ती विटंबना नसते?
By admin | Published: December 29, 2016 03:37 AM2016-12-29T03:37:00+5:302016-12-29T03:37:00+5:30
आम्ही तेवढे सहिष्णु, सहनशील, परभावनांची कदर करणारे आणि कलेची बूज राखणारे, पण बाकी सारे याच्या नेमके उलट, हा हिन्दू धर्मातील लोकांचा नेहमीचा आणि आवडता दावा
आम्ही तेवढे सहिष्णु, सहनशील, परभावनांची कदर करणारे आणि कलेची बूज राखणारे, पण बाकी सारे याच्या नेमके उलट, हा हिन्दू धर्मातील लोकांचा नेहमीचा आणि आवडता दावा असला तरी वास्तव त्याच्या किती विपरीत असते याची चर्चा नेहमीच होत असते. विशेषत: अलीकडच्या काळात तर असहिष्णुतेच्या चर्चेने संपूर्ण देशच ढवळून निघाला होता. मुंबईतील भारतीय तंत्रशास्त्र संस्थेच्या (आयआयटी) सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जे भित्तीचित्र रंगविले गेले आणि त्यावरुन काही ‘सैनिकांनी’ जो गोंधळ घातला तो केवळ असहिष्णुतेचाच नव्हे तर बावळटपणातून निर्माण झालेल्या दंडेलीचाही द्योतक होता. संजीवनी बुटी शोधता आली नाही म्हणून हनुमानाने आख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता, अशी एक आख्यायिका रामायणात वर्णिली गेली आहे. याच आख्यायिकेमधील एका हाताने द्रोणागिरी तोलून धरलेल्या हनुमानाचे चित्र सदर भित्तीचित्रात चितारले गेले होते. फक्त तो हनुमान आधुनिक पेहरावात दाखविला गेला होता. म्हणजे हातात लेखणी, घड्याळ, विजार, चष्मा, टाय वगैरे वगैरे आणि शेपटीच्या जागी भगवा ध्वज. यात असेलच तर थोडी गंमत होती आणि तीदेखील चार भिंतींच्या आत. विटंबना तर अजिबातच नव्हती. पण कुणीतरी खोडसाळपणाने एका मावळ्याला याची खबर दिली व तो पाच-पंचवीस सैनिक घेऊन तिथे धावला. त्याने त्याला जी शिकवण मिळाली होती त्याप्रमाणे तिथे धिंगाणा घातला, ते भित्तीचित्र काढून टाकायला लावले आणि आयोजकांना लेखी माफीदेखील मागायला लावली. त्यांनीदेखील उगा कटकट नको म्हणून दोन्ही मागण्या मान्य करुन टाकल्या. एका अर्थाने तो विषय तिथेच संपला. पण जो बावळटपणा उरला त्याचे काय? पुराणांमध्ये वा धार्मिक पुस्तकांमध्ये देवादिकांचे जे वर्णन येते त्या वर्णनाप्रमाणेच मूर्ती किंवा चित्र रेखाटले जावे असा या नवसहिष्णुतावाद्यांचा आग्रह असेल तर ज्या गणेशोत्सवात याच मंडळींचा पुढाकार असतो, त्या गजाननाच्या पार्थिव मूर्ती तरी कुठे शास्त्रशुद्ध असतात. जी आदिदेवता तिला का कुठे थंडी वाजू शकते? पण तिला स्वेटर घातला जातो, पुढाऱ्याप्रमाणे टोपी चढविली जाते, डोळ्यावर चष्मा चढविला जातो, मोटार चालविताना दाखविले जाते आणि असंख्य गणेश मंडळे तर त्या अधिनायकाला संपूर्ण दहा दिवस तिष्ठत उभे करतात, तेव्हां होत नाही का विटंबना! सारा अचरटपणा, अन्य काय?