‘ट्रम्प’तात्या अन् ‘किम’काका!
By सचिन जवळकोटे | Published: June 14, 2018 12:14 AM2018-06-14T00:14:29+5:302018-06-14T00:14:29+5:30
‘ट्रम्पतात्यां’ची अस्सल मराठी गावरान भाषा गल्लीतल्या बंड्याला खूप आवडायची. त्यासाठी तो रोजच ‘यू-ट्यूब’ पालथं घालायचा. आजही घरी टीव्हीसमोर बसला असता त्याला बातम्यांमध्ये ‘ट्रम्पतात्या’ दिसले. त्यांच्यासोबत ‘किमकाका’ही होते. दोघांचं बराचवेळ चाललेलं ‘शेकहँड’ बघून बंड्याचे डोळे शिणले. हळूच मिटू लागले. तरीही कसंबसं तो त्यांचा संवाद ऐकू लागला.
‘ट्रम्पतात्यां’ची अस्सल मराठी गावरान भाषा गल्लीतल्या बंड्याला खूप आवडायची. त्यासाठी तो रोजच ‘यू-ट्यूब’ पालथं घालायचा. आजही घरी टीव्हीसमोर बसला असता त्याला बातम्यांमध्ये ‘ट्रम्पतात्या’ दिसले. त्यांच्यासोबत ‘किमकाका’ही होते. दोघांचं बराचवेळ चाललेलं ‘शेकहँड’ बघून बंड्याचे डोळे शिणले. हळूच मिटू लागले. तरीही कसंबसं तो त्यांचा संवाद ऐकू लागला.
ट्रम्पतात्या : किम... काय म्हणतेय तब्येत? वजन-बिजन घटलं की नाही ?
किमकाका : घटायला ती काय नरेंद्रभार्इंची लोकप्रियता आहे की काय? पण तुम्ही सिंगापुरात का कडमडलात? तुमच्यामुळं मलाही इथं धडपडत यावं लागलं.
ट्रम्पतात्या : (पिवळे धम्मक दात दाखवत) झेड्पी-पंचायत समितीची मेंबर मंडळी खास अभ्यासासाठी इथंच तडमडत असतील तर मग मी काय घोडं मारलंय?
किमकाका : (चेहरा वाकडा तिकडा करतं) पण तुम्ही मारामारीची भाषा सोडून द्या रावऽऽ तिकडं इंडियातले विरोधक बघा. साप, विंचू, पाल अन् खेकडेही एकत्र आलेत. नांग्या टाकून शेपटी घोळवत बसलेत.
ट्रम्पतात्या : धीस ईज नॉट युवर जॉब काकाऽऽ मराठी माणसं तुम्हाला ‘काका’ म्हणतात, याचा अर्थ प्रत्येक गोष्टीत अनाहूत सल्ला देण्याचा मक्ता नाही मिळालेला.
किमकाका : (चिंताग्रस्त चेहऱ्यानं) हे लक्षात आलंय म्हणूनच काल बीडमध्ये ‘काळजात धस्स’ झालं ना? आता जगाला फुकटचे सल्ले द्यायचं बंद करून आत्मचिंतन सुरू झालंय बारामतीत.
ट्रम्पतात्या : ‘नव्या रक्ताला वाव द्या,’ असा घरगुती सल्ला म्हणूनच काकांनी दिला असावा. आता बारामतीत धाकट्या दादांची पुढची पिढी राजकारणात उतरणार म्हणा की.
किमकाका : तिकडं ‘मातोश्री’वरही ‘धाकटे राजे’ कसं अमितभार्इंना लवून नमस्कार करण्याची डिप्लोमॅटीक खेळी करत होते, तसंच ना? मानलं बुवा ‘उद्धों’ना.
ट्रम्पतात्या : व्हॉट ईज धीस; आपण इथं खºया खुºया बॉम्बची चर्चा करायला आलोय. फुसक्या नळ्यांची नव्हे..
किमकाका : (लगेच विषय बदलत) देवेंद्रपंत फॉरेनला गेल्यापासून चंदुदादांचं ंवजन वाढलंय म्हणे. मात्र, सुभाषबापूंच्या वाड्यावर नुसता धूर सुटलाय. ‘नागपूरचा वारसदार कोल्हापूर.. मग काय करेल रे सोलापूर?’ असा मॅसेजही तिकडं फिरतोय.
ट्रम्पतात्या : आॅँ? सांगलीतल्या मॅटर्निटी आंब्यापेक्षाही जास्त व्हायरल झालाय की काय? मराठी मुलखात असूनही राहुलबाबा काहीच बोलले नाहीत की या विषयावर.
किमकाका : आता नवीन खटल्यात पुन्हा हेलपाटे मारायला नको, असा सल्ला दिला असावा अशोकराव नांदेडकरांनी...
ट्रम्पतात्या : आपण मुद्यावर येऊ. यापुढं तुम्ही रॉकेट सोडायची भाषा करायची नाही अन् मीही बॉम्ब टाकण्याची करणार नाही.
किमकाका : (काळजीनं) मग दिवसभर आपण दोघांनी करायचं तरी काय?
ट्रम्पतात्या : (खोचकपणे) मॉलचा मेसेज फॉरवर्ड करत बसायचा. दहा मेसेज पाठवा. अठराशे रुपये डिस्काऊंट मिळवा.
(एवढ्यात बंड्याला मित्र जागं करतोे.)
मित्र : टीव्ही चालू ठेवून डाराडूर झोपतोस काय ? ऊठ. सिंगापूरच्या ट्रीपसाठी माझ्या मॉम-पॉपनं परवानगी दिलीय. तूपण चल.. ट्रीपच्या नावाखाली मस्तपैकी ‘बँकाँक अन् पटाया एन्जॉय’ करून येऊ.