राहुलजींचे नेतृत्व परिपक्व होतेय!

By विजय दर्डा | Published: December 17, 2018 06:38 AM2018-12-17T06:38:43+5:302018-12-17T07:01:39+5:30

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय उंची निर्विवादपणे वाढली आहे.

Rahulji's leadership is mature! | राहुलजींचे नेतृत्व परिपक्व होतेय!

राहुलजींचे नेतृत्व परिपक्व होतेय!

Next

विजय दर्डा

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय उंची निर्विवादपणे वाढली आहे. परंतु या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत जे वक्तव्य केले त्याने राहुलजी आता एक परिपक्व राजकीय नेते झाले असल्यावर शिक्कामोर्तब झाले. हिंदुस्थानची संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांतील राजकारणाने कसे केले गेले यावर त्यांनी नेमके बोट ठेवले. भारतीय जनता पार्टीचे नेते ‘काँग्रेसमुक्त भारत’चा उल्लेख न चुकता करतात. राहुलजी म्हणाले की, आम्ही या फूटपाडू राजकारणाविरुद्ध निर्धाराने लढू, पण आम्हाला भारताला कोणाहीपासून मुक्त करायचे नाही! एवढेच नव्हे. राहुलजी मोठ्या नम्रतेने असेही म्हणाले की, भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली चांगली कामे काँग्रेस पुढे सुरू ठेवेल.

 

सध्याच्या राजकारणाचे स्वरूप पाहता अशी विनम्रता ही दुर्मीळ गोष्ट आहे. या उदारतेच्या विचाराने राहुलजींनी केवळ त्या तीन राज्यांमधीलच नव्हे तर संपूर्ण देशातील लोकांची मने जिंकली. मी राहुल गांधी यांना अगदी जवळून ओळखतो. त्यांच्यात होत असलेले बदल मला प्रकर्षाने जाणवतात. त्यांच्या स्वभावात द्वेष या भावनेचा लवलेशही नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. ज्या व्यक्तीने आपल्या पित्याच्या मारेकऱ्यांना माफ केले ती व्यक्ती आणखी कोणाचा द्वेष करेल? या देशातील नागरिकांना द्वेष आणि सूडाचे राजकारण अजिबात पसंत नाही, असे ते मानतात. सन १९७७ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या सरकारने इंदिराजींना द्वेषाची वागणूक दिली होती. जनतेला हे बिलकूल आवडले नाही व केवळ पावणेतीन वर्षांत इंदिराजी पुन्हा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या. काही लोक फक्त द्वेषाचे राजकारण करतात व त्याला प्रोत्साहन देतात, हे मोठे दुर्दैव आहे. राजकारण द्वेष आणि नफरतीच्या पुढचे असते हे या लोकांनी समजून घ्यायला हवे. द्वेषाने राजकारण चालत नाही. तसेच धर्माच्या आधारावर राजकारणही चालू शकत नाही. द्वेषाने देशाची प्रगती होत नाही, तो बलशालीही होत नाही. भारताची आतापर्यंतची दमदार वाटचाल राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता याआधारेच झाली आहे. पाकिस्तान व बांगलादेश या आपल्या दोन शेजारी देशांचा कारभार धर्माच्या आधारे सुरू आहे. पण त्यामुळे त्यांची कशी दुर्दशा चालली आहे, हे सर्व जग पाहतेच आहे.

 

राहुल गांधी यांनी सहयोग, सहकार्याच्या राजकारणाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे. धर्मनिरपेक्षता तर त्यांच्या रक्तातच भिनलेली आहे. परिस्थितीच अशी होती की, राहुलजींना परिपक्व व्हायला थोडा वेळा लागला. राजकारणात चुका सर्वांकडूनच होत असतात. सन २०१४ मधील चुकांवरून आपण खूप काही शिकलो, हे स्वत: राहुल गांधीही सांगतात. खरं तर, राहुलजींचे व्यक्तिमत्त्व आता पूर्णपणे बदलले आहे. आता ते सहजपणे उपलब्ध होतात. कोणाला जवळ करायचे व कोणाला दूर ठेवायचे याचे त्यांना भान आहे. त्यांनी अशोक गेहलोत यांना राजस्थानचे व कमलनाथ यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यामागे सन २०१९ ची लोकसभा निवडणूक हे मुख्य उद्दिष्ट आहे. तीन राज्यांमधील विजयानंतर आता त्यांनी काँग्रेसला अशा स्थानी आणले आहे की, कोणताही प्रादेशिक पक्ष त्यांच्या नेतृत्वाविषयी शंका घेऊ शकत नाही. २०१९ चा विचार करताना इतर राजकीय पक्षांनी हे ओळखायला हवे की, जशी भाजपाशिवाय ‘एनडीए’ची कल्पना केली जाऊ शकत नाही तशीच काँग्रेसखेरीज ‘यूपीए’सुद्धा अशक्य आहे. पूर्वी राहुलजींच्या मनात ‘एकला चलो रे’च्या राजकारणाची कल्पना होती. पण त्याविषयीच्या वास्तवाचे आता त्यांना भान आले आहे. प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊनच पुढे जावे लागेल, हे राहुलजींना कळून चुकले आहे. म्हणूनच ते प्रादेशिक पक्षांना सन्मानाने वागवतात.

राहुलजींनी काँग्रेसची धुरा पूर्णांशाने सांभाळली व गरजेपुरताच सोनिया गांधींचा सल्ला घेतात हे चांगलेच आहे. राहुलजींच्या कामात सोनिया गांधी सर्वसाधारणपणे हस्तक्षेप करत नाहीत की प्रियंका गांधीही लुडबूड करत नाहीत. राहुलजींची पक्षावरील पकड मजबूत झाली असून त्यांनी गटबाजीलाही चांगलाच आवर घातला आहे. गटबाजी पूर्ण बंद व्हायला अजून वेळ लागेल, पण कोणाही व्यक्ती किंवा गटापेक्षा पक्ष मोठा आहे, हा स्पष्ट संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे. पक्षाच्या इतर नेत्यांना या मर्यादेत राहूनच काम करावे लागेल. २०१९ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्र ही राज्ये ‘गेम चेंजर’ ठरू शकणार असल्याने राहुलजींना त्यांच्यावर खास लक्ष द्यावे लागेल.
सर्वात चांगले म्हणजे राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून पक्षात नवचैतन्य आणण्याचे काम केले आहे. तीन राज्यांच्या विजयानंतरही त्यांनी कार्यकर्त्यांना कोण मुख्यमंत्री व्हावासा वाटतो हे ‘शक्ती अ‍ॅप’वरून जाणून घेतले. राजकीय पक्षांमध्ये ‘हायकमांड’ सबकुछ होत असताना राहुलजींनी हा प्रयोग करावा ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. याने कार्यकर्त्यांनाही आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळून त्यांच्यात उत्साह व ऊर्मीचा संचार झाला आहे. काँग्रेसच्या तंदुरुस्तीसाठी हे होणे नितांत गरजेचेही होते. परंतु मी हेही आवर्जून सांगेन की, या ताज्या विजयाने काँग्रेसने फार आनंदित होऊन चालणार नाही. कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा हातावर हात ठेवून गप्प नक्की बसणार नाही. मिळाले तेवढे यश पुरेसे नाही, याची पक्की खुणगाठ काँग्रेसला ठेवावी लागेल. अजून खूप लढाई बाकी आहे. सन २०१९ चे लक्ष्य गाठण्यासाठी काँग्रेसला राहुलजींच्या नेतृत्वाखाली आणखी घाम गाळावा लागेल.


(लेखक लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आहेत )
 

Web Title: Rahulji's leadership is mature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.