दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 06:40 PM2018-11-17T18:40:19+5:302018-11-17T18:40:46+5:30
याप्रकरणी सीबीआयने तपास सुरू असताना सचिन अंदुरे, शरद कळस्कर यांना अटक केली होती
पुणे : अंधश्रध्दा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी सचिन अंदुरे व शरद कळस्कर यांच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याासाठी न्यायालयाकडे ९० दिवसांची मुदतवाढीसाठी सीबीआयने अर्ज दाखल केला होता.या अर्जावर शनिवारी (दि.१७ ) न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात न्यायालयाने सीबीआयला ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीही सीबीआयने न्यायालयाकडे मुदतवाढीची मागणी केली आहे. २० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या आरोपावरून सुरुवातील मनीष नागोरी आणि खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती. परंतु, त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न न झाल्याने त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झाले नाही. गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने सनातचा साधक डॉ. विरेंद्रसिंह तावडे याला अटक करून आरोपपत्र दाखल केले होते. तावडे हा याप्रकरणील मुख्य सुत्रधार असल्याचा दावा त्यात करण्यात आला होता.
तपास सुरू असताना सीबीआयने आॅगस्ट महिन्यात सचिन अंदुरे, अमित दिगवेकर, राजेश बंगेरा आणि अमोल काळे यांना अटक केली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कट कोणी रचला, त्यांच्यावर कोणी गोळ्या झाडल्या, शस्त्र कोणी पुरवे, ठिकाणाची रेकी कोणी केली, आरोपींना पळून जाण्यास कोणी मदत केली, अशी तपासाची पुर्ण थेअरी आता स्पष्ट झाली आहे.त्यानुसार आरोपींच्या विरोधात पुरावे शोधण्याचे आव्हान सीबीआयपुढे आहे. तपासादरम्यान हाती आलेल्या बाबींच्या अनुषांगाने आरोपींकडे तपास करण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणात युएपीएचे कलम अंतर्भूत करण्यासाठी व पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागण्यात आली आहे.
............................