Atal Bihari Vajpayee : अग्रलेख - स्टेटस्मन अटलजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:48 AM2018-08-17T03:48:48+5:302018-08-17T05:56:57+5:30
१९५७ मध्ये त्यांनी परराष्ट्र खात्याच्या कारभारावर टीका करणारे जे भाषण संसदेत केले ते ऐकून तेव्हाचे परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘हा तरुण एक दिवस या देशाचा पंतप्रधान होईल’ असे भाकीत केले होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने हा देश एका धीरगंभीर वृत्तीच्या राष्ट्र नेत्याला मुकला आहे. ९३ वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यातील अखेरचे काही दिवस त्यांनी मृत्यूशी संघर्ष करण्यात घालविले असले तरी राजकारण आणि राष्ट्रकारण या दोन्हीतील त्यांची रुची आणि वैचारिक सहभाग शेवटच्या श्वासापर्यंत कायम होता. पक्षहिताहून देशहिताला आणि राजकारणाहून राष्ट्रकारणाला महत्त्व देणारी जी मोजकी माणसे देशाच्या नेतेपदावर आतापर्यंत आली त्यात अटलजी अग्रेसर होते. शिवाय व्यक्तिमत्त्वातील ऋजुता आणि कवित्व या गुणांमुळे त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपणही साऱ्यांच्या मनावर ठसणारे होते. वक्तृत्व आणि विद्वत्ता, कवित्व आणि द्रष्टेपण व राजकारणपटुता आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व या साºया गोष्टी एकाच नेत्यात अभावाने आढळतात. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वात या साºया गुणांचा मनोज्ञ संगम आढळणारा होता. विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना विरोधी नेता कसा असावा याचा आदर्श जसा त्यांनी घालून दिला तसा देशाचा पंतप्रधान कसा असावा त्याचाही परिपाठ त्यांनी आपल्या कारकिर्दीत साºयांसमोर ठेवला. वाजपेयी भाजपाचे नेते असले तरी साºया देशाने त्यांना आपले मानले होते. वाजपेयींचीही दृष्टी त्यांच्या पक्षीय चौकटीने कधी मर्यादित केली नाही. त्यांचा आवाका सारा देश आणि प्रसंगी जगही कवेत घेणारा होता. रा.स्व. संघाच्या मुशीतून तयार झालेले वाजपेयी संघाच्या अन्य स्वयंसेवकांप्रमाणे किंवा संघातून भाजपात आलेल्या इतर राजकारणी नेत्यांप्रमाणे एकांगी वा एकारलेले नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला असलेल्या बहुआयामी कळांनी त्यांना जवळजवळ सर्वमान्यताच प्राप्त करून दिली होती. वाजपेयी संघ परिवारात नसतील एवढे देशात लोकप्रिय होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोहित असलेल्यांमध्ये काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश होता. १९५७ मध्ये त्यांनी परराष्टÑ खात्याच्या कारभारावर टीका करणारे जे भाषण संसदेत केले ते ऐकून तेव्हाचे परराष्टÑमंत्री व पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘हा तरुण एक दिवस या देशाचा पंतप्रधान होईल’ असे भाकीत केले होते. अटलबिहारी वाजपेयी या नेत्याने त्या थोर पंतप्रधानाचा शब्द आपल्या कर्तृत्वाने पुढल्या चार दशकांत खरा करून दाखविला. पी.व्ही. नरसिंंहराव यांनी वाजपेयींचा उल्लेख ‘आपले गुरू’ असा केला तर ‘आपल्या सरकारसमोर असलेल्या अडचणीतून मार्ग काढायला आम्हाला मदत करा’ असे साकडे त्यांना डॉ. मनमोहनसिंंग यांनी घातलेलेही दिसले. एकाच विचाराच्या चौकटीत सारे आयुष्य काढूनही ती चौकट आपल्या व्यक्तिमत्त्वाला चिकटू न देण्याचे कसब आत्मसामर्थ्याखेरीज साध्य होत नाही. वाजपेयी संघाचे होते आणि त्याचवेळी साºयांनाही ते आपले वाटत होते ही गोष्ट पाहिली की ते असामान्य कसब त्यांना साध्य करता आले हे लक्षात येते.
वाजपेयी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. संघ परिवाराने स्वत:ला त्या संग्रामापासून दूर ठेवले तरी स्वातंत्र्याची ऊर्मी आणि देशभक्तीची तीव्रता संघातील ज्या तरुणांना या लढ्यापासून दूर ठेवू शकली नाही त्यात वाजपेयी होते ही बाब त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चौरसपण त्यांनी आरंभापासूनच जपले होते हे सांगणारी आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या पुढाकाराने जनसंघाची स्थापना झाली तेव्हा संघ परिवारातून जे कार्यकर्ते त्यात सहभागी झाले त्यात वाजपेयी, भैरोसिंह शेखावत आणि अडवाणी या तेव्हाच्या तरुणांचा समावेश होता. पैकी वाजपेयींना देशाचे पंतप्रधानपद, शेखावतांना उपराष्टÑपतिपद तर अडवाणींना उपपंतप्रधानपद गाठता आले. दीर्घकाळ राजकारणात राहिलेल्या माणसांच्या वाट्याला जसा मित्रांचा मोठा परिवार येतो तसा शत्रूंचा आणि टीकाकारांचाही मोठा वर्ग त्याच्या जमेचा भाग होतो. वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण हे की त्यांना मित्र आणि चाहते लाभले, टीकाकार आणि शत्रू हा त्यांच्या मिळकतीचा भाग कधी झाला नाही. विजयाएवढेच पराजयही त्यांनी पाहिले. मोरारजी देसार्इंच्या मंत्रिमंडळात परराष्टÑ मंत्री राहिलेले वाजपेयी नंतरच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेलेही देशाला दिसले. मात्र विजयाने आनंद दिला असला तरी त्यांना उन्माद दिला नाही आणि पराजयाने दु:खी बनविले असले तरी त्यांची उमेद कधी खच्ची झाली नाही. त्यांच्या वाट्याला उपेक्षेचे आणि मानहानीचे क्षण आलेच नाहीत असे नाही. देशाच्या पंतप्रधानपदावर असताना नागपूरच्या संघस्थानाला त्यांनी भेट दिली तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एकही जबाबदार कार्यकर्ता न ठेवण्याची खबरदारी घेऊन संघाच्या नेत्यांनी केलेला अवमान त्यांच्या कायमचा जिव्हारी लागला होता. गोविंंदाचार्य नावाच्या संघ परिवारातील एका उठवळ विद्वानाने त्यांचा उल्लेख ‘संघाचा मुखवटा’ असा केला तेव्हाही अटलजी घायाळ झालेले देशाला दिसले नाहीत. वाजपेयींच्या वाट्याला आलेली राष्टÑमान्यता ज्यांना खुपत होती त्या माणसांनी केलेले हे प्रकार बालिश असले तरी ज्यांच्या सोबत हयात घालविली त्यांच्याकडून ते झालेले पहावे लागणे याएवढे वाजपेयींचे दु:ख मोठे नव्हते. त्यातून वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाला राजकारणी पुढाºयांच्या अंगी असते तसे निर्ढावलेले निबरपण नव्हते. त्यामुळे त्यांच्या अशा जखमा लवकर बºयाही होत नसत. कवी मनाचा माणूस फुलांच्या माºयानेही दुखावतो असे म्हणतात. वाजपेयींनी राजकारणाच्या धकाधकीत राहूनही आपले कवित्व जपले होते आणि त्याची किंंमत अशा घटनांच्या वेळी त्यांना चुकवावी लागत होती.
पंतप्रधान या नात्याने वाजपेयींनी देशाचे केलेले नेतृत्व देशाला पुढे नेणारे आणि आंतरराष्टÑीय राजकारणात त्याचे महात्म्य वाढविणारे ठरले. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीपासून देशाने समाजवादाची बंदिस्त चौकट सैल करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून देशाच्या राष्टÑीय उत्पादनाने नवी गती घेतली. हेच धोरण नंतरच्या नेत्यांनीही दृढपणे पुढे नेले आणि ही गती आणखी वाढती राहील याची काळजी घेतली. वाजपेयींचा सहा वर्षांचा कार्यकाळ ही गती कायम ठेवणारा आणि वाढविणारा ठरला. राष्टÑीय उत्पन्नाने सात टक्क्याचा पूर्वी कधी न गाठलेला वेग त्यांच्या कारकिर्दीत गाठला. त्या मजबूत आखणीवरच डॉ. मनमोहनसिंंग यांचे सरकार हा वेग ९ टक्क्यांवर नेऊ शकले होते. वाजपेयींची कारकीर्द आणखी गाजली ती पाकिस्तानसोबत त्यांनी केलेल्या अकृत्रिम मैत्रीच्या वाटचालीमुळे. अमृतसरजवळची वाघा बॉर्डर बसने ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. वाजपेयींच्या कारकीर्दीत भारत आणि अमेरिका हे दोन देशही परस्परांच्या अधिक निकट आलेले दिसले. त्यांच्या संबंधातील पूर्वीची कटुता संपली आणि त्यांच्यात सौहार्दाचा मैत्रीपूर्ण संवाद सुरू झाला. रशियाशी असलेले देशाचे परंपरागत मैत्री संबंध कायम राखून आणि चीनशी असलेल्या संबंधात जास्तीचा दुरावा येऊ न देता वाजपेयींना हे करता आले. ‘तुम्ही मुशर्रफ यांना जगाच्या राजकीय रंगमंचावर हिरो बनविले’ अशी टीका त्यांच्या परिवारातील माणसे करीत असताना ‘ही मैत्री देशहिताची आहे’ अशी भूमिका वाजपेयींनी घेतली आणि आपल्याच परिवाराची टीका देशहिताखातर ओढवून घेतली. ‘स्टेटस्मन’ आणि ‘पोलिटिशियन’ हे राजकारणात नित्य वापरले जाणारे शब्द आहेत. जो नेता देशहिताला प्राधान्य देतो आणि त्याला जराही झळ पोहचणार नाही याची काळजी घेतो त्याला स्टेटस्मन म्हणतात. तर पोलिटिशियन असणारा माणूस सत्ता प्राप्तीसाठी आणि ती टिकविण्यासाठी प्रसंगी देशहिताला धक्का लावणारी तडजोडही करीत असतो. अटलजी स्टेटस्मन होते, पोलिटिशियन नव्हते. त्यांच्या प्रखर देशभक्तीला व असीम देशसेवेला आमचे हे निरोपाचे विनम्र अभिवादन.