अवघ्या दहा दिवसांत सारे संपले; उरला पुन्हा एक नवा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:38 PM2019-11-06T14:38:18+5:302019-11-06T14:40:04+5:30
सोयाबीन पाण्यात कुजले अन् हुंडी बुरशीयुक्त बनली
- बालाजी आडसूळ
कळंब (जि. उस्मानाबाद) : मागच्या दुष्काळाने गळी आलेला हुंदका आवरला होता. नंतर यंदा नव्या स्वप्नांची पेरणी केली होती; परंतु यावरही बा वरुणराजा कोपला... पूर्वार्धात कोरड्या तर उत्तरार्धात ओल्या दुष्काळाच्या रूपाने. अवघ्या दहा दिवसांत सारे संपले. उरला पुन्हा एक नवा संघर्ष. अवेळी पावसाने ही नौबत आणली आहे, आढळा येथील शेतकरी रवींद्र वायसे यांच्यावर.
मांजरा काठावरील आढळा या गावाने यंदा तर एकाच हंगामात ‘कोरडा अन् ओला दुष्काळ’ अनुभवला. येथील रवींद्र रखमाजी वायसे या शेतकऱ्याने मागचा वेदनादायी भूतकाळ विस्मृतीत टाकत मोठ्या हुंबाडीने यंदा काळ्या आईची ओटी भरली होती. आपल्या सात एकरावर व बटईने कसत असलेल्या काही शेतजमिनीत पूर्व मशागत करून मोठ्या अपेक्षेने चाढ्यावर मूठ धरली. पहिल्या टप्प्यात पावसाचा सुखद शिडकावा झाल्याने उगवण व वाढही समाधानकारक झाली. परंतु, पुढील वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने ओढ दिली. तब्बल अडीच महिने वरूणराजा गायब होता. याचा त्यांच्या नऊ एकर सोयाबीनच्या वाढीवर अन् उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम झाला. सोयाबीनच्या मोडाला दोन-चार शेंगा अन् शेंगामध्ये चार-दोन दाणे भरले होते. ही स्थिती अर्थकारणाला अन् संसाराला पुन्हा हादरा देणारी अशीच होती. परंतु असू द्या, किमान उत्पादन खर्च तरी पदरात पडेल, अशी धारणा झोप उडालेल्या वायसे यांच्या खंबीर मनाने केली होती. परंतु, नियतीला हे सुद्धा मान्य नव्हते. दुष्काळाच्या तडाख्यातून हाती येत असलेल्या उरल्या-सुरल्या पिकाला आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाची नजर लागली. अवघ्या आठ-दहा दिवसांत कोरड्यातून ओल्यात रूपांतरित झालेल्या या निसर्गाच्या अनाकलनीय रूपाने वायसे यांच्या सोयाबीनचा फड पाण्याचा निचरा होत नसल्याने अक्षरश: वाया गेला. कुजलेले हे पीक मोठी धडपड करून पाण्याच्या बाहेर काढले. त्याची हुंडी लावली. मात्र, पावसाच्या तडाख्यातून हुंडीही वाचली नाही. हे सर्वच सोयाबीन बुरशीयुक्त बनले आहे. एवढेच नाही तर बियाही काळ्या पडल्या आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनला बाजारात आता हजार रूपये प्रति क्विंटल एवढाही दर द्यायला व्यापारी तयार नसल्याचे शेतकरी वायसे सांगतात.
काय विकावे अन् घेणार कोण?
सोयाबीनचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. उत्पादन खर्च दीड ते दोन लाखांवर झाला आहे. या स्थितीत एक तर उत्पादनात कमालीची घट तर आहेच; शिवाय मालाचा दर्जा सुमार आहे. पांढरे सोने काळा रंग घेऊन हाती आले आहे. यामुळे काय विकावे अन् कोणाला विकावे, असा अनुत्तरित प्रश्न पडला असल्याचे वायसे यांचा मुलगा राहुल वायसे यांनी सांगितले.
बहिणीच्या लग्नाचे देणे फेडायचे कसे?
मागच्या मे महिन्यात बहिणीचे लग्नकार्य पार पाडले होते. यासाठी उसनवारी करून पै-पै जमवून लग्नकार्य केले. यंदा सोयाबीन विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून ही सर्व देणी फेडायचे नियोजन होते; परंतु परतीच्या पावसाने हे नियोजन पूर्णपणे धुळीस मिळाले, असे राहुल वायसे म्हणाले.