आता बघा कोकणी इंगा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:53 AM2018-03-17T00:53:37+5:302018-03-17T00:53:37+5:30
अखेर नाही... हो... म्हणत कणकवली नरेश दिल्ली दरबारी रुजू झाले. तीन महिन्यांपूर्वी आम्ही याच सदरात ‘कणकवली टू दिल्ली’ या शीर्षकाखाली राणे साहेबांच्या दिल्ली प्रस्थानाचे सूतोवाच केले होते, ते आता वास्तवात उतरले आहे.
-दिलीप तिखिले
अखेर नाही... हो... म्हणत कणकवली नरेश दिल्ली दरबारी रुजू झाले. तीन महिन्यांपूर्वी आम्ही याच सदरात ‘कणकवली टू दिल्ली’ या शीर्षकाखाली राणे साहेबांच्या दिल्ली प्रस्थानाचे सूतोवाच केले होते, ते आता वास्तवात उतरले आहे.
असो... राणेजी आता भाजपाचे खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवत आहेत. या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि मिळालीच तर त्यांची मुंहतोड मुलाखत घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. आम्ही मनापासून दिलेल्या शुभेच्छांचे त्यांनी सहर्ष स्वागत केले कारण बिनविरोध निवड झाल्यानंतर मनापासून असे कुणीही त्यांचे अभिनंदन केले नसावे. भाजपाला मन मारून त्यांना खासदारकी द्यावी लागली. शिवसेनेची तर बातच सोडा. अभिनंदन करणे तर दूरच, धनुष्यातून त्यांनी तीरच जास्त सोडले. नीतेशही घरच्याघरी अभिनंदन करून मोकळा झाला. काँग्रेसचा माणूस, जाहीर अभिनंदन तरी कसे करणार? मग नारायणराव स्वत:च म्हणाले, जाऊ द्या हो...! तसंही काँग्रेस सोडल्यापासून मी कुणाकडून कधी सदिच्छा, शुभेच्छांची अपेक्षा केली नाही. तुम्ही विचारा काय विचारायचं ते.
(मग मुलाखत सुरू झाली)
प्रश्न : आता तुम्ही भाजपाचे खासदार झालात, तेव्हा तुमच्या मित्र पक्षाबद्दल तुमची काय भूमिका राहणार?
राणे : कसला आलायं मित्र... त्याला नामोहरम करण्यासाठीच तर मला खासदार करण्यात आले. आता बघाच कसा इंगा दाखवितो ते.
प्रश्न : म्हणजे हे आधीच ठरले होते तर?
राणे : हो...! दिल्लीतील पहिल्या भेटीतच अमितभार्इंनी सांगितले होते, आम्ही तुम्हाला राज्यात पद देऊ नाहीतर दिल्लीला बोलावू. तुम्हाला मात्र ‘मातोश्री’वर नारायणास्त्र डागावेच लागेल.
प्रश्न : पण तुम्ही तोफ डागली अन् ते बाहेर पडले तर देवेंद्रबाबू अडचणीत नाही का येणार?
राणे : अजिबात नाही. तशी वेळ आलीच तर आमचा प्लॅन तयार आहे.
प्रश्न : कुठला प्लॅन?
राणे : ते नाही सांगणार. पण, एक सांगतो... ते सहजासहजी बाहेर पडणारे नाहीत. मला पद देण्याच्या विरोधात त्यांनी आकांडतांडव केले. मी झालो खासदार... पडले ते बाहेर...? मी तर आज पेपरमध्ये न्यूज बघत होतो...‘सेनेने भाजपाला दिली सोडचिठ्ठी’. कसली सोडचिठ्ठी अन् कसली काडीमोड. केवळ खिशात चिठ्ठ्या घेऊन फिरतात. त्या बाहेर काढायला स्वाभिमान लागतो.
प्रश्न : अरे हो...! स्वाभिमानवरून आठवले. तुमच्या त्या स्वाभिमान पक्षाचे पुढे काय?
राणे : काय म्हणजे...? राहू दे की पडून.
(मग हळूच म्हणाले, आॅफ द रेकॉर्ड सांगतो, या भाजपावाल्यांचेही काही खरं नाही. मी केंद्रात मंत्रिपद मागितले आणि त्यावरून बिनसले तर काही वेळ विश्रांती घेण्यासाठी आपला स्वत:चा पक्ष नको का?)
प्रश्न : म्हणजे, मंत्रिपदाची तुमची मागणी आताही कायम आहे तर! पण केंद्रात तर सध्या व्हेकन्सी नाही म्हणे?
राणे : नसली तर ती करावी लागते राव. आधी ‘महाराष्टÑावर फोकस’. राज्यात सेनेला सत्तेतून बाहेर काढण्याचे टार्गेट पूर्ण केले की, केंद्रात अनंतराव स्वत:च व्हेकन्सी तयार करतील की! द्या टाळी...!