दमदार पावसाशिवाय खरिपाची पेरणी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:54 PM2018-06-11T15:54:27+5:302018-06-11T15:54:27+5:30
प्रभारी कृषी अधीक्षकांचा सल्ला : जिल्ह्यासाठी पुरेशाप्रमाणात बियाणे मिळणार
धुळे : मृग नक्षत्र सुरू झालेले असले तरी जिल्हयात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये. ७० ते ८० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकºयांनी खरिपाची पेरणी करावी असा सल्ला धुळे जिल्ह्याचे प्रभारी कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी दिला आहे. दरम्यान खरीपासाठी जिल्हयात बियाण्यांची कुठलीही कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी सरासरी एवढाच पाऊस होईल, असा अंदाज हवामान खाते व स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतकºयांनी खरिपाच्या पेरणीची तयारीही केली आहे. २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. गेल्या आठवड्यात मान्सुनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकºयांनी पेरणीलाही सुरवात केली आहे. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या आगमनात पुन्हा खंड पडलेला आहे. आता पेरणी करून पावसाने दडी मारल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होत असते. त्यामुळे शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये. किमान ७० ते ८० मि.मी.पाऊस झाल्यानंतरच खरिपाची पेरणी करावी असे आवाहन संभाजी ठाकूर यांनी शेतकºयांना केले आहे. पुरेसे बियाणे मिळणार खरिप हंगामासाठी ४८ हजार ९७० क्विंटल विविध पिकांचे बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. त्यानुसार बियाणे उपलब्ध होणार असून, बियाण्यांची चणचण भासणार नाही. तसेच ८ लाख ४० हजार कापूस बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली होती. त्यापैकी ६ लाख कापूस बियाण्यांची पाकीटे उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. कापसाचे क्षेत्र घटणार जिल्ह्यात दरवर्षी २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होत असते. मात्र २०१८-१९च्या खरिपाच्या हंगामात हे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणे अपेक्षित आहे. तर मक्याचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे. ३५० पाकिटे विक्रीस बंदी बोगस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात पाच पथकांची नियुक्ती केली आहे.जिल्ह्यात धुळे, शिरपूर, व साक्री येथे विना लायसन्सची ३५० बीटी बियाण्यांची पाकीटे आढळून आली. ती पाकिटे विक्री बंदचे आदेश देण्यात आलेले आहे. बोगस बियाण्यांबाबत कोणाची तक्रार असल्यास, त्यांनी तालुका कृषी कार्यालय अथवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.