अतिक्रमणधारक रात्रभर रस्त्यावर मुक्कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:27 PM2017-10-27T17:27:39+5:302017-10-27T17:29:04+5:30
रेल्वे स्टेशन रस्ता : संसारोपयोगी साहित्य उचलण्यासाठी दुस-या दिवशी गर्दी; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील तब्बल २४४ अतिक्रमणे गुरुवारी दिवसभरात भुईसपाट करण्यात आले. परिणामी, येथील अतिक्रमणधारक रात्रभर रस्त्यावरच मुक्कामी थांबून होते. शुक्रवारी सकाळपासूनच संसारोपयोगी साहित्य उचलण्यासाठी अतिक्रमणधारकांची लगबग दिसून आली. परिसरात तणाव वाढू नये; यासाठी दुसºया दिवशीही पोलिसांचा बंदोबस्त तेथे तैनात होता.
शहरातील रेल्वेस्टेशनरोडवरील अतिक्रमण मनपा, जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी निष्काषित करण्यात आले. तब्बल १२ तास चाललेल्या या कारवाईत २४४ जणांच्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालल्याने येथील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती.
अर्धवट राहिलेले अतिक्रमण आज काढले
गुरुवारी झालेल्या कारवाईत काही अतिक्रमित घरांच्या भिंती पाडण्याचे काम बाकी होते. ते शुक्रवारी नऊ वाजता एक जेसीबीच्या साह्याने पूर्ण करण्यात आले. अतिक्रमण काढल्यानंतर रेल्वे स्टेशनरोडवरील मातीचा ढिगारा व इतर साहित्य एका डंपरच्या माध्यमातून दसरा मैदान परिसरातील एका नाल्यात टाकण्यात आला.
दुसºया दिवशीही रेल्वे स्टेशनरस्त्यावरील वाहतूक बॅरिकेट्स टाकून अडविल्यामुळे वाहनचालकांना चितोडरोडवरून व तसेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोरील रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागले.
सामान उचलण्यासाठी चिमुकलेही सरसावले
रेल्वे स्टेशनरस्त्यावरील अतिक्रमण निष्काषित झाले. त्यानंतर संबंधित अतिक्रमणधारक त्यांच्या घरातील विटा व घरकामासाठी उपयुक्त ठरणारे साहित्य रिक्षा, टेम्पो व ट्रॅक्टरच्या मदतीने सुस्थळी नेताना दिसून आले. हे काम करत असताना प्रत्येक घरातील लहान मुलेही त्यांच्या माता, पित्यांना विटा व साहित्य उचलण्यासाठी मदत करीत होते. यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे चित्र येथे दिसले.