कल्याणमध्ये मौत का कुआं! रसायनमिश्रित विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 04:05 PM2018-11-01T16:05:54+5:302018-11-01T16:06:24+5:30
घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे पथक शोधमोहीम राबवत असताना पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याण - कल्याणमधील नेतीवली लोकग्राम येथील रसायनमिश्रित विहिरीत सफाईसाठी एक सफाई कामगार उतरला होता. त्यानंतर तो बराच वेळ विहिरी बाहेर न आल्याने २ स्थानिक नागरिक सफाई कामगाराला वाचवायला विहिरीत उतरले. मात्र, तिघेही विहिरीतून बाहेर आले आणि अथवा त्यांचा पत्ता लागेना. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागले. अग्निशमन दलाचे प्रमोद वाकचोरे आणि अनंत शेलार हे दोन जवान विहिरीत उतरले. मात्र ते देखील बाहेर आले नाही. त्यानंतर पाचजणही बुडाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी गर्दी जमा झाली. ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे पथक शोधमोहीम राबवत असताना पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घटनास्थळी मदतीसाठी NDRF, TDRF आणि ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाची मदत पाठविण्यात आली आहे. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अग्निशमन दलाचे जवान अनंत शेलार, प्रमोद वाकचोरे, राहुल गोस्वामी (मुलगा) आणि गुणाभाई गोस्वामी (वडील) यांचे मृतदेह सापडले असून अन्य एका मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.