संतापजनक! धामणगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 04:21 PM2018-11-19T16:21:38+5:302018-11-19T16:28:24+5:30

अवैध रेती नेणाऱ्या ट्रकचा पाठलाग करीत असताना चांदूर रेल्वेचे प्रभारी एसडीओ तथा धामणगावच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियाच्या ट्रकने उडवले.

Sand mafia attack on Dhamangaon Tahsildar | संतापजनक! धामणगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडवले

संतापजनक! धामणगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडवले

googlenewsNext

 - मोहन राऊत

धामणगाव रेल्वे (अमरावती) - अवैध रेती नेणाऱ्या ट्रकचा पाठलाग करीत असताना चांदूर रेल्वेचे प्रभारी एसडीओ तथा धामणगावच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियाच्या ट्रकने उडवले. यात तहसीलदार, चालक व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजता सातेफळ फाट्याजवळ घडली. 

धामणगावचे तहसीलदार अभिजीत नाईक हे शासकीय वाहन क्रमांक एम एच २७ एए ५०३ ने चांदूर रेल्वेकडे एसडीओंचा प्रभार सांभाळण्याकरिता जात होते. सातेफळ फाट्याजवळ रेतीने अर्धवट भरलेला ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स २९० च्या चालकाला संबंधित ट्रक थांबण्यासाठी हात दाखविला असता ट्रकचालकाने थेट तहसीलदारांच्या गाडीवर ट्रक चढविला. यात तहसीलदार अभिजित नाईक (४०) गंभीर जखमी झाले. त्यांच्या पाठीला, हाताला दुखापत झाली, तर चालक महेंद्र नागोसे यांच्या पाठीला मुका मार लागला आहे. कर्मचारी बठे यांना डोक्याला मार लागलाय तिघांना चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेती चालकाने मुद्दामपणे शासकीय वाहनाला उडवून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार तहसीलदार अभिजित नाईक यांच्यावतीने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. आमदार वीरेंद्र जगताप जि.प. सदस्य अनिता मेश्राम यांनी  तहसीलदार  नाईक यांची भेट घेऊन विचारपूस केली. विधान परिषदेचे आमदार अरुण अडसड यांनी भ्रमणध्वनीद्वारे नाईक यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेऊन घटने ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना कळविली. प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी घटने विषयी माहिती जाणून घेतली तळेगाव दशासर व चादूर रेल्वेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळ गाठले आहे.

सुदैवाने बचावले प्राण
या भीषण अपघातात तहसीलदारांचे शासकीय वाहन ४० फुटापर्यंत घासत गेले. नशीब सुदैवाने आम्ही थोडक्यात बचावलो, असे तहसीलदार अभिजित नाईक म्हणाले. धामणगाव महसूल प्रशासनाने आठ दिवसांत रेती वाहतुकीविरुद्ध आठ ट्रक चालकांवर कारवाई केली आहे.

Web Title: Sand mafia attack on Dhamangaon Tahsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.