बनावट सोनं गहाण ठेवून कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 08:56 PM2019-02-04T20:56:04+5:302019-02-04T20:57:50+5:30
तीन प्रकरणे कुंकळळी पोलीस ठाण्याच्या हददीत तर प्रत्येकी एक प्रकरणे कुडचडे व मडगाव पोलीस ठाण्याच्या हददीत घडले आहे.
मडगाव - नावेली येथील बँक ऑफ इंडिया शाखेत बनावट सोने तारण म्हणून ठेवून गंडा घातल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी शाणु लोटलीकर याला अटक केली आहे. मागच्या आठवडयात लोटलीकर याच्यासह अन्य अकरा जणांवर गुन्हा नोंद झाला होता. संशयितांनी बँक आँफ इंडियाच्या नावेली शाखेला प्रकारे ६८ लाख ०९ हजार ८८३ रुपयांची टोपी घातली आहे. भारतीय दंड संहितेच्या ४२० व ४१८ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्ञा जोशी पुढील तपास करीत आहेत. लोटलीकर याने आतापर्यंत या बँकेला गंडा घालण्याची एकूण पाच प्रकरणे उघडकीस आली आहे. त्यापैकी तीन प्रकरणे कुंकळळी पोलीस ठाण्याच्या हददीत तर प्रत्येकी एक प्रकरणे कुडचडे व मडगाव पोलीस ठाण्याच्या हददीत घडले आहे.
बँक आॅफ इंडिया नावेली शाखेचे व्यवस्थापक ओम प्रकाश हे तक्रारदार आहेत. १६ मे २०१७ ते ०५ जुलै २०१८ दरम्यान संशयितांनी बँक ऑफ इंडियाच्या नावेली शाखेत ही बनवेगिरी केली होती. या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाल्यानतंर पोलिसांनी शाणु लोटलीकर याच्यासह मनोज पंढरी नाईक, सुचिता वेरेकर, भवन विकास कारेकर, लिडिया मोन्तेरो कार्दोज, शिवानी एस. खांडेपारकर , राजेंद्र नारायण बिलिये, पदमावती देविदास बिलिये, अमिता शरद सावईवेरेकर, माधव नागेश नाईक, रोझारियो कुलासो व सुचिता सुधाकर गुरव यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. अन्य संशयितांनी अटकपुर्व जामीनसाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
कुंकळळी पोलिसांनी दोन आठवडयाच्या पुर्वी बँक आॅफ इंडियाच्या वेळळी, कुंकळळी, व चिंचणी येथील शाखेत वरील प्रकारे गंड घातल्याप्रकरणी एकूण ४३ जणांवर गुन्हा नोंद करुन शाणु लोटलीकर याच्यासह २१ जणांना अटक केली होती. या पोलीस ठाण्यात सर्व संशयितांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम ४२0 व १२0 (ब) अंतर्गंत गुन्हा नोंद केला होता. २0१७ ते २0१९ या कालावधीत हा गैरव्यवहार झाला होता. बँक आॅफ इंडियाच्या वेळळी, कुंकळळी व चिंचणी शाखेत हा गैरव्यवहार झाला होता. वेळळी शाखेतून ७२. ८७ लाख तर कुंकळळी शाखेतून ३१.८३ लाख आणि चिंचणी शाखेमधून १.४८ कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. मागाहून कुडचडे पोलीस ठाण्यात शाणुसह अन्य जणांवर अशाच प्रकराचा गुन्हा नोंद झाला होता. कुंकळळी येथील प्रकरणात संशयिताला मागाहून जामीन मिळाला होता. बनावट सोने तारण म्हणून ठेवून वरील कर्ज घेण्यात आले होते. मात्र हे कर्ज फेडले न गेल्याने बँकेने या सोन्याचा लिलाव करण्याचे ठरविले असता हा बनावटपणा उघडकीस आला होता.