Maharashtra Election 2019 : उस्मानाबादेत इच्छुकांनी पक्षांतर करून ठोकला शड्डू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:40 PM2019-10-05T13:40:49+5:302019-10-05T13:44:29+5:30
कुठे तिरंगी, तर कुठे चौरंगी लढतीची शक्यता
- चेतन धनुरे
उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चारही मतदारसंघांतील प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत नामनिर्देशन दाखल केले. प्रयत्न करूनही उमेदवारी न मिळाल्याने काहींनी बंडाचे निशाण फडकावीत ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली, तर काहींनी पक्षांतर करीत शड्डू ठोकला आहे. त्यामुळे उस्मानाबादेत कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढती होणार, हे निश्चित झाले आहे.
उस्मानाबाद मतदारसंघामध्ये शिवसेना महायुतीच्या वतीने कैैलास पाटील यांनी शुक्रवारी दुपारी रॅली काढून नामनिर्देशन दाखल केले. परंतु, यावेळी महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी चार हात दूर राहणेच पसंत केले. हे थोडके म्हणून की काय, उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यामुळे पिंगळे उमेदवारी कायम ठेवतात की मागे घेतात, यावर कैैलास पाटील यांच्या विजयाचे गणित बऱ्यापैैकी अवलंबून आहे.दुसरीकडे स्व:पक्षातील इच्छुकांना बाजूला सारत सेनेतून राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले संजय निंबाळकर यांना उमेदवारी बहाल केली आहे. परंतु, यावेळी शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली.
परंडा मतदार संघातून शिवसेना महायुतीच्या वतीने प्रा. तानाजी सावंत यांनी रॅली काढून उमेदवारी दाखल केली. उमेदवारी न मिळाल्याने सावंत यांचे कट्टर समर्थक सुरेश कांबळे यांनी तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून नामनिर्देशन दाखल केले. राष्ट्रवादीच्या वतीने पुन्हा आमदार राहुल मोटे मैैदानात आहेत. त्यामुळे सुरेश कांबळे यांचा फटका प्रा. सावंत यांना बसतो की आ. मोटेंना हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
उमरगा मतदारसंघातून आमदार बसवराज पाटील यांचे कट्टर समर्थक दिलीप भालेराव यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे. तर काँग्रेसकडून इच्छूक असलेले जालींदर कोकणे यांनी उमेदवारी न मिळाल्याने मनसेचा झेंडा हाती घेत निवडणूक आखाड्यात उडी घेतली. शिवसेनेने विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना पुन्हा मैैदानात उतरविले आहे. वंचितनेही येथून तगडे आव्हान निर्माण केले आहे. रमाकांत गायकवाड यांना रॅली काढून उमेदवारी नामनिर्देशन दाखल केले. त्यामुळे येथेही तिरंगी लढत जवळपास निश्चित मानली जात आहे.
तुळजापूर विधानसभा...
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा एकदा आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवीत निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले राणाजगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतून बाहेर पडत अशोक जगदाळे वंचित बहुजन आघाडीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनीही शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादीतीलच महेंद्र धुरगुडे यांनीही प्रहार पक्षात प्रवेश करीत उमेदवारी दाखल केली आहे.