहार केले. याद्वारे ७८ कोटी रुपयांचे व्यवहार भारताबाहेर झाले आहेत. तसेच रुपे कार्डचे २ हजार ८४९ व्यवहारांद्वारे २ कोटी ५० लाख रुपयांचे भारताबाहेर गेले आहेत. असे एकूण १४ हजार ८४९ व्यवहारांसाठी ट्रान्झॅक्शन रिक्वेस्टस व्हिसा व एनपीसीआय यांना कॉसमॉस बँकेने मान्यता दिल्याचे भासवून कोणी तरी त्या अप्रुव्ह केल्याचे भासवून त्याद्वारे ८० कोटी रुपये काढून घेतले होते. हे सर्व व्यवहार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत घडले.
त्यानंतर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हॅकरने स्विफ्ट ट्रान्झॅक्शन रिक्वेस्टस व्हिसा व इनिशिएट करुन हाँगकाँग येथील हॅनसेंग बँकेच्या एएलएम ट्रेडिंग लिमिटेड यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करुन ते काढून घेतले. अशा प्रकारे हॅकरने तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा कॉसमॉस बँकेला गंडा घातला असून या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.