रवी देवांग यांचे हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:39 PM2017-12-12T22:39:05+5:302017-12-12T22:40:20+5:30
शेतकरी संघटना : आज धुळ्यात अंत्यसंस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांचे खंदे समर्थक व माजी अध्यक्ष रवी जगन्नाथ देवांग (६२) यांचे शेगाव येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार १३ रोजी सकाळी ११ वाजता देवपूरातील विद्यानगर भागातील शास्त्री नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेगाव येथे मंगळवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यास ते उपस्थित होते. संध्याकाळी मेळावा संपल्यानंतर कार्यकर्त्यांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले.
रवी देवांग हे शेतकरी संघटनेशी गेल्या २५ वर्षांपासून जुळलेले होते़ संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांचे ते खंदे समर्थक होते. सन २०१० ते १४ अशी चार वर्षे त्यांनी संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी शेतकरी संघटनेतर्फे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविली होती. तसेच ते नर्मदा बचाव आंदोलन, राष्ट्रसेवा दल यांच्याशीही संलग्न होते. रवी देवांग यांनी पुणे विद्यापीठातून बी़ई़ सिव्हील ही पदवी संपादन केली होती़ त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९५५ रोजी झाला होता़
तालुक्यातील डेडरगाव येथे स्थापन झालेल्या विपश्यना केंद्राचे ते संस्थापक होते. ते विपश्यनेसाठी या केंद्रावर तसेच इगतपुरी येथील मुख्य केंद्रावरही जात होते. त्यांनी अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रांसाठी आपले जीवन समर्पित केले होते. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. रात्री उशीरा त्यांचे पार्थिव धुळ्यात त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता राहत्या घरापासून निघणार असल्याची माहिती त्यांचे लहान बंधू विवेक देवांग यांनी दिली.