धुळे जिल्ह्यात बंद नाही, ठिय्या आंदोलन मात्र चौथ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:49 PM2018-07-24T13:49:00+5:302018-07-24T13:50:20+5:30
एस.टी. बसेस बाहेरून वळवल्या, औरंगाबाद सेवा चाळीसगावपर्यंत
लोकमत आॅनलाईन
धुळे : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी महाराष्टÑ बंदची हाक दिली आहे. मात्र जिल्ह्यात बंद नसून सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून शहरातून येणाºया एस.टी. बसेसचा मार्ग बदलून त्या बाहेरून वळविण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक ती खबरदारी बाळगण्याच्या सूचनाही वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मराठा समाजाला आरक्षणासह अन्य विविध मागण्यांसाठी २१ जुलैपासून मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलनासह रास्तारोको करण्यात येत आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी सोमवारी औरंगाबाद येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी ‘महाराष्टÑ बंद’ची हाक दिली. मात्र पंढरीच्या वारक-यांना परतीच्या प्रवासात कोणतीही दुखापत होऊ नये, तसेच त्यांची वाहने, एस.टी. बसेस यांना लक्ष्य करू नये, असे आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी एकवटले आहेत. आज चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच असून त्यास समाजासह अन्य समाज घटकांचाही वाढता पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी सकाळी राज्य परीट सेवा मंडळानेही आपला पाठिंबा जाहीर केला.
धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात येणा-या बसेसचा मार्ग बाहेरून वळविण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी शहरातून येणा-या बसेस राष्टÑीय महामार्गावरील वळण रस्त्यांनी बसस्थानकात येत असून त्याच मार्गे बाहेर पडत आहेत. जिल्ह्यातील सर्व बसफे-या नियमित व सुरळीत सुरू असल्याची माहिती एस.टी.च्या विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली. केवळ धुळे-औरंगाबाद थेट बस सेवा पोलिसांच्या सूचनेनुसार चाळीसगावपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवरून खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या असून काही अनुचित प्रकार घडल्यास बसेस आगारात जमा करण्यासही सांगण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.