प्रादेशिकतावादाचा जयजयकार असो!

By admin | Published: May 10, 2014 02:44 AM2014-05-10T02:44:51+5:302014-05-10T02:44:51+5:30

महात्मा फुले, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नारायण गुरू आणि ई. व्ही. रामास्वामी यांनी भारतीय जीवनावर बंगालच्या समाजसुधारकांपेक्षा अधिक दीर्घ काळ प्रभाव गाजवला आहे.

Happiness of Regionalism! | प्रादेशिकतावादाचा जयजयकार असो!

प्रादेशिकतावादाचा जयजयकार असो!

Next

- रामचंच्रद गुहा 

कोलकाता येथून प्रकाशित होणार्‍या एका वृत्तपत्रामध्ये मी एक लेख लिहिला होता. त्या लेखात मी असा युक्तिवाद केला होता, की कन्नड लेखक- अभिनेता- नर्तक- समाजसुधारक- पर्यावरणवादी शिवराम कारंथ हे रवींद्रनाथ टागोर यांच्याइतकेच महान भारतीय होते. मी कारंथ यांना भेटलेलो आहे, त्यांचे साहित्य (अनुवादित केलेले) वाचलेले आहे आणि त्यांच्या समाजावरील प्रभावाची अनेक उदाहरणे मला ठाऊक आहेत. गिरीश कर्नाड यांच्यापासून यू. आर. अनंतमूर्तींपर्यंत, गिरीश कासरवल्लीपासून माधव गाडगीळ यांच्यापर्यंत अनेक कादंबरीलेखक, चित्रपट निर्माते आणि कर्नाटकातील स्कॉलर यांनी कारंथ ही अत्यंत असामान्य व्यक्ती असल्याचे मत नोंदवले आहे. टागोर यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत भव्य असे होते; पण ते सधन कुटुंबातून पुढे आल्याने त्यांना मोठा सामाजिक दर्जा आपोआप लाभला होता. त्यामुळे त्यांना मनासारखे करता आले आणि जगभर प्रवास करून स्वत:चा दृष्टिकोन व्यापक करता आला होता. याउलट, कारंथ यांचा जन्म तुटपुंजी साधने असलेल्या कुटुंबात झाला होता. त्यांनी जे कमावले ते सर्व स्वकष्टार्जित होते. विस्तृत वाचन करून त्यांनी स्वत:चा दृष्टिकोन व्यापक बनविला. भारतात ते अनेक भागांत पायीच हिंडले. त्यांनी त्यांच्या कादंबर्‍या आणि यक्षगान या नृत्यनाटिकेद्वारे लौकिक मिळविला होता. याशिवाय, कर्नाटकात त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केल्याने आणि महिलांच्या उत्थानासाठी कार्य केल्याने प्रसिद्धी संपादन केली होती. आणीबाणीला त्यांनी विरोध केला होता. सौंदर्यवादी दृष्टिकोनातून बघितल्यास कारंथ हे काही टागोरांसारखे जन्मजात लेखक नव्हते. त्यांचे नैतिक सामर्थ्य हे टागोरांइतकेच होते; पण त्यांचे शारीरिक धाडस हे टागोरांपेक्षा किती तरी जास्त होते. कारंथ हे टागोर यांच्या परंपरेतीलच आहेत, असे माझे प्रामाणिक मत आहे. या मतामुळे काहींच्या भावना भडकतील, याची मला जाणीव होती. गुरुदेवांच्या रांगेत कारंथ यांना बसविल्याने काही बंगाल्यांना राग येणे स्वाभाविक आहे आणि तसा राग व्यक्त झालाच. माझा लेख वाचल्यावर अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या एका बंगाली वाचकाने मला पत्र पाठवून त्यात माझ्यावर सडकून टीका केली. त्याने लिहिले होते, ‘न्यूयॉर्कमध्ये उणे २२ तापमान असताना हा लेख वाचताना मला गुदमरल्यासारखे वाटत होते. तुम्ही आता मध्यम वयाचे झाले आहात; पण त्यामुळे तुमची बुद्धी भ्रष्ट होईल इतके उतरते वय तुमचे नाही. कदाचित भारतातील वाढत्या तापमानामुळे तुमच्या मेंदूतील पेशी वितळल्या असण्याची शक्यता आहे. भारतातील निष्ठूर उष्णतेने तुमचा मेंदू भाजून तर निघाला नाही ना?’ बंगाल्यांचा प्रादेशिकतावाद हा असा भक्कम पायावर उभा असतो. एकोणिसाव्या शतकापासून बंगालने देशाला अनेक मोठे लेखक, समाजसुधारक, आणि सर्जनशील कलाकार दिले आहेत. बंगालमधील बुद्धिवाद्यांचे इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांनी जे काही यश संपादन केले, त्याला चटकन प्रसिद्धी मिळाली. भारताच्या अन्य भागातील अन्य लोकांनी तितकेच योगदान देऊनही त्यांना तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. इतिहासलेखनात बंगालने आघाडी घेतल्यामुळे देशातील सर्व आधुनिकतेचा उगम बंगालमध्ये झालेला आहे, असा आपला समज करून देण्यात आला. वस्तुस्थिती ही आहे, की स्त्री-पुरुष समानता आणि जाती-जातींतील समता याविषयीचे बुद्धिवादी पुरोगामी चिंतन हे पश्चिम आणि दक्षिण भारताने अधिक चांगल्या प्रकारे केले आहे. महात्मा फुले, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नारायण गुरू आणि ई. व्ही. रामास्वामी यांनी भारतीय जीवनावर बंगालच्या समाजसुधारकांपेक्षा अधिक दीर्घ काळ प्रभाव गाजवला आहे. आधुनिकतेची जननी बंगाल असेलही; पण तिचे पोषण आणि संवर्धन महाराष्टÑ, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत अधिक प्रमाणात झालेले आहे. तसे पाहता, भारताच्या सर्व राज्यांनी देशाला महत्त्वाचे लेखक आणि समाजसुधारक दिलेले आहेत. कारंथ यांना रवींद्रनाथ टागोर यांच्या पातळीवर आणण्यापूर्वी एक वर्ष अगोदर पुण्यातील एका तमीळ नागरिकाचे पत्र मला मिळाले होते. त्यात त्याने लिहिले होते, ‘तुम्ही स्वत:ला इतिहासलेखक समजता तेव्हा तुम्ही सुब्रह्मण्यम भारती यांच्याविषयी ऐकले जरी असले, तरी त्यांच्याविषयी फारच कमी माहिती तुम्हाला आहे. ते महान कवी, लेखक, भाषातज्ज्ञ, क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञ आणि पुरोगामी तमीळ ब्राह्मण यांचे मिश्रण होते. त्यांनी त्यांच्या लेखनातून आणि काव्यातून ज्याला स्पर्श केला नाही, असा एकही विषय नसेल! त्यांच्या तुल्यबळ असा लेखक मला तरी ठाऊक नाही. ते अवघे ३९ वर्षे जगले. त्यांच्या तुलनेत टागोर हे दुसर्‍या क्रमांकावर येतात. माझे हे म्हणणे तुम्हाला प्रक्षुब्ध करण्यासाठी नसून ती वस्तुस्थिती आहे.’ प्रादेशिक अभिमान भारतात खोलवर रुजलेला आहे. आपले राष्टÑ अनेक भाषकांचे आहे. प्रत्येक भाषेला दीर्घ आणि समृद्ध साहित्य परंपरा आहे. त्यामुळे स्वत:च्या भाषेतील लेखकांसोबत त्या-त्या भागातील लोकांच्या भावना जुळलेल्या असतात. कारंथ हे कन्नड लोकांना, भारती तमीळ जनतेला, वल्लाथोल पर्हापोस हे मल्याळींना आणि फकीर मोहन सेनापती ओडिशातील लोकांना मोठे वाटतात. पण, प्रादेशिक अभिमान हा साहित्य आणि भाषा यांच्या पलीकडे नेत असतो. प्रत्येक राज्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अभिमान वाटत असतो. तसेच आपली मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा यांसह संगीत, नृत्य, पोषाख आणि खाद्यपदार्थ हेही त्यांचे अभिमान वाटण्याचे विषय असतात. त्याचप्रमाणे, क्रिकेट खेळाडू हाही त्या-त्या प्रांताचा अभिमानाचा विषय असतो. मुंबईतील एक पत्रकार बंगळुरू येथील निवडणुकांचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेला. तेथील लोक भाजपा आणि काँग्रेस उमेदवारांत विभागलेले जरी असले, तरी जी. आर. विश्वनाथ हा सुनील गावसकरपेक्षा चांगला क्रिकेट खेळाडू आहे, याविषयी त्यांचे एकमत होते. प्रादेशिक अस्मितेमुळे स्पर्धा निर्माण होते. एका कन्नडिगाची तुलना मी बंगालच्या महापुरुषाशी केल्याने न्यूयॉर्कमधील बंगाली माझ्यावर संतापला होता. उडियाला ‘क्लासिकल’ भाषेचा दर्जा मिळाला; पण तो बंगाली भाषेला मिळाला नाही, याचे ओडिशातील लोकांना अधिक अप्रूप वाटते. प्रादेशिक अभिमान असणे हे निश्चित भूषणास्पद आहे. त्यामुळे माणसे आपल्या राज्यावर अधिक प्रेम करू लागतात. प्रादेशिक अस्मिता ही राष्टÑीयतेपेक्षा कमी धोकादायक असते, असे माझे मत आहे.

 लेखक हे इतिहासकार व विचारवंत आहेत.

Web Title: Happiness of Regionalism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.