पद्मश्री डॉ़ सुवालाल बाफना यांचे धुळयात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:21 AM2018-08-01T10:21:56+5:302018-08-01T10:23:46+5:30
सायंकाळी अंत्ययात्रा, अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पद्मश्री पुरस्काराचे मानकरी तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ़ सुवालाल छगनमल बाफना (वय ८७) यांचे बुधवारी पहाटे ४ वाजून ११ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले़ त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ५़३० वाजता साक्री रोडवरील जुन्या जिल्हा रूग्णालयासमोर असलेल्या बाफना हाऊस या राहत्या घरापासून निघणार आहे़
डॉ़ सुवालाल बाफना यांचा जन्म २८ जानेवारी १९३२ ला झाला होता़ ते सामाजिक कार्यासाठी नेहमीच तत्पर राहिले़ दलित व गरीबांसाठी त्यांनी प्रेरणादायी कार्य केले़ या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना २० मार्च २००६ ला तत्कालिन राष्ट्रपती डॉ़ ए़पी़जे अब्दुल कलाम यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते़ काँग्रेसच्याधुळे व नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्षपद त्यांनी दहा वर्ष भुषविले़ ‘आॅल इंडिया श्वेताम्बर काँफे्रन्स, नवी दिल्ली’ या संघटनेचे अध्यक्ष, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष, श्री संघाचे अध्यक्ष, ओसवाल भवनचे पूर्व अध्यक्ष, इंडियन रेडकॉ्रस संघटनेचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भुषविली़ डॉ़ बाफना यांच्या पश्चात पत्नी सजनबाई बाफना, मुलगी विजया दुग्गड, मुले सतिश व प्रकाश बाफना, सुना, नातवंडे असा परिवार आहे़