देशाला हवेत अटल भावनेचे सुसंस्कृत विरोधक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:57 AM2018-08-18T03:57:27+5:302018-08-18T11:17:35+5:30
वाजपेयींसारखे द्रष्टे नेते ज्या विरोधी बाकांचे दीर्घकाळ कर्णधार होते, तशा अटल भावनेच्या समर्थ विरोधकांची भारतीय लोकशाहीला आज नितांत आवश्यकता आहे.
- सुरेश भटेवरा
(संपादक, दिल्ली लोकमत)
भारतीय राजकारणात वाजपेयींची तुलनाच करायची झाली तर ती केवळ पंडित नेहरूंशीच करावी लागेल. लोकशाही मूल्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात याच तुलनेचे स्मरण गेले दोन दिवस वारंवार होत होते. नेहरूंच्या युगातही ताठ मानेने वावरलेल्या वाजपेयींचे गुरुवारी सायंकाळी महानिर्वाण झाले. वाजपेयी तरुण होते तेव्हा ‘हा मुलगा एके दिवशी भारताचा पंतप्रधान होईल’ असे भाकीत नेहरूंनी ऐकवले होते. काळाच्या कसोटीवर हे भाकीत खरे ठरले. नेहरूंसारखा आधुनिक भारताचा निर्माता हरपला, तेव्हा दैनिक मराठाच्या अग्रलेखात आचार्य अत्रेंनी दिवसा उजेडी सूर्यास्त झाल्याचे नमूद केले होते. वाजपेयींच्या निधनानंतर तशीच अनुभूती सर्वांना झाली. वाजपेयींच्या प्रस्थानाबरोबर राजकारणातील उदारमतवादी संस्कृतीच्या फक्त स्मृतीच शिल्लक राहिल्या आहेत. शुक्रवारी दुपारी दीनदयाल मार्गावर भाजपच्या मुख्यालयापासून राजघाटावरील स्मृती स्थळापर्यंत वाजपेयींची विशाल अंतिम यात्रा निघाली. सारा देश या महान नेत्याला यावेळी अखेरचा सलाम करीत होता. अंत्ययात्रेत हजारो लोकांची गर्दी होती. जड अंत:करणाने नि:शब्द अन् शोकाकूल वातावरणात लोक पायी चालत होते. पंतप्रधान मोदी, भाजपचे अध्यक्ष शहा, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री अन् मंत्री या जनसागरात होते. हे सारे सत्ताधीश या महान नेत्याच्या महानिर्वाण यात्रेत फक्त चालणाºया गर्दीचा भाग बनलेली माणसे होती. आपल्या देदीप्यमान प्रतिभेने एखादी व्यक्ती जेव्हा सर्वोच्च सत्तेपेक्षाही मोठी असते, तेव्हा सभोवतालच्या सत्तेची उसनी कवचकुंडले खुजी वाटू लागतात. अंतिम यात्रेत सहभागी तमाम सत्ताधीशांचा रुबाब अन् बडेजाव असाच गळून पडला होता.
अटलबिहारी वाजपेयींच्या १९५५ ते २००९ पर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचे सूक्ष्म अवलोकन केले तर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीतला ९० टक्के काळ विरोधी बाकांवर गेला. सत्ताधीशांना राजकीय विरोध करताना सामान्यजनांच्या व्यथा वेदनांचा आवाज बुलंद करणे, हा विरोधकांच्या राजकारणाचा आत्मा आहे. १९५७ ते १९९६ अशी तब्बल चार दशके, नेहरूंपासून नरसिंहरावांपर्यंत सर्व पंतप्रधानांच्या विरोधात ठामपणे उभे राहूनही व्यक्तिगत आयुष्यात वाजपेयींचा कोणीही विरोधक नाही, ही वाजपेयींच्या उदार व्यक्तिमत्त्वाला मिळालेली केवळ दाद नव्हे तर भारतीय लोकशाहीतले राजकीय आश्चर्यच आहे. वाजपेयींच्या राजकारणाचा खरा वारसा म्हणूनच सत्तेचा नसून विरोधी राजकारणाचा आहे.
नेहरूंच्या अनेक धोरणांचे वाजपेयी प्रखर टीकाकार होते मात्र मोरारजीभार्इंच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्रिपद पहिल्यांदा त्यांच्याकडे आले तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातली नेहरूंची तसबीर अचानक कुठेतरी गायब झाल्याचे त्यांना समजले. ते खिन्न झाले. उपस्थित अधिकाºयांना त्यांनी विचारले की इथली नेहरूंची तसबीर कुठे? कुणी काहीच बोलले नाही. दुसºया दिवशी मात्र ती तसबीर पुन्हा आपल्या मूळ जागेवर दिसू लागली. विद्यमान काळात पंतप्रधानांपासून त्यांच्या तमाम मंत्र्यांना नेहरूद्वेषाने पछाडले आहे. ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करताना नेहरूंचे नाव जाणीवपूर्वक टाळले जाते. वाजपेयींना हे समजले असते तर त्यांनी कदापि ते सहन केले नसते. कडक शब्दात सर्वांची कानउघाडणी केली असती.
भारताच्या राजकीय पटलावरून नेहरूंचा अस्त झाला त्यावेळी वाजपेयींना आपले अश्रू आवरता आले नव्हते. नेहरूंच्या निधनानंतर वाजपेयींनी ज्या शब्दात त्यांना आदरांजली अर्पण केली तो शोकसंदेश भारतीय लोकशाहीतला अलौकिक दस्तऐवज आहे. वाजपेयी त्यात म्हणतात : ‘पंडित नेहरू शांतीचे पुजारी होते मात्र क्रांतीचे अग्रदूत होते. ते अहिंसेचे उपासक होते मात्र भारताचे स्वातंत्र्य अन् सन्मानाच्या रक्षणासाठी शस्त्रांचा प्रयोग करण्यास ते कचरणारे नव्हते. नेहरू अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते मात्र देशात आर्थिक समानता प्रस्थापित करण्याबाबत त्यांनी कधी तडजोड केली नाही’. पंडित नेहरूंना अखेरचा सलाम करताना या संदेशातला प्रत्येक शब्द वाजपेयींनी आपल्या आदर्श संस्कारांनुसार लिहिला. स्पर्धेच्या राजकारणात राजकीय विरोधाची भूमिका समजू शकते, मात्र सत्ताधाºयांनी विरोधकांवर सूडाचा प्रवास सुरू करायचा नसतो. भारताच्या विद्यमान राजकारणात मात्र अटलजींची ही परंपरा त्यांच्या निधनाआधीच समाप्त झाली आहे. नेहरू युगातले ते अखेरचे असे नेते होते की ज्यांचा नेहरूंशी थेट संबंधही होता अन् विरोधही होता. विरोधी बाकांवर जी राजकीय मूल्ये वाजपेयींनी मनापासून जपली, ज्या महान परंपरा निर्माण केल्या, त्या आज संकटात आहेत. अटलजींच्या आयुष्याचा दीर्घकाळ रचनात्मक विरोधात गेला. त्यांनी स्वत:च स्थापन केलेल्या भाजपमध्येही त्यांना विरोधकाची भूमिकाच वारंवार वठवावी लागली. वाजपेयी पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हा भाजपमध्ये त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचे स्वर बरेच आक्रमक होते. पंतप्रधानांच्या हेतूंवर शंका घेणारे अनेक प्रश्न, संघपरिवार व भाजपच्या नेत्यांकडून विचारले जायचे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित धर्मसंसदेत तर वाजपेयींच्या विरोधात कडवट प्रहार करणारा आवाज बुलंद केला गेला. विद्यमान पंतप्रधानांबाबत मात्र अशा विरोधी स्वरात बोलण्याचे धाडस आज एकाही धर्ममार्तंडात नाही. अटलबिहारी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकायचे. मोजक्या शब्दात शक्यतो वन लायनरमध्ये त्रोटक प्रतिक्रिया द्यायचे. त्या प्रतिक्रियेत मात्र दूरदृष्टीचे सत्य दडलेले असायचे. आता काळ बदलला आहे. जमावाच्या हिंसाचारापासून, असहिष्णुतेच्या प्रयोगांची अन् अनेक भयप्रचंड अत्याचारांची मालिकाच गावोगावी सुरू आहे. सरकारी यंत्रणेचा राजरोस दुरुपयोग करून राजकीय विरोधकांवर सूड उगवला जात आहे. या घटनांवर कठोर भाष्य करण्याची वाजपेयींसारखी हिंमत अन् औदार्य दुर्दैवाने विद्यमान पंतप्रधानांकडे नाही. वाजपेयींनी आपल्या कारकिर्दीत विरोधाचे, प्रखर टीकेचे असंख्य वार झेलले मात्र सत्तेची भलामण करीत सत्ताधाºयांच्या कुशीत बसणाºया प्रसारमाध्यमांना कधी कुरवाळले नाही की प्रोत्साहनही दिले नाही. आज भारतातल्या बहुतांश प्रसारमाध्यमांची दुर्दैवाने तीच ओळख बनली आहे. वाजपेयींनी एकेकाळी संघाच्या प्रचारकाची भूमिकाही वठवली होती. भाजप सत्तेवर असताना रा.स्व.संघाचा उल्लेख साहजिकच वारंवार होतो. वाजपेयींच्या कारकिर्दीतही तो होत असे. त्या संघपरिवारालाही चार खडे बोल सुनावण्याची हिंमत फक्त वाजपेयींमध्ये होती. ‘संघ एक सामाजिक व सांस्कृतिक संघटना आहे. राजकारणात या संघटनेचा कोणताही हस्तक्षेप नाही, हे रा.स्व. संघाने आपल्या वृत्तीतून अन् आचरणातून सिध्द केले पाहिजे’, हे वाजपेयींचे विधान त्यांचे एकेकाळचे सहकारी सुधींद्र कुळकर्णींनी इंडियन एक्स्पे्रसमध्ये आपल्या लेखात २०१५ साली नमूद केले आहे. भारताच्या विद्यमान राजकारणाची आज अशी स्थिती आहे की सर्वोच्च सत्तेच्या विरोधात ठामपणे उभे राहू शकणारे विरोधक कमजोर आहेत. भाजपच नव्हे तर कोणत्याही पक्षात आज पक्षांतर्गत विरोधक फारसे नाहीत. राजकारणापासून दूर सत्तेच्या विरोधात उभे राहणाºया संघटना व स्वयंसेवी संस्थांना देशद्रोही संबोधले जाते. अशा कुंद काळोखाच्या अंधारयात्रेत वाजपेयींसारख्या प्रबळ विरोधकाची आठवण झाल्यावाचून राहात नाही. वाजपेयींसारखे द्रष्टे नेते ज्या विरोधी बाकांचे दीर्घकाळ कर्णधार होते, तशा अटल भावनेच्या समर्थ विरोधकांची भारतीय लोकशाहीला आज नितांत आवश्यकता आहे.