‘गोकुळ’वरील राजकीय संशयकल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 05:12 AM2017-12-07T05:12:56+5:302017-12-07T05:13:11+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ सध्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय आखाडा बनला आहे. त्यामुळे राज्यातील एक आदर्श सहकारी संघ असलेल्या ‘गोकुळ’बाबत सभासदांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ सध्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय आखाडा बनला आहे. त्यामुळे राज्यातील एक आदर्श सहकारी संघ असलेल्या ‘गोकुळ’बाबत सभासदांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ राजकारण न करता विकासाचे राजकारण करायला हवे.
ंमहाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सर्वांत मोठा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ सध्या पश्चिम महाराष्ट्रातील चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय संघर्षातून हे सर्व चालू असल्याचे वरकरणी दिसत आहे. मात्र, या संघातील सत्तासंघर्ष आणि मलई (?) हीदेखील त्याची अन्य कारणे आहेत.
देशात ‘अमूल’नंतर सहकार क्षेत्रातील आदर्श दूध संघ म्हणून ‘गोकुळ’चेच नाव आहे. स्व. आनंदराव पाटील-चुयेकर, इंडियन डेअरी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अरुण नरके आणि त्यांच्या सहकाºयांनी १६ मार्च १९६३ रोजी ‘गोकुळ’चे रोपटे लावले. अथक परिश्रमाने त्याचा वटवृक्ष केला. राज्यातच नव्हे, तर देशात आदर्श बनविले. गोकुळ नावाचा ब्रँड तयार झाला आहे. आजघडीला प्रतिदिन १४ लाख लिटर दुधाचे संकलन हा संघ करतो. दूध उत्पादकांना १० दिवसाला सुमारे ४२ कोटी रुपयांचे वाटप केले जाते. ८२:१८ या सूत्रानुसार यात ‘गोकुळ’चे व्यवस्थापन केले जाते. म्हणजेच एक रुपयातील केवळ १८ पैसे व्यवस्थापनावर खर्च केले जातात. उर्वरित दूध उत्पादकांना दिले जातात. अन्य दूध संघांतील व्यवस्थापन खर्चाचा आकडा ३२ पैशांपर्यंत जातो. असे असूनही गोकुळ सध्या राजकारणाचा आखाडा बनला आहे. त्याला निमित्त ठरले ते ‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेतील महादेवराव महाडिक यांनी केलेले अहवाल वाचन. ‘गोकुळ’मध्ये कोणत्याही पदावर नसताना त्यांनी अहवाल वाचन कसे केले? अशी विचारणा करीत विरोधी सतेज पाटील गटाने रान उठविले. न्यायालयातही धाव घेतली. दरम्यान, राज्य सरकारने गाईच्या दूध दरात वाढ करीत सर्व दूध संघांनी प्रतिलिटर २७ रुपये दर द्यावा, असा फतवा काढला. हा दर देणे अशक्य असले तरी शासनाचा आदेश म्हणून ‘गोकुळ’ने तो द्यायला सुरुवात केली. मात्र, दोन-तीन महिन्यांतच हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरू लागल्याने तो दोन रुपयांनी कमी केला. पश्चिम महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच सहकारी दूध संघांनी शासकीय आदेशानुसार दर दिलेला नाही. २१.५० ते २५ रुपयांपर्यंत त्यांनी दर दिले आहेत. यातही सध्या ‘गोकुळ’चाच दर सर्वाधिक २५ रुपये इतका आहे. त्याखालोखाल सातारा जिल्ह्यातील कोयना दूध संघ २३ रुपये, तर अमूल २२.५० रुपये दर देतो आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार दर दिला जावा, तसेच गैरव्यवस्थापन थांबवावे यांसह विविध मागण्यांसाठी सतेज पाटील यांनी मोर्चाही काढला. यामुळे सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ लागले. हे पाहून सत्ताधारी संचालकांनीही प्रतिमोर्चा काढून याला प्रत्युत्तर देण्याची जय्यत तयारी केली आहे. हा प्रतिमोर्चा आजच, गुरुवारी निघणार आहे. या सर्व प्रकारांत गोकुळ मात्र संशयाच्या भोवºयात अडकत आहे. अमूल दूध संघाने कोल्हापूर जिल्ह्यात शिरकाव केला आहे. त्याला संधी द्यायची नसेल तर सत्ताधारी आणि विरोधकांनी विकासाचे राजकारण करायला हवे आणि सभासदांचा विश्वास टिकवायला हवा.