एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: April 30, 2024 03:32 PM2024-04-30T15:32:35+5:302024-04-30T16:47:33+5:30
२०१८ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी संदेश घडशी (४०) आणि त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी विनय यांच्यात चाळीच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या रिक्षावरून वाद झाला.
कल्याण : रिक्षा लावण्याच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाची गळा दाबून हत्या करणाऱ्या नरेंद्र नारायण आडविलकर (३८) आणि विनय मोतीराम ताम्हणकर (५०) या दोघांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
२०१८ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी संदेश घडशी (४०) आणि त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी विनय यांच्यात चाळीच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या रिक्षावरून वाद झाला. हाच राग मनात धरून त्याचदिवशी संध्याकाळी विनयसह त्याचा मेव्हणा नरेंद्र यांनी रिक्षाचालक संदेश यांना मारहाण केली. त्यानंतर, संदेशची गळा दाबून हत्या करण्यात आली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी आरोपी नरेंद्र आणि विनय या दोघांविरोधात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी वकील संजय गोसावी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी पोलीस उपनिरीक्षक बी. एन. पवार आणि पोलीस हवालदार ए. पी. तायडे यांनी मदत केली.