कटुआ, उन्नाव येथील घटनांच्या निषेधार्थ धुळ्यात आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 05:55 PM2018-04-20T17:55:43+5:302018-04-20T17:55:43+5:30
हजारो स्त्री-पुरूष मोर्चात सहभागी, जिल्हाधिकाºयांना दिले मागण्यांचे निवेदन
आॅनलाइन लोकमत
धुळे : कठुआ, उन्नाव, दोंडाईचा, कळमसरे येथे बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना संतापजनक आहे. अत्याचार करणाºयांना फाशी देण्यात यावी यासाठी आज धुळ्यात इन्साफ आक्रोश मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात स्त्री-पुरूष हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकºयांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.
जम्मु काश्मिरातील कठुआ, उत्तरप्रदेशातील उन्नाव, दोंडाईचा (धुळे), कळमसरे (अमळनेर) येथे गेल्या काही दिवसात बालिकांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
दुपारी ३ वाजता तिरंगा चौकातून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चेकºयांच्या हातात विविध घोषवाक्यांचे फलक होते. तर काहींनी ‘एक होऊ लेकीसाठी’ असे लिहिलेल्या काळ्या टोप्या घातलेल्या होत्या.
हा मोर्चा लोकमान्य हॉस्पिटल, बारापत्थर, महात्मा बसेश्वर चौक, तहसील कचेरीमार्गे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला. पोलिसांनी त्याच ठिकाणी त्यांना अडविले.
यानंतर मोर्चेकºयांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात कठुआ येथील बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाºया आरोपीला भर चौकात फाशी द्यावी, अत्याचार करणाºयांची पाठराखण करणाºयांना सहआरोपी करून त्यांनाही फाशीची शिक्षा द्यावी, अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे, सोशल मिडीयावरील अश्लिल व्हिडीओंवर तत्काळ बंदी घालावी अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मोर्चात सुमारे १५ हजार स्त्री-पुरूष सहभागी झाले होते. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी साडेचार वाजता हा मोर्चा आटोपला.