वेध - भगवानगड पुन्हा वेठीला

By सुधीर लंके | Published: September 14, 2017 12:09 AM2017-09-14T00:09:00+5:302017-09-14T00:10:35+5:30

दसरा मेळाव्याच्या राजकारणातून एकप्रकारे भगवानगड वेठीला धरला जात आहे. भाविकांना भगवानबाबांऐवजी पोलीस फौजफाट्याचे दर्शन अगोदर घडते. ही वादाची परंपरा तेवत ठेवायची की भगवानगड वादमुक्त करायचा याचा फैसला पंकजा मुंडे यांच्याच हातात आहे.

politics Of Bhagawangad | वेध - भगवानगड पुन्हा वेठीला

वेध - भगवानगड पुन्हा वेठीला

Next

 दस-याच्या निमित्ताने भगवानगडाभोवतीचा राजकीय शिमगा यावर्षीही सुरू झाला आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मेळावा गडावरच घेण्याचा इशारा देऊन या वादाला पुन्हा तोंड फोडले आहे. त्यामुळे मुंडे यांच्या मेळाव्याविषयी ओघानेच सालाबादप्रमाणे उत्सुकता निर्माण झाली आहे.
दसºयाच्या निमित्ताने राज्याचे राजकीय लक्ष आपणाकडे वेधले जावे, अशी तजवीजच पंकजा यांचे समर्थक करू लागले आहेत की काय अशी शंका येते. हे इशारे बहुधा त्याचाच भाग आहेत. नगर व बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणा-या भगवानगडावर संत भगवानबाबा यांची समाधी आहे. भगवानबाबा हे वंजारी समाजाचे असल्याने हा समाज या गडाला आपले दैवत मानतो. अर्थात भगवानबाबा हे स्वत: कधीही जातीपुरते मर्यादित राहिले नाहीत. जातीपातीच्या बाहेर पडत त्यांनी व्यापक सामाजिक व आध्यात्मिक काम उभे केले. त्यामुळे इतरही समाजात त्यांचे मोठे भक्तगण आहेत. भगवानबाबांनीच या गडावर दसरा महोत्सवाची परंपरा सुरु केली. राज्यातील ऊसतोड कामगार व कष्टकरी समाज यानिमित्ताने गडावर जमतो. मात्र, या महोत्सवाला आता राजकीय स्वरूप देण्याची प्रथा पडू पाहत आहे.
गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी दस-याला गडावर भाषण करण्याची परंपरा सुरू केली. या मेळाव्यांचा वापर त्यांनी नकळतपणे वंजारी व ओबीसी समाजाची एकजूट उभारण्यासाठी केला. आपण गडावर राजकीय भाषण करीत नाहीत, असे मुंडे म्हणायचे. पण, त्यांच्या भाषणांचा ‘अर्क’ हा राजकीयच असायचा. अर्थात उपेक्षित समाजाला व्यासपीठ मिळत असल्याने मुंडे यांच्या मेळाव्यांना कधी फारसा विरोध झाला नाही. मुंडे यांच्या हयातीत गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनीही मेळाव्यांना विरोध केला नव्हता. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांनी ‘गोपीनाथगड’ नावाचा स्वतंत्र गड विकसित केल्यानंतर मात्र महंतांनी भगवानगडावर राजकीय भाषणांना बंदी केली. राजकीय भाषणे आता नवीन गडावरून व्हावीत, अशी भूमिका त्यांनी घेतली. पंकजा यांच्या समर्थकांना ही बाब मान्य नाही. भगवानगडावर ते राजकीय हक्कच सांगत आहेत. गतवर्षी महंतांनी गडावर परवानगी नाकारल्यानंतर पंकजा यांनी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला होता. महादेव जानकर, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत त्यास उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी त्यावेळी यथेच्छ राजकीय भाषणे केली. जानकर यांच्या भाषणावरून तर वादळ उठले. या गडावरून राजकारण सुरू झाले आहे याची ती पावतीच होती.
अस्मितांचा राजकीय वापर करण्याची जुनी परंपरा या देशात आहे. भाजपचा तर त्यात हातखंडा आहे. पंकजा यांचे समर्थक त्याच पावलाने निघाले आहेत. आध्यात्मिक व सामाजिक प्रेरणा देणारी जी शक्तिस्थळे आहेत त्यांचा वापर नेमका कसा करायचा? याची एक आचारसंहिताच यानिमित्ताने ठरण्याची आवश्यकता आहे. पंढरपूर व आळंदीला येणारी गर्दी ही जातीधर्माच्या व पक्षपार्ट्यांच्या पलीकडची आहे. अशीच गर्दी भगवानगडावर जमत असताना ही आपली ताकद आहे, असे भासविण्याचा नेत्यांचा प्रयत्न दिसतोय.
नगर जिल्ह्यात वंजारी व ऊसतोड कामगार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजाच्या प्रश्नांसाठी एकही नेता जोरकसपणे बोलताना दिसत नाही. बबनराव ढाकणे, दगडू बडे या नेत्यांनंतर या समाजाला नगर जिल्ह्यातून आमदारकी मिळू शकलेली नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर राजकीय पदेही अभावानेच मिळताना दिसतात. त्याबाबत नेते शल्य बाळगताना दिसत नाहीत. दसरा मेळाव्यावरून मात्र राजकारण पेटविले जाते. पंकजा यांनी स्वत: अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. विचाराअंती बोलू, असे त्या मुंबईत म्हणाल्या. भगवानगडाला वेठीला धरायचे की तो निरपेक्ष ठेवायचा? हे आता पंकजाच ठरवतील.

Web Title: politics Of Bhagawangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.