Atal Bihari Vajpayee : ये तालियाँ आपके सुरों के लिये हैं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:31 AM2018-08-17T03:31:52+5:302018-08-17T03:32:59+5:30
मेरे प्रभू मुझे इतनी उंचाई कभी मत देना, गैरोंको गले न लगा सकूँ, इतनी रूखाई कभी मत देना . शांतताप्रिय, निसर्गप्रेमी आणि संवेदनशील कविमनाच्या अटलबिहारी या आदर्श आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला एकदाच नव्हे तर वारंवार भेटण्याचा योग आला यापेक्षा मोठं ते भाग्य काय.
- पद्मजा फेणाणी -जोगळेकर
मेरे प्रभू
मुझे इतनी उंचाई कभी मत देना,
गैरोंको गले न लगा सकूँ,
इतनी रूखाई कभी मत देना .
शांतताप्रिय, निसर्गप्रेमी आणि संवेदनशील कविमनाच्या अटलबिहारी या आदर्श आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला एकदाच नव्हे तर वारंवार भेटण्याचा योग आला यापेक्षा मोठं ते भाग्य काय. १९९७ ला अशोक मुडे यांनी अटलजींच्या मै गीत नया गाता हूँ या कवितांचे पुस्तक माझ्यासमोर आणले. मुक्तछंदातील या वेगळ्याच कवितांना चाल लावण्याची त्यांनी मला विनंती केली. या कविता वाचून मी खूपच प्रभावित झाले. पुढच्या पिढीला प्रभावित करणाऱ्या त्यांच्या कविता वाचल्यावर मी चाल लावण्याचं मनाशी पक्कं केले होते. पण मला आता ओढ होती ती या कविता अक्षरश: जगणाºया कवी अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याची. तेव्हा महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं. उपमुख्यमंत्रिपदी भाजपचे गोपीनाथ मुंडे होते. त्यांचा आणि माझा परिचय होता. त्यांच्याबरोबर झालेल्या एका भेटीत मी त्यांना वाजपेयींच्या कवितांना चाल लावण्याविषयी चर्चा केली होती. काही कार्यक्रमानिमित्त वाजपेयी मुंबईत आले होते. गोपीनाथ मुंडेच्या रामटेक बंगल्यावर त्याचं वास्तव्य होतं.
९ आॅगस्टला सकाळी ७ वाजताच माझ्या घरी या, असा निरोप आदल्या रात्री मला गोपीनाथ मुंडेंनी फोन करून कळवला. सकाळी ७ वाजता आम्ही रामटेकवर हजर झालो. ओळख झाली आणि अटलजींना कुणीतरी सांगितले की तुमच्या कवितांना पद्माजाजी चाल लावतायत आणि त्या स्वत: त्यांच्या आवाजात ते स्वरबद्ध करणार आहेत. त्यावर त्यांनी हसून सांगितले की मेरी कविताए कोई स्वरबद्ध नही कर सकता क्यूँ की वो मुक्तछंद मैं लिखी गयी है. मात्र त्यानंतर त्यांच्यासमोर मी त्यांचीच एक कविता गाऊन दाखवली. जेव्हा मी अटलजींच्या कवितांचे गायन त्यांच्यासमोर केले तेव्हा त्यांना ते खूप आवडले. त्यांनी नुसतंच शब्दांनी माझं कौतुक केलं नाही तर कविता ऐकल्यावर ते उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवून मला शाबासकी दिली. ते इतके खूश होते की त्यांच्या तोंडून वाक्य निघालं, ये तालियाँ मेरे कविता के लिये नही आपके सुरों के लिये हैं. अगर ये लडकी गायेगी तो ही मेरी कविता को स्वरबद्ध करना असे त्यांनी सांगितले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला.
त्यानंतरची दुसरी भेट तर अविस्मरणीय होती. आम्ही त्यांच्या आठ कवितांना चाली लावून त्याची एक उत्तम सीडी तयार केली होती. एक सुरेख अल्बम तयार झाला होता आणि आम्हाला उत्सुकता होती की अटलजी ही गाणी कधी ऐकतील याचा. तो दिवस उजाडला १३ मे १९९८ हा दिवस जसा माझ्यासाठी संस्मरणीय आहे तसा देशासाठी ऐतिहासिक होता. कारण त्याच दिवशी भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी करून जगाला हम भी किसीसे कम नहीं याची जाणीव करून दिली होती. या परिस्थितीत अटलजींना भेटता येईल का याची आमच्या मनात शंका होती. मात्र त्याही धकाधकीच्या वेळेत त्यांनी आम्हाला तीन मिनिट भेटण्याची संधी दिली. आम्ही आत गेलो. अटलजींनी आमचं छान स्वागत केलं. अणुचाचणी केल्याचा आनंद त्यांच्या चेहºयावर साफ झळकत होता. बाहेर पत्रकारांची प्रचंड गर्दी होती मात्र त्यातही त्यांच्या हृदयात दडलेला कविमाणूस अस्सल कलाकारालाही भेटण्यासाठी वेळ देत होता ही त्यांच्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची एक निशाणी होती. त्यांनी आमच्या स्वरबद्ध केलेल्या कविता माझ्या आवाजात ऐकल्या. ३ मिनिटांची भेट २० मिनिटांची झाली. कविता ऐकताना त्यांच्या डोळ्यात मला तेज दिसत होतं. चेहºयावर आनंद दिसत होता. माझ्यासाठी हा अत्यंत सोनेरी क्षण होता. त्यानंतर खूप वेळा त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यांच्यासोबत एक घरोबा निर्माण झाला होता. त्यांच्यासारखा इतका हळवा, आदर्शवादी पण तितकाच कणखर पंतप्रधान होणे शक्य नाही.
शब्दांकन - अजय परचुरे