राजकीय हेतूने संस्कृतचे पुनरुत्थान नको
By admin | Published: December 24, 2014 11:13 PM2014-12-24T23:13:23+5:302014-12-24T23:13:23+5:30
एक काळ असा होता, की जेव्हा मी स्वत:ला विश्वाचा नागरिक समजत होतो. त्यामुळे गवताचे पाते सर्वत्र सारखेच असते, असा माझा समज होता
गुरचरण दास ,राजकीय विश्लेषक
एक काळ असा होता, की जेव्हा मी स्वत:ला विश्वाचा नागरिक समजत होतो. त्यामुळे गवताचे पाते सर्वत्र सारखेच असते, असा माझा समज होता. पण आता मात्र लक्षात आले आहे, की गवताचे प्रत्येक पाते हे वेगळे असते आणि जमिनीपासून जीवनसत्त्वे आणि प्राणशक्ती ते मिळवीत असते. मनुष्य हादेखील आपापल्या भागात रुजलेला असतो आणि तेथून प्राणशक्ती आणि श्रद्धा मिळवीत असतो. आपल्या भूतकाळाचा मागोवा घेताना आपल्या मुलांना जीवन मिळते आणि जीवनातून प्रवास करताना माणसात नवा आत्मविश्वास निर्माण होतो. इतिहासाच्या आठवणी गमावणे हे स्वत्व गमावण्यासारखे असते.
याच श्रद्धेतून मी काही वर्षांपूर्वी संस्कृतचे अध्ययन करण्यास सुरुवात केली. तशीही मला कॉलेज जीवनापासून संस्कृतची माहिती होती; पण या वेळी महाभारत जाणून घेण्याची माझी इच्छा होती. माझा अभ्यास हा धार्मिक किंवा राजकीय हेतूने होणारा नव्हता, तर केवळ साहित्यिक जिज्ञासेतून मी महाभारत अभ्यासायला घेतले होते. पण, ‘प्राचीन भारत हा एक चमत्कार होता’ या भूमिकेतून मला हा अभ्यास करायचा नव्हता. वर्तमानाविषयीची संपूर्ण जाणीव ठेवून मला माझ्या विषयाचा अभ्यास करायचा होता. त्याचे माझ्या जीवनाशी असलेले नाते मला जाणून घ्यायचे होते. त्यासाठी मी अशा एखाद्या शास्त्री किंवा पंडिताच्या शोधात होतो, जो माझा महाभारताशी सुसंवाद साधून देईल. पण, तसे काही झाले नाही. शेवटी मला माझे शिक्षण शिकागो विद्यापीठातील पूर्ण करावे लागले.
भारतात संस्कृतचा अभ्यास करणे हे आत्मा गमावण्यासारखे असते म्हणून मी तो अभ्यास विदेशात करायला सुरुवात केली. आपल्या देशात संस्कृतची अनेक विद्यापीठे आहेत. महाविद्यालयात संस्कृतचे अनेक विभाग आहेत; पण संस्कृतचा अभ्यास केलेले चांगले विद्यार्थी हे संस्कृतचे चांगले शिक्षक होऊ शकत नाहीत. याचे एक कारण मध्यमवर्गाला वाटणारी नोकरीतील असुरक्षितता हे आहे, तर दुसरे कारण संस्कृतचे अध्यापन चौकस बुद्धीने, खुल्या मनाने केले जात नाही. सुप्रसिद्ध जागतिक अभ्यासक शेल्डन पोलॉक यांच्या मते भारतात स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात संस्कृतचे अनेक पंडित होते- ज्यांत एस. एन. दासगुप्ता, एस. के. डे, पां. वा. काणे, एस. राधाकृष्णन, वि. स. सुकथनकर, मैसूर हिरीयण्णा आणि इतरांचा समावेश होता. पण, त्यांच्या पिढीनंतर त्या तोडीचे विचारवंत झाले नाहीत, जे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी लेखन करू शकतील. आता तर शिक्षणाची पंडिती परंपरासुद्धा नष्ट होण्याच्या मार्गाला लागली आहे.
शाळेत संस्कृतच्या शिकवण्यावरून जो वाद सध्या निर्माण झाला आहे, तो मला अपेक्षित नव्हता. शिक्षणाचा हेतू एखादी भाषा शिकणे हा नसतो. माहिती आपल्या मेंदूत भरणे हाही तो नसतो. तर, विचार करण्याच्या आपल्या शक्तीला खतपाणी घालणे, विश्लेषण करणे आणि विषय समजून घेण्याची आपली क्षमता वाढविणे, हा असतो. तसेच, शिकण्याची आवड तरुणांमध्ये निर्माण करणे, हाही असतो. उत्कट भावना असलेली व्यक्तीच आयुष्यात काही तरी साध्य करू शकते आणि आपल्यातील क्षमता जाणून घेऊ शकते. हे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी आपल्याला उत्कटतेने शिक्षण देणारे आणि विषयाच्या तळापर्यंत नेणारे शिक्षक हवे असतात. अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शिक्षण हे पोट भरण्याचे साधन वाटते; पण प्रत्यक्षात ते जीवनाला घडविण्याचे साधन आहे. नंतरचे शिक्षण हे करिअरसाठी असले तरी प्रारंभीचे शिक्षण हे स्वत:चा विचार करून आत्मविश्वास वाढविण्यासाठी, तसेच भविष्याची स्वप्ने पाहण्यासाठी असते. संस्कृतच्या अभ्यासातून आत्मविश्वास व मानवतावादी दृष्टिकोन निर्माण व्हायला हवा. युरोपियन लोक रोम आणि ग्रीसमध्ये आपले मूळ शोधण्यासाठी लॅटीन आणि ग्रीक भाषेचा अभ्यास करीत होते.
‘इकॉनॉमिक्स आणि कॉमर्सच्या शिक्षणामुळे मी माझी जगण्याची क्षमता वाढवू शकत असताना संस्कृतसारखी शिकण्यास कठीण असलेली भाषा शिकण्यात शक्ती का घालवावी?’ असा प्रश्न तरुण विद्यार्थी मला विचारतात, तेव्हा त्यांना वरील उत्तर मी देत असतो. संस्कृतच्या अभ्यासाने माणसाची जगण्याची क्षमता वाढू शकते. पाणिनीच्या संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करून आपण आपल्या दैनंदिन उपयोगाच्या भाषेत उपलब्ध नसलेल्या कल्पनांची रचना चांगल्या प्रकारे मांडू शकतो. पोलॉकच्या मते, ‘संस्कृतचे वाङ्मय आपल्या मानवी जाणिवा खुल्या करून मानव बनण्याचा आणखी एक मार्ग खुला करते.’
संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी लागू केलेले त्रिभाषा सूत्र आपल्या देशात अपयशी ठरले. कारण, भाषाशिक्षक तर निम्न दर्जाचे होतेच; पण तरुणांना आकर्षित करू शकणारा अभ्यासक्रम आपण निर्माण करू शकलो नाही. ‘अमर चित्रकथा’सारखी पौराणिक कथांवर आधारित कॉमिक्स बुक्स आणि संस्कृत भाषेतील टीव्ही कार्टून सिरियल्स (कॅप्शनसह), विद्यार्थ्यांना महाकाव्यांकडे वळवू शकली असती. गोष्ट सांगण्याची फार मोठी परंपरा आपल्या देशात होती.
शाळांतून संस्कृत शिकविण्याची सध्या सुरू असलेली चर्चा ही भाषेची निवड करण्यापुरती मर्यादित आहे. शाळांतून संस्कृतचे शिकणे सक्तीचे करणारे चूक करीत आहेत. आपण अगोदर संस्कृतच्या उत्तम अध्यापनाला प्रोत्साहन द्यायला हवे आणि मगच ते विद्यार्थ्यांच्या गळी उतरवायला हवे. त्रिभाषा सूत्राप्रमाणे शिक्षकांनी संस्कृतच्या चांगल्या अध्यापनाने विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी, विद्यार्थ्यांवर संस्कृत लादू नये. प्रेरणादायी शिकवण देणाऱ्या शिक्षकांच्या वर्गात विद्यार्थी गर्दी करतात, हे लक्षात ठेवायला हवे.
संस्कृतचे समर्थक आणि विरोधक हे अज्ञानी तसेच अतिरेकी असून, त्यांच्या चर्चेत शहाणपणाचा अभाव जाणवतो. आजचे तरुण संस्कृतचा अभ्यास करणे का नाकारतात, याचा ठपका उजवे हिंदुत्ववादी आणि निधार्मिक डावे या दोघांवरच पडतो. उजवे हिंदुत्ववादी हे प्राचीन भारतात प्लॅस्टिक सर्जरीपासून, विमाने, स्टेमसेलचे संशोधन अस्तित्वात असल्याचा दावा करीत असतात आणि त्यामुळे संस्कृतने खरोखर काय साध्य केले त्याविषयीच्या विश्वासाला तडे जातात. वास्तविक, गणितातील दशमान पद्धती प्राचीन भारतानेच दिली. आपल्या देशातील प्राचीन विद्वानांनी जे साहित्य, तत्त्वज्ञान, नाटक, विज्ञान आणि गणित निर्माण केले, ते त्या काळातील खुल्या मानसिकतेतून निर्माण झाले होते या मानसिकतेचा आजच्या हिंदुत्ववादी लोकांमध्ये अभाव आहे. भारताला ‘हिंदुराष्ट्र’ आणि गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणण्याच्या घोषणा दिल्याने लोक त्यापासून दूर जातात. ते भारताची तुलना पाकिस्तानशी करतात, जे मुस्लिम राष्ट्र म्हणूनच जन्माला आले होते.
‘भारतात संस्कृतचे भवितव्य काय?’ याची चर्चा आपण एवढ्यासाठी करायची, कारण त्यामुळे आपल्याला अभिजात प्राचीन वाङ्मय समजून घेऊ न चांगले जीवन जगण्याचे वेगळे मार्ग शोधता येतात. ‘जीवनाचा अर्थ काय?’ या मूलभूत प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी संस्कृत अभिजात साहित्याची मदत होते. इतिहासाचा मागोवा घेतल्याने मनुष्य अधिक समृद्ध व आत्मविश्वासाने परिपूर्ण होतो. गेल्या ३,००० वर्षांचा इतिहास जाणून घेण्याची क्षमता आपण जर गमावून बसलो, तर आपण मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले काही तरी हरवून बसू. संस्कृतचे पुनरुत्थान हे धर्मापासून वेगळे करायला हवे. तो राजकीय प्रकल्प असता कामा नये. तो सर्व विचारी भारतीयांसाठी असावा. संस्कृतचे पुनरुत्थान करण्यावरून निर्माण झालेल्या सध्याच्या वादामुळे भारतातील शिक्षणाचा व अध्यापनाचा दर्जा सुधारला, तर ते चांगलेच आहे. कारण त्यामुळे मानवतावादी प्रश्नांना हात घातल्यासारखे होईल.