राजकीय कोंडी
By admin | Published: May 23, 2017 06:53 AM2017-05-23T06:53:53+5:302017-05-23T06:53:53+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद सांभाळलेले आणि नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचा गड हादरविणारे डॉ.विजयकुमार गावित
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद सांभाळलेले आणि नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचा गड हादरविणारे डॉ.विजयकुमार गावित बऱ्यात कालावधीनंतर पुन्हा चर्चेत आले. मोदी लाटेचा अचूक अंदाज घेत भाजपावासी झालेले गावित अडीच-तीन वर्षांपासून शांत होते. परंतु खासदारकन्येच्या पदव्युत्तर पदवी आणि स्वत:विषयी न्या. गायकवाड समितीचा चौकशी
अहवाल ही प्रकरणे लागोपाठ आल्याने गावित यांची राजकीय कोंडी केली जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. गावित हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय चातुर्याची चुणूक वेळोवेळी दिसून आली. १९९५ मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठिंबा
देऊन मंत्रिपद मिळविले. पुढे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्रिपद सांभाळले व
चढ्या मताधिक्याने खासदारकी कायम राखणाऱ्या माणिकराव गावित व अनेक वर्षे राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या सुरूपसिंग नाईक यांचा पराभव कन्या आणि भावामार्फत करून प्रस्थ निर्माण केले. जिल्हा परिषद ताब्यात घेऊन पत्नीला अध्यक्षपद बहाल केले. परंतु मंत्रिपदाच्या काळात गैरव्यवहाराचे झालेले आरोप, चौकशी समितीचे गठन या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा राजकीय चातुर्य दाखवत मोदी लाटेवर स्वार होत भाजपामध्ये प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचे अस्तित्व फारसे नाही. दिलवरसिंह पाडवी, डॉ. नरेंद्र पाडवी हे यापूर्वी जनसंघ, भाजपाचे केवळ दोन आमदार आतापर्यंत निवडून आले होते. परंतु डॉ. हीना गावित यांच्यारूपाने भाजपाचा खासदार प्रथमच निवडून आला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत गावित व उदेसिंह पाडवी हे दोन आमदार निवडून आले. हा भाजपाचा विक्रम होता. गावित स्वत: निवडून आले असले तरी त्यांचे दोन्ही बंधू पराभूत झाले होते. जिल्हा परिषददेखील गावित यांच्या ताब्यातून गेली. त्यांच्या प्रवेशामुळे नाराज असलेला भाजपातील निष्ठावंत गटदेखील अधूनमधून कुरापती काढत असतो. खासदार डॉ. हीना गावित यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती आणि कार्यकारिणीच्या गठनात निष्ठावंतांनी अडथळे आणले होते. त्यामुळे गावित भाजपात राहूनही काहीसे अलिप्त राहतात. अलीकडे शहादा पालिका निवडणुकीची जबाबदारी ऐनवेळी गावितांवर सोपविण्यात आली आणि त्यांनी नगराध्यक्ष निवडूनदेखील आणला. वर्षअखेर नंदुरबार, नवापूर व तळोदा या तीन पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. गावित यांना रोखण्यासाठी हितशत्रूंनी त्यांची कोंडी चालवली असल्याचे एकंदरीत चित्र आहे.