बकऱ्यांच्या आवाजाने पोलिसांच्या जाळ्यात अडकले सराईत चोरटे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 10:56 PM2018-08-17T22:56:37+5:302018-08-17T23:08:14+5:30
देवनारच्या कत्तलखान्यातील बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मुंबई - भारतात 22 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणास साजरी होणार्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा समजला जाणाऱ्या देवनार कत्तलखान्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून बकऱ्या आणल्या जातात. दरवर्षी बकरी ईदसाठी इथे १ ते दिड लाख बकरे आणले जातात. त्या बकऱ्यांवर लाखोंची बोली लागते. याच संधीचा फायदा घेत कत्तलखान्यातील बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा देवनार पोलिसांनीअटक केली आहे.
बकरी ईदनिमित्ताने भरणाऱ्या बाजारात बकऱ्यांवर लाखोंची बोली लागते. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार आणि विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी बकरी ईदनिमित्त बकऱ्या देवनारमध्ये आनतात. याच संधीचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळेस गुपचूप जनावरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन फैजल उर्फ नझीर अहमद कुरेशी (वय 28), कुदरत उर्फ पाया अब्दुल हाजी शेख (वय 18), रिहान नाझीर शेख (वय 29)हे तिघे बकऱ्या चोरी करून पुन्हा बाजारात बकरी ईदआधी चढ्या दराने विकायचे. गुरूवारी मध्यरात्री हे तिघेही बकऱ्या चोरण्यासाठी देवनार कत्तलखान्यात गेले होते. एका व्यापाऱ्याचा डोळा लागला असल्याचे पाहून बकऱ्या चोरायच्या प्रयत्नात हे तिघे देखील होते. याच दरम्यान बकर्याच्या आवाजामुळे व्यापाऱ्यांची झोप उडाल्याने या तिघांची चोरी पकडली गेली. चोर पळण्याच्या तयारीत असताना व्यापाऱ्याने इतर व्यापाऱ्यांची मदत घेत तिन्ही आरोपीना पकडून देवनार पोलिसांच्या हवाली केले.
या प्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून या पूर्वी ही बकरी चोरी प्रकरणी त्यांना अटक केल्याची माहिती देवनार पोलिसांनी दिली. या तिघांना न्यायालयाने 18 ऑगस्टपर्यंत पोलस कोठडी सुनावली आहे.