प्रबोधनाची ही परंपरा अशी नासवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:41 AM2018-01-09T03:41:41+5:302018-01-09T03:42:07+5:30
नागपुरात सध्या कीर्तन महोत्सव सुरू आहे. हा महोत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींनी आयोजित केला असल्याने त्याच विचारांचे कीर्तनकार इथे अपेक्षित आणि इतर उपेक्षित राहणार आहेत. त्याबद्दल कुणाचा विरोधही नाही.
- गजानन जानभोर
नागपुरात सध्या कीर्तन महोत्सव सुरू आहे. हा महोत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींनी आयोजित केला असल्याने त्याच विचारांचे कीर्तनकार इथे अपेक्षित आणि इतर उपेक्षित राहणार आहेत. त्याबद्दल कुणाचा विरोधही नाही. परंतु या महोत्सवात सहभागी होणाºया कीर्तनकारांचे श्रेष्ठत्व सांगताना विदर्भातील इतर कीर्तनकारांना नालायक ठरविण्याचा अश्लाघ्य प्रकार या महोत्सवाच्या आयोजकांकडून झाला असल्याने त्याची कठोर शब्दात दखल घेणे आणि पर्यायाने त्यांची लायकीही दाखवून देणे समाजहिताचे ठरते.
या महोत्सवातील कीर्तनकारांना सामान्य जनता ओळखत नाही. संघपरिवाराच्या चौकटीपलीकडे त्यांना कुणी किंमत देत नाही. मग इथेच त्यांना का बोलावण्यात आले? पात्रता एकच, ते कट्टर हिंदुत्वाचे वाहक आहेत. इथे राष्टÑसंतांवर कीर्तन करणारे बुवा एरवी कुठे दिसत नाहीत. धर्माभिमान जागविणे आणि हिंदुत्वाचा प्रसार करणे एवढाच अंतस्थ हेतू अशा कीर्तन महोत्सवाच्या आयोजनामागे असतो. त्याबद्दलही आमचे काहीच दुखणे नाही. परंतु स्वत:ची थोरवी गाताना इतरांना तुच्छ लेखण्याची सडलेली मानसिकता समाजात अजूनही कायम आहे. गुणवत्ता असूनही केवळ जातीवरून लायकी ठरविणारे नवे भांडवलदार आता सर्वंच जातीत दिसतात. ते एकत्र येतात तेव्हा त्यांचा मेळावा किंवा महोत्सव होतो. हा कीर्तन महोत्सव त्यातीलच एक. या कीर्तन महोत्सवाच्या व्यासपीठावर सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज कधी दिसणार नाहीत. कारण ते उपेक्षित समाजाचे प्राक्तन मांडताना गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांच्या प्रबोधनाचा प्रवाह पुढे नेतात, ज्ञानेश्वर-तुकारामही सांगतात. पण त्यांचे विचार हिंदुत्ववाद्यांना पचनी पडणारे नसतात. संघप्रणीत कीर्तन महोत्सवात भागवत-पुराणाच्या महतीचे बोधामृत पाजले जातात. सत्यपाल असोत किंवा इंजिनियर भाऊ थुटे, संदीप पाल, तुषार पाल. या कीर्तनकारांची परंपरा परिवर्तनाची असल्याने त्यांना अशा ठिकाणी कधीच बोलावले जात नाही. पण लोकं आपल्यावर टीका करतील या भीतीने मग हे आयोजक मानधनाचे किंवा लायकी नसल्याचे कारण समोर करतात.
या कीर्तन महोत्सवाच्या आयोजकांनी विदर्भातील कीर्तनकारांची लायकी ठरविताना केवळ त्यांनाच अपमानित केलेले नाही तर बहुजन संतांशी नाते सांगणाºया प्रबोधनाच्या परंपरेला बदनाम करण्याचा कुटील डावही त्यामागे आहे. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेला ‘संडास साफ करणारी गीता’ असे संबोधणाºया निवृत्ती वक्ते या महाराजाला अशा व्यासपीठावर स्थान दिले जाते आणि महाराष्टÑ सरकार त्याला पुरस्कृतही करीत असते. तुकारामाच्या भूवैकुंठगमनाची भाकड कथा लिहिणारेही या मंडळींना हवे असतात. आपल्या कीर्तनातून विकृती पसरवायची आणि समाजमन नासवायचे एवढेच काम या बुवांचे असते. सत्यपाल महाराजांसारखे प्रबोधनकार धर्माची चिकित्सा करतात. देवाच्या नावावर खारका-बदामा खाणाºयांना झोडपून काढतात. परिवर्तनाचा हा क्रांतिकारी विचार आपली धर्मसत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती अशा मंडळींना सतत वाटत असते. या धर्माभिमान्यांना आमचे एवढेच सांगणे आहे की, तुम्ही खुशाल तुमच्या व्यासपीठावर कुणालाही बोलवा, त्यांच्या आरत्या ओवाळा, त्यांचे बुरसटलेले विचार आत्मसात करा, तुमच्या परंपरेचा तो भागच आहे. पण विदर्भातील प्रबोधनाची ही परंपरा अशी नासवू नका.