कोप झाला; शेतकरीच धान्य खरेदीसाठी बाजारात गेला !
By गजानन दिवाण | Published: December 26, 2018 01:27 PM2018-12-26T13:27:29+5:302018-12-26T13:29:13+5:30
मराठवाड्यात सर्वच ठिकाणी हे चित्र पहायला मिळत आहे. असे धान्य विकत घेऊन पुढचे अख्खे वर्ष शेतकरी कसा जगणार, हाच मोठा चिंतेचा विषय आहे.
- गजानन दिवाण
धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यालाच बाजारात जाऊन धान्य विकत घेण्याची वेळ आली असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कुठले ? ४६ वर्षांपूर्वी म्हणजे १९७२ सालच्या दुष्काळातही असेच घडले होते. यंदाची स्थिती त्यापेक्षाही भयंकर आहे. त्यावेळी शेतकऱ्यांना फक्त धान्य विकत घ्यावे लागले होते. यावेळी शेतकऱ्यांना धान्य विकत घ्यावे लागणार आहेच. जनावरांसाठीचा चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठीही पैसे मोजावे लागणार आहेत. निसर्गाचा कसला हा कोप म्हणायचा ?
मराठवाड्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केली. त्यांनी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविलेल्या अहवालात ८,५३३ पैकी ७,२८१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी, तर १,२५२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांतील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी, तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. परभणी जिल्ह्यातील ७७२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी व उर्वरित ७७ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. नांदेड जिल्ह्यातील १ हजार ९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी व उर्वरित ४६८ गावांची जास्त आहे. दुष्काळामुळे मराठवाड्यातील सुमारे ४८ लाख हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. विभागातील ७ हजार २८१ गावे कमी पावसामुळे प्रभावित झालेली आहेत. विभागातील ४२१ मंडळांपैकी ३१३ मंडळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे.
त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांच्या घरात खायला ना ज्वारी राहिली ना गहू. वर्षभराचा साठा ठेऊन उरलेले धान्य पैशांच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीच विकून टाकले. त्यामुळे आता घरात काहीच शिल्लक राहिले नाही. परिणामी धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनाच धान्य विकत घ्यावे लागत आहे. औरंगाबादेतील जाधववाडी बाजारात गेल्या आठवड्यात आबासाहेब घडामोडे हा शेतकरी ५ गोणी तूर घेऊन आला होता. ४५०० ते ४९०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तूर विक्री झाली. या पैशांतून त्याने २ क्विंटल गहू खरेदी केला. झाल्टा येथील हरिभाऊ शिंदे यांनीही १२ गोणी तूर विक्रीला आणली होती. ती विकून त्यांनी गहू खरेदी केला. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी हे चित्र पहायला मिळत आहे. असे धान्य विकत घेऊन पुढचे अख्खे वर्ष शेतकरी कसा जगणार, हाच मोठा चिंतेचा विषय आहे.
दुष्काळाचे एवढे मोठे भूत शेतकऱ्यांच्या डोक्यावर असताना सरकार घोषणा करण्यातच धन्यता मानत आहे. तुरीला हमीभाव पाच हजार ६०० असला तरी बाजारात शेतकऱ्यांना साडे चार हजार रुपयांचाच भाव मिळत आहे. म्हणजे आधी तर पिकत नाही आणि जे काही पिकले त्याला भावही मिळत नाही. यापूर्वीच्या सर्व दुष्काळांमध्ये त्या त्या सरकारने सर्व पक्षांना सोबत घेऊन उपाययोजना केल्या. आता तसे घडत नाही. या दुष्काळाबद्दल कुणाला फारसे गांभीर्यच राहिले नाही. सरकार पातळीवर निर्णय होत नाहीत आणि झाले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही.
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर होऊन आता दोन महिन्यांचा काळ उलटला. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक येऊनही तीन आठवडे उलटली. बळीराजा अजुनही मदतीच्या प्रतीक्षेतच आहे. खरीप नाही आणि रबीही नाही. घरात धान्य नाही. जनावरांना चारा नाही आणि पाणीही नाही. बँका कर्ज देत नाहीत. सावकार दारात उभा करीत नाही. अशा स्थितीत हे अख्खे वर्ष या शेतकऱ्याने जगायचे कसे यावर कोणीच बोलताना दिसत नाही. या दुष्काळचक्रातून त्याची सुटका कोणते सरकार करेल? काँग्रेस सरकारचा मोठा कालखंड या बळीराजाने अनुभवला. मोदी सरकारचे अच्छे दिनही त्याने अुनभवले. आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर?
डिसेंबरमध्येच ७०५ टँकर
मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर वळणावर पोहोचू लागला आहे. डिसेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सध्या विभागासमोर आहे. १६ लाख २२ हजार २७६ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. ७०५ टँकर पाच जिल्ह्यांत सध्या सुरू असून, भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
शेतकरी नवरा नको म्हटले तर चुकले कुठे ?
उपवर लेक असेल तर शेतकरी असलेले वडील शहरातले नोकरदार स्थळ पाहतात. या शेतकऱ्याच्याच शेती करणाऱ्या मुलाला मात्र कोणीही मुलगी देत नाही. मग लग्न जमेपर्यंत नोकरी द्या अशी विनवणी शेतकरी बाबा आणि त्याचे शेतकरी मूल करताना दिसतात. तरीही मुलगी मिळत नाही. कारण प्रत्येक मुलीला शेतकरी नवरा नकोच आहे... काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आणि संगमनेर तालुक्यातील ४५ गावांत हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठल शेवाळे यांनी अभ्यास केल्यानंतर समोर आलेले हे वास्तव. या मुली चुकत आहेत असे तरी कसे म्हणायचे?
धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यालाच धान्य विकत घ्यावे लागत असेल तर कुठल्या भरवशावर तिने शेतकरी नवऱ्यासोबत संसार थाटायचा? गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर शेतकऱ्यांना दुष्काळाने गाठले नाही, असे एकही वर्ष गेले नाही. कधी हा दुष्काळ कोरडा असतो तर कधी ओला. यातूनही निसर्गाची कृपा झालीच तर सरकारच्या अवकृपेतून भाव पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी दुष्काळ हा कायम ठरलेला असतो.