रावलांविरोधात नेमकं लढणार कोण? काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संभ्रम कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 03:07 AM2019-09-14T03:07:04+5:302019-09-14T03:07:32+5:30
दुसरीकडे गेल्या पाच वर्षात रावल यांच्या प्रमुख विरोधकांपैकी डॉ.हेमंत देशमुख हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले.
राजेंद्र शर्मा
धुळे : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीत कोणाला मिळते, त्यानंतरच राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या उमेदवाराचे नाव निश्चित होणार आहे. या विधानसभा मतदारसंघाच्या रचनेनंतर सलग दोनदा येथून जयकुमार रावल हे विजयी झाले आहेत. यंदा ते ‘हॅट्ट्रीक’ करण्यासाठी तयारीत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दोंडाईचा नगरपालिका आणि शिंदखेडा नगरपंचायतीसह कृषी उत्पन्न बाजार समिती व बहुतांश ग्रामपंचायतीही ताब्यात घेतल्याने निश्चितच भाजपाचे बळ मतदारसंघात वाढले आहे.
दुसरीकडे गेल्या पाच वर्षात रावल यांच्या प्रमुख विरोधकांपैकी डॉ.हेमंत देशमुख हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले. सध्या ते द्वारकाधीश उपसा सिंचन योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. दोंडाईचा पालिका व शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत बहुतांश प्रमुख नेतेमंडळी भाजपात सामील झाली आहे. मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी कागदावरच एकत्र दिसते, प्रत्यक्षात मात्र निवडणुकीत पक्षातील नेतेमंडळी आतून एकमेकांच्या विरोधात काम करतात, हा इतिहास आहे. त्याचा फायदा नेहमीच प्रतिस्पर्धी पक्षाला मिळाल्याची, खंतही दोन्ही पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ते खाजगीत व्यक्त करतात. यंदा तरी तसे होऊ नये, अशी अपेक्षा या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे.
शिवसेनेतील इच्छुकांनीही नेहमीप्रमाणे तयारी सुरू केली आहे. परंतु युती झाली तर ही जागा भाजपालाच मिळणार हे स्पष्ट आहे. तसे पाहता काही अपवाद वगळता सेनेचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते हे मंत्री रावल यांच्याच गटाचे असल्याचे सांगितले जाते.
पाच वर्षात काय घडले?
- मतदारसंघातील सर्वात मोठी एकमेव दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे.
- शिंदखेडा नगरपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, नरडाणा ग्रामपंचायतही भाजपाने काबीज केली आहे.
- तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करणाºया सुलवाडे - जामफळ योजनेसाठी निधी मंजूर करुन आणला आणि कामाला सुरुवात केली. बुराई नदी बारमाही करण्यासाठी लहान - लहान बंधारे बांधले.
- मतदारसंघातील दोंडाईचा, शिंदखेडा शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आणली. योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे.
विखरण येथील औष्णिक प्रकल्प रद्द केला. त्याऐवजी सोलर प्रकल्प आणण्याचे स्वप्न तरुणांना दाखविले. पण आता तो सोलर प्रकल्पही रद्द करुन असंख्य सुशिक्षित बेरोजगार युवकांचा विश्वासघात करण्याचे काम केले आहे. - शामकांत सनेर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस, धुळे
निवडणूक 2014
जयकुमार रावल (भाजप)
९२,७९४ मते
संदीप बेडसे (राष्ट्रवादी)
५०,६३६ मते
शामकांत सनेर (काँग्रेस)
४८,०२५ मते