'न्यायालयानेही आदेश दिलेत, लवकरच 'मेगा भरतीला' सुरुवात होईल'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 04:15 PM2018-12-26T16:15:51+5:302018-12-26T16:16:32+5:30
राज्य सराकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागांमध्ये सर्वाधिक 11 हजार जागा या ग्रामविकास खात्यामध्ये भरण्यात येणार आहेत.
धुळे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा भरतीबाबत माहिती दिली. राज्य सरकारने 72 हजार मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. आज, धुळे येथे मुख्यमंत्र्यांना मेगा भरतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, मेगा भरतीबाबत लवकरच निर्णय होईल. न्यायालयानेही आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच जागा निघतील, आता कोणतीही अडचण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून (एसटी) आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी, अशी मागणी धनगर समाजाच्या संघटनांच्या वतीने करण्यता आली होती. तर, या मेगाभरतीला विरोध करत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयानेही काही तात्काळ भरतीप्रक्रिय सुरु करण्यास आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे मेगा भरतीचे काय, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विचारण्यात आला. फडणवीस हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, लवकरच मेगा भरती होईल, न्यायालयानेही निर्णय दिला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य सराकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागांमध्ये सर्वाधिक 11 हजार जागा या ग्रामविकास खात्यामध्ये भरण्यात येणार आहेत. त्यानंतर, आरोग्य खात्यात 10,568 जागा भरण्यात येतील, तर तिसऱ्या क्रमांकावर सार्वजनिक बांधकाम विभागात जागा भरण्यात येतील.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण 72 हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे जाहीर केले होते.
* कोणत्या खात्यात किती जागा?
आरोग्य खाते – 10,568
गृह खाते – 7,111
ग्रामविकास खाते – 11,000
कृषी खाते – 2500
सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337
नगरविकास खाते – 1500
जलसंपदा खाते – 8227
जलसंधारण खाते – 2,423
पशुसंवर्धन खाते – 1,047