निसर्गाची मारपीट अन् हवामानाचे अंदाज
By admin | Published: December 21, 2014 12:31 AM2014-12-21T00:31:20+5:302014-12-21T00:31:20+5:30
पाऊस पडण्यासाठी नैर्ऋत्य मोसमी वारेच हवेत, असं मात्र नाही. वातावरणात पुरेसं बाष्प असलं आणि हवेचा कमी दाब निर्माण झाला, की पाऊस पडण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते.
पल्या देशात सर्वसाधारणपणे मोसमी पाऊस पडतो. पण पाऊस पडण्यासाठी नैर्ऋत्य मोसमी वारेच हवेत, असं मात्र नाही. वातावरणात पुरेसं बाष्प असलं आणि हवेचा कमी दाब निर्माण झाला, की पाऊस पडण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते. बहुतेक वेळा तापमानात वाढ झाल्याने कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं. एप्रिल-मे महिन्यामध्ये वातावरणातलं बाष्पाचं प्रमाण व तापमान वाढून स्थानिक पातळीवर मेघगर्जनेसह पाऊस पडतो. याच पावसामध्ये काही वेळा गाराही पडतात. गारपीट तशी महाराष्ट्राला नवी नाही. खासकरून विदर्भ आणि मराठवाड्यात अवेळी येणाऱ्या पावसासह गारांचे तडाखे अनुभवास येतात. २०१० साली पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली होती. २००५ साली बारामतीला गारपिटीचा फटका बसला होता, पण या वर्षी अघटित घडलं. ठाणे आणि कोकण किनारपट्टीचा भाग सोडला तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागांत मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.
फेबु्रवारी-मार्चमध्ये हिवाळा संपत येताना कमी दाबाकडे वारे वाहू लागतात आणि विरुद्ध दिशेने फिरून पुन्हा जमिनीकडे प्रवास करतात. जमिनीवर येताना हे वारे समुद्रावर तयार झालेले बाष्पही घेऊन येतात. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेले असे बाष्पयुक्त वारे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या भागांत एकवटले. दोन्ही दिशांनी आलेले हे वारे एकमेकांना धडकून वातावरणात उंचावर गेले. धु्रवीय प्रदेशातून आलेल्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे या बाष्पयुक्त वाऱ्याचं तापमान शून्याहून खाली घसरलं आणि बाष्पाची गार बनली.
ज्या तापमानाला पाण्याचं बर्फात रूपांतर होतं असं तापमान सर्वसाधारणपणे जमिनीपासून पाच किलोमीटर उंचीवर असतं. पाच किलोमीटर उंचीवर हवेतल्या बाष्पाचा बर्फ झाला तरी तो जमिनीवर येईपर्यंत वितळून त्याचं पाणी झालेलं असतं. मात्र उत्तर धु्रवीय प्रदेशात थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे गोठणबिंदू जमिनीपासून चार किलोमीटर उंचीपर्यंत घसरल्यामुळे बाष्पाचा बर्फ जमिनीवर येईपर्यंत पूर्णपणे न वितळता गारांच्या स्वरूपात खाली आला. ही गारपीट हवामान बदलामुळे झाली की, ऋतुचक्र आता कायमचंच बदललंय; भविष्यात अशा प्रकारची गारपीट आता होत राहणार का, यासारख्या प्रश्नांवर चर्चा होत आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की, हवामानात होणाऱ्या अशा अनपेक्षित बदलांचा आपल्याला वेध घेता येईल का आणि त्याची पूर्वसूचना देणं शक्य होईल का? काही प्रमाणात या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. कारण ‘फियान’ किंवा इतर अनेक वादळांचे भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त केले
गेलेले अंदाज खरे ठरले आणि हवामान खात्याकडून मिळालेल्या ‘अॅलर्ट’मुळे मोठ्या प्रमाणात होणारं संभाव्य नुकसान आणि मनुष्यहानी टाळण्यात आपल्याला यश आलं होतं. गारपिटीच्या संदर्भात नव्याने संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण गारपीट होईल का, कधी होईल याचा अंदाज व्यक्त करून पूर्वसूचना देणारी कोणतीही ठोस यंत्रणा हवामान खात्याकडे नाही.
(लेखक विज्ञान प्रसारक आहेत.)
हवामानात अधिक अचूकता येण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. मेघा ट्रॉपिक्स, एसआरएमसॅट, जुगनी, इन्सॅट-३डी आणि ओशनसेंट-२ हे उपग्रह हवामानविषयक अंदाज अचूकपणे वर्तविण्यास मदत करीत आहेत. डॉप्लर रडारसह अत्याधुनिक अशी यंत्रणा वेधशाळा आणि हवामान केंद्रांमध्ये बसवण्यात येत आहे. उंच, पहाडी आणि विरळ मानवी वस्ती असणाऱ्या किंवा ती नसणाऱ्या प्रदेशात स्वयंचलित प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत. पण अजूनही हवामानाचा वेध घेणारी उपकरणं, या उपकरणांच्या मर्यादा, अनेकविध उपकरणांच्या नेटवर्कची नितांत आवश्यकता आणि हे नेटवर्क हाताळण्याचं पुरेपूर कौशल्य या गोष्टींमध्ये आपल्याला अजून दूरचा पल्ला गाठायचा आहे.
गारपिटीच्या संदर्भात नव्याने संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण गारपीट होईल का, कधी होईल, किती प्रमाणात होईल याचा अंदाज व्यक्त करून पूर्वसूचना देणारी कोणतीही ठोस यंत्रणा हवामान खात्याकडे नाही. तसंच या गारांचा व गारपिटीचा शास्त्रीय अभ्यास करण्याचीही व्यवस्था निर्माण करण्याची आता गरज आहे.
भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात हवामानाच्या अंदाजामधील अचूकतेला काही मर्यादा असतात. आपल्या देशाच्या तिन्ही बाजूंना समुद्र आणि एका बाजूला हिमालय आहे. देशाचा भूपृष्ठ दऱ्याडोंगरांचा आहे. त्यामुळे हवामानाच्या अंदाजातली
80-85%
अचूकता महत्त्वाची मानायला हवी.
- हेमंत लागवणकर