धुळे जिल्ह्यातील १० हजार दुधाळ जनावरांना मिळाले ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:03 PM2017-12-16T12:03:38+5:302017-12-16T12:04:53+5:30
पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम, पहिल्या टप्यात ३७ हजार जनावरांना बिल्ला देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जनावरांची ओळख होण्यासाठी केंद्र शासनाने पशुसंजीवनी योजना सुरू केलेली आहे. आधारप्रमाणेच जनावरांनाही बारा अंकी युनिक कोड देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ११४ दूधाळ गायी-म्हशींना टॅग (बिल्ला) लावण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली.
देशभरातील जनावरांना स्वत:ची ओळख मिळवून देण्याचे काम केंद्र सरकारच्या ‘नॅशनल मिशन आॅफ बोव्हाईन प्रॉडक्टीव्हिटी’ या योजनेंतर्गत करण्यात येत आहे. यानुसार जनावरांना युनिक आयडेंटीफिकेशन कोड असलेला फायबरचा टॅग लावण्यात येत आहे. यामाध्यमातून जनावरांची सर्व माहिती शासनाला एक क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे.
२०१२च्या १९ व्या पशुगणणेनुसार जिल्ह्यात दुधाळ गायी-म्हशींची एकूण संख्या ८९ हजार ०४४ आहे. यात दूधाळ गायींची संख्या ५४ हजार ९१५ तर म्हशींची संख्या ३४ हजार १२९ एवढी आहे. पहिल्या टप्यात ३७ हजार गायी-म्हशींना टॅगिंग केले जाणार आहे. त्यापैकी आतापर्यंत १० हजार ११४ जनावरांना बिल्ला लावण्यात आलेला आहे. यात ६ हजार ४८४ गायी तर ३ हजार ६३० म्हशींचा समावेश आहे. उर्वरित जनावरांना बिल्ला लावण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
इत्यंभूत माहिती मिळणार
या नवीन योजनेनुसार जनावरांनाही आधारकार्डाप्रमाणेच १२ अंकी युनिक आयडी कोड मिळणार आहे. संगणकावर हा आकडा टाकल्यास, जनावराच्या मालकाचे नाव, गाव, ते जनावर कुठल्या जातीचे आहे, दूध किती देते, लसीकरण कधी झाले आदींची इत्यंभूत माहिती मिळण्यास मदत होणार आहे. जनावरांची खरेदी-विक्री करतांना, शासकीय योजना देतांनाही याचा लाभ होणार आहे.