उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा कसूर अहवाल गृहविभागाकडे पाठविण्यात येईल; पोलीस आयुक्तांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:17 PM2018-07-03T14:17:21+5:302018-07-03T14:17:41+5:30
नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा कसूर अहवाल लवकरच गृहविभागाला पाठविला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
औरंगाबाद : नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा कसूर अहवाल लवकरच गृहविभागाला पाठविला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. श्रीरामे यांना या आधीच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
चिरंजीव प्रसाद म्हणाले की, श्रीरामे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पोलीस उपायुक्तांची एक समिती काम करीत आहे. या समितीतील सहायक आयुक्त अनिता जमादार यांनी पथकासह चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मिलेनियम पार्क येथील सातव्या मजल्यावरील श्रीरामे यांच्या निवासस्थानी जाऊन पंचनामा केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच श्रीरामे घरी येऊन घरातील साहित्य घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. घरातील सर्व साहित्य घेऊन गेल्याचे तेथील काही नागरिकांनी सांगितले. मिलेनियम पार्क येथे निवासस्थान असल्याने तेथे पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता. प्रवेशद्वारावरच पोलिसांची असलेली राहुटीदेखील हलविण्यात आली असल्याचे दिसून आले. चौकशी टीमच्यासोबत सिडको एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी सोमवारी परिसरातील जबाब घेतला आहे.
श्रीरामे यांच्यावर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेचा जबाब घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे; परंतु ती महिला सध्या कोठे आहे व ती पोलिसांसमोर का येत नाही, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. पोलीस आयुक्तांनी श्रीरामे यांचा कसूर अहवाल गृहविभागाला पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
( औरंगाबादमध्ये पोलीस उपायुक्तावर दाखल झाला बलात्काराचा गुन्हा )