राज्याच्या नेतृत्वात पुन्हा सांगली!
By वसंत भोसले | Published: May 8, 2018 12:09 AM2018-05-08T00:09:38+5:302018-05-08T00:09:38+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाने अनेक योगायोग साधले आहेत. त्या योगायोगाला राजकीय वारसा आणि परंपरेचा मुलामा असला तरी अलीकडच्या काळातील एक यशस्वी राजकारणी म्हणूनच जयंत पाटील यांच्या कारकिर्दीकडे पाहिले पाहिजे.
योगायोगाच्या दोन बाबी आहेत. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या प्रदेश पातळीवर नेतृत्व करण्याची एक प्रतिमा असते. त्यात सांगली जिल्ह्याचा क्रमांक खूप वरचा लागतो. जयंत पाटील यांच्या अगोदर महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच राजकीय संघटनांचे नेतृत्व करणारे दहा नेते या जिल्ह्याने दिले आहेत. त्यामध्ये वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील, प्रा. एन. डी. पाटील, शिवाजीराव देशमुख, संभाजी पवार, आर. आर. पाटील, डॉ. पतंगराव कदम, प्रा. शरद पाटील आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. यांच्या मजबूत पंगतीत आता जयंतराव यांचे नाव नोंदले गेले आहे. पश्चिम महाराष्ट्राचा राज्याच्या राजकारणात नेहमीच दबदबा राहिला आहे आणि त्यामध्ये सांगलीचा वाटा सर्वांत अधिक असतो. त्यामुळे सांगली ही एकप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाची राजधानीच आहे. त्याच जिल्ह्यातून सलग सहावेळा जयंत पाटील विधानसभेवर निवडून गेले आहेत.
दुसरा महत्त्वाचा योगायोग म्हणजे जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील काँग्रेसचे मोठे पुढारी होते. त्यांनी काँग्रेस आणि नंतर जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविले आहे. त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर १९५९ मध्ये निवड झाली. त्याचवर्षी १८ ते २० नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे अधिवेशन पुण्यात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत झाले होते. राजारामबापू पाटील यांच्याप्रमाणेच वसंतदादा पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले होते. गुलाबराव पाटील आणि शिवाजीराव देशमुख हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सांगली जिल्ह्यानेच दिले होते. काँग्रेसशिवाय राष्ट्रवादीतर्फे आर. आर. पाटील, शेकापचे एन. डी. पाटील (सरचिटणीसपद त्या पक्षाचे सर्वोच्च पद), संभाजी पवार आणि प्रा. शरद पाटील (जनता दल) आणि सदाभाऊ खोत (स्वाभिमानी पक्ष) यांनीही प्रदेशाच्या राजकीय क्षितिजावर नेतृत्व केले आहे. या सर्वांच्या राजकीय कार्याचा प्रारंभ सांगली जिल्ह्यातून झाला आहे.
जयंत पाटील यांना मिळालेली संधी एका वेगळ्या राजकीय वळणावर आहे. राष्ट्रवादी आता विरोधी पक्षात आहे. काँग्रेसचे सर्व प्रदेशाध्यक्ष सत्ताधारी पक्षाचे होते. जनता पक्षाचे बापूही सत्ताधारीच होते. जयंत पाटील उच्चशिक्षित आहेत. राजकारणावर उत्तम भाष्य करतात. इस्लामपूर मतदारसंघातून प्रत्येक निवडणुकीत ते किमान ४० ते ५० हजार मताधिक्याने निवडून येतात. राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेल्या सर्व सहकारी उद्योग संस्था आणि शिक्षण संस्थांचा प्रचंड व्याप त्यांनी वाढविला. आपल्या वडिलांचा वारसा सांगून राजकीय बळ द्या, असे आवाहन त्यांनी कधीच केले नाही. बापूंनी स्थापन केलेल्या एका सहकारी साखर कारखान्याची शाखा काढली, शिवाय सांगली जिल्ह्यात पाच सहकारी साखर कारखाने उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राजारामबापू उद्योग समूह साखर कारखान्यांचे गाळप वीस लाख टनांपर्यंत आहे. सतत कामात, प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक भेटण्यात आणि नवनवीन संकल्पना राबविण्यात ते नेहमी आघाडीवर राहिले आहेत. राजकारण करीत असतानाच संस्थात्मक कामही दर्जेदार कसे करावे, याचे उत्तम कौशल्य त्यांच्याकडे आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी सलग पंधरा वर्षे काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला नवी उभारणी देण्यात त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची सांगलीची परंपरा त्यांच्या निवडीने अखंड राहिली आहे.