धुळे जिल्ह्यात महिला मतदार वाढविण्यासाठी मार्चमध्ये विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:54 PM2018-02-26T15:54:20+5:302018-02-26T15:54:20+5:30
जिल्हा निवडणूक शाखा : १ हजार पुरुषांमागे महिला मतदारांची संख्या ९३४; तफावत दूर करण्यासाठी घेणार जनजागृतीपर कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्याची विधानसभा मतदार यादी नुकतीच अद्ययावत झाली. त्यात १ हजार पुरुषांमागे महिला मतदारांची संख्या ही ९३४ इतकी आढळून आली. मतदार यादीतील ही तफावत दूर करून महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मार्च महिन्यात जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदार यादीत नाव नोंदणी करावी; याउद्देशाने जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम व महिला महाविद्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमेंतर्गत मतदारांची नव्याने मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा नावांची वगळणी करण्यात आली. अद्ययावत झालेल्या यादीत जिल्ह्यात ८ लाख १० हजार ४७६ पुरुष तर ७ लाख ५६ हजार ६९५ स्त्री मतदार तर २० इतर मतदार आहेत. या मतदार यादीत एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांची संख्या ही ९३४ असल्याची बाब समोर आली आहे.
धुळे शहरात स्त्री
मतदारांचे प्रमाण कमी
जिल्ह्यात धुळे शहर विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या सर्वात कमी आहे. धुळे शहर विधानसभा मतदार संघाचा विचार केला तर एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांची संख्या ही ८८७ इतकी आहे. तर धुळे ग्रामीणमध्ये ९१७, साक्री ९३६, शिंदखेडा ९६५, शिरपूर ९६४ असे प्रमाण आहे.
विविध विभागांच्या योगदानातून घेणार जनजागृतीपर कार्यक्रम
८ मार्चला महिला दिन आहे. हा दिवस विविध विभागांतर्फे साजरा केला जातो. त्यापार्श्वभूमीवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विविध विभागाच्या नुकतीच आढावा बैठक घेतली. बैठकीत महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांनी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार महिला दिनानिमित्त ८ मार्चला जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांद्व्रारे मतदानाविषयी जनजागृती व नव्याने मतदार यादीत नोंदणी केलेल्या निवडक स्त्री मतदारांना ओळखपत्राचे वाटप केले जाणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच प्रत्येक कार्यालयाकडे कोणती जबाबदारी राहील? हे देखील निश्चित करण्यात आले.
१० हजार महिला मतदार नोंदणीचे उद्दिष्ट
जिल्हा निवडणूक शाखेतर्फे मार्च महिन्यात राबविण्यात येणाºया विशेष मोहीमेंतर्गत १० हजार महिलांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आले आहे.