एलफिन्स्टन - परळ दुर्घटना -  हे तर होणारच होतं, यात आश्चर्याचा धक्का  बसण्यासारखं काय आहे? 

By योगेश मेहेंदळे | Published: September 29, 2017 02:03 PM2017-09-29T14:03:05+5:302017-10-07T14:33:05+5:30

या घटनेनं राज्यातच नव्हे तर देशभरात प्रचंड दु:खं व्यक्त केलं जातंय आणि अनेकांना धक्का बसलाय की देशाच्या आर्थिक राजधानीत असं कसं काय होऊ शकतं. परंतु जे रोज मुंबईत प्रवास करतात, त्यांना अजिबात धक्का बसलेला नाहीये, कारण, ते रोजचा प्रवासच जीव मुठीत धरून करत असतात

Elphinstone - stampede - There is nothing shocking, it was about to happen | एलफिन्स्टन - परळ दुर्घटना -  हे तर होणारच होतं, यात आश्चर्याचा धक्का  बसण्यासारखं काय आहे? 

एलफिन्स्टन - परळ दुर्घटना -  हे तर होणारच होतं, यात आश्चर्याचा धक्का  बसण्यासारखं काय आहे? 

googlenewsNext
ठळक मुद्देआज मुंबईत सव्वा कोटींपेक्षा जास्त लोकं कोंडवाड्यात गुरं कोंबलेली असतात तशी राहतातजवळपास 70 लाख लोकं उपनगरीय रेल्वेनं प्रवास करतातडोंबिवली, ठाणे, घाटकोपर, भाइंदर, बोरीवली, अंधेरीमध्ये गाडीत चढायलाही मिळत नाही

एलफिन्स्टन - परळ स्थानकामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 22 जणांनी प्राण गमावले, हा आकडा वाढूही शकतो...या घटनेनं राज्यातच नव्हे तर देशभरात प्रचंड दु:खं व्यक्त केलं जातंय आणि अनेकांना धक्का बसलाय की देशाच्या आर्थिक राजधानीत असं कसं काय होऊ शकतं. परंतु जे रोज मुंबईत प्रवास करतात, त्यांना अजिबात धक्का बसलेला नाहीये, कारण, ते रोजचा प्रवासच जीव मुठीत धरून करत असतात. त्या 22 जणांमध्ये आज आपण नव्हतो, पण उद्या असू शकू अशी सार्थ भीती प्रत्येक मुंबईकराला आहे. आजच्या त्या 22 जणांबद्दल दु:ख, पण त्यात आपण नाही हेच समाधान अशी त्याची भावना आहे... त्यामुळे त्याला त्या 22 जणांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल प्रचंड 'सह-अनुभूती' आहे, रेल्वे प्रशासनाबद्दल चीड आहे, परंतु त्याला धक्का वगैरे काही बसलेला नाही!

आज मुंबईत सव्वा कोटींपेक्षा जास्त लोकं कोंडवाड्यात गुरं कोंबलेली असतात तशी राहतात. त्यातले जवळपास 70 लाख लोकं उपनगरीय रेल्वेनं प्रवास करतात. तिकिटाचे दर कितीही वाढवा मुंबईकर कुरबूर नाही करत. प्रवासी कितीही वाढले, त्या प्रमाणात गाड्या नाही वाढल्या तरी मुंबईकर कुरबूर नाही करत. दोन चार तास पाऊस पडला तरी रेल्वे ठप्प होते, रस्ते बंद पडतात, घरी पोचायला सहा सहा तास लागतात, तरी मुंबईकर कुरबूर नाही करत. नित्यनेमानं कुठेतरी ट्रेन घसरते, पेटोग्राफ तुटतो, इंजिन बंद पडलं आणि रेल्वेचे ट्रॅक तुडवण्याची वेळ आली तरी मुंबईकर कुरबूर नाही करत. डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, भाइंदर, बोरीवली, अंधेरी अशा अनेक स्थानकांमध्ये खच्चून भरलेल्या गाडीत फूटबोर्डावरही पाय ठेवायला जागा नाही मिळाली तरी मुंबईकर कुरबूर नाही करत. वर्षाला दोन्ही मार्गांवर मिळून हजाराच्या घरात माणसं खांबावर आदळून किंवा आतून आलेलं प्रेशर सहन न झाल्याने पडून माणसं मरतात. काहीजणं आगाऊ असतात, पण अनेकजण केवळ परिस्थितीचे शिकार असतात, तरीही मुंबईकर कुरबूर नाही करत.
कारण... डंपिंग ग्राउंडवर कचरा गोळा करणाऱ्यांना ज्याप्रमाणे घाणीच्या वासाचा त्रास होत नाही किंवा त्रास करून घेणं त्यांना परवडत नाही, त्याचप्रमाणे मुंबईकराला या प्रचंड गर्दीचा त्रास होत नाही, तो ते जगण्याचा एक भागच मानतं.

कर भरण्याच्या बाबतीत मुंबईकर आघाडीवर असल्याचं सांगितलं जातं. आर्थिक राजधानी म्हणून देशातल्या सगळ्या राज्यांमधल्या लोकांना सामावून घेणारी मुंबई सहिष्णूतेचं प्रतीक मानलं जातं. कला, संगीत आणि क्रीडा क्षेत्राच तर मुंबई आद्यस्थान मानलं जातं. सणासुदीच्या किंवा उत्सवांच्या काळात तर मुंबई हा देशाचा आदर्श मानलं जातं. विविध जातीधर्माचे लोक एकत्र कसे नांदतात याचा धडा गिरवण्यासाठी आशेनं मुंबईकडेच पाहिलं जातं. पहिली बुलेट ट्रेन कुठं असावी यासाठीही एकमतानं मुंबईलाच लायक मानलं जातं.

इतकं सगळं असूनही सोयी सुविधा देण्याच्या बाबतीत मात्र गाजरच दाखवलं जातं. कागदोपत्री आश्वासनं दिली जातात, परंतु ती पूर्ण कधी होणार याबद्दल कुणीही जबाबदार नसतं. मुंबईवरचा भार हलका करणारी न्हावाशेवा सी लिंक आणि मुंबईतली जलवाहतूक हे असेच चावून चोथा झालेले विषय. एलिव्हेटेड ट्रेन, पाच सात मेट्रो अशी वेगवेगळी गाजरंही वरचेवर दाखवली जातात. आश्वासनांचे फक्त इमले उभे राहतात, प्रत्यक्षात मात्र मुंबईकराच्या पदरी असते, रोजची भयाण गर्दी आणि कायम डोक्यावर मृत्युची टांगती तलवार...

सकाळच्या वेळी रेल्वेत शिरायला मिळालं तरी नशीब चांगलं आहे असं म्हणणाऱ्या मुंबईकराला धक्का बसतो गाड्या वेळेवर धावत असतील तर. मुंबईकराला धक्का बसतो, तुफान पाऊस पडुनही रस्त्यांचे नाले झाले नाहीत तर... मुंबईकराला धक्का बसतो मुंबईहून पुण्याला  जाताना एक्स्प्रेस वे मोकळा असेल तर आणि मुंबईकराला धक्का बसतो संध्याकाळच्या वेळी गाडी 30 कि.मी. प्रती तास या वेगानं पळवता आली तर... आणि मुंबईकराला धक्का बसतो  चार महिन्यांनी लागलेल्या निकालात त्यांचा मुलगा चक्क पास झाला असेल तर...

गर्दी नी चेंगराचेंगरीत आपण कसे 'गेलो' नाही याचंच आश्चर्य करणाऱ्या मुंबईकराला अशा घटनेनं अजिबात धक्का बसलेला नाही. त्या पलीकडे गेलाय मुंबईकर... सुरेश प्रभू आणि पियुष गोयल असे मागोमागचे दोन रेल्वेमंत्री मुंबईचे असूनही मुंबईच्या पदरात फक्त धोंडे देणाऱ्या रेल्वे प्रशासनाला हे चांगलं माहित आहे की मुर्दाड मनानं जगणाऱ्या या मुंबईकरांचं मुंबईकर्स स्पिरीट असं कौतुक केलं, की तो झालं गेलं सगळं विसरतो आणि ज्या ठिकाणी काल आहुती दिली गेली तिथंच उभा राहतो गाडी पकडण्यासाठी... पुढची आहुती कधी पडते याची वाट बघत!

Web Title: Elphinstone - stampede - There is nothing shocking, it was about to happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.