घराणेशाहीचा सार्वत्रिक फेरविचार गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:25 AM2017-09-14T00:25:04+5:302017-09-14T00:25:49+5:30
काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे तशी ती देशातील सर्वच राजकीय पक्षांत, उद्योगांत, व्यवसायांत, मालमत्तेत आणि कुुटुंब व्यवस्थेतही आहे, ही राहुल गांधी यांनी दिलेली कबुली जेवढी प्रांजळ तेवढीच राजकारणासह देशातील सगळ्या क्षेत्रांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे.
काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे तशी ती देशातील सर्वच राजकीय पक्षांत, उद्योगांत, व्यवसायांत, मालमत्तेत आणि कुुटुंब व्यवस्थेतही आहे, ही राहुल गांधी यांनी दिलेली कबुली जेवढी प्रांजळ तेवढीच राजकारणासह देशातील सगळ्या क्षेत्रांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे. ‘डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर, वकिलाच्या मुलाने वकील आणि उद्योगपतीच्या मुलाने उद्योगपती व्हायचे तर राजकारणी माणसाच्या मुलाने राजकारणी का होऊ नये’ हा प्रश्न एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच विचारला होता. सगळे डॉक्टर्स त्यांची प्रॅक्टिस त्यांच्या हयातीत व नंतर मुलांना देतात. वकिलांचा मार्गही तोच असतो. टाटा, बिर्लांचे, बजाज आणि अंबानींचेही घराणे तसेच चालते. सद््गुरू म्हणविणाºया संतांच्या माघारी अलीकडे तोच प्रकार सुरू झाला आहे. मुलायमसिंगांनंतर अखिलेश, शरद पवारांनंतर सुप्रिया किंवा अजित, लालूप्रसादांनंतर तेजस्वी किंवा मिसा, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्यानंतर माधवराव व वसुंधरा, फारुख अब्दुल्लांनंतर ओमर अब्दुल्ला आणि मुफ्ती मोहंमद सईदनंतर मेहबुबा मुफ्ती हा सारा त्या घराणेशाहीचाच अखंड प्रताप आहे. अगदी संघात सध्या नानासाहेब भागवत, मधुकरराव भागवत आणि मोहन भागवत किंवा मा.गो. वैद्यांनंतर मनमोहन वैद्य ही सुरू झालेली वाटचालही त्याच धर्तीवरची आहे. अगदी जिल्हा व गाव पातळीवरही पुढारीपणाचे नंतरचे वारसदार असे निश्चित झाले आहेत. ठाकरेंनंतर उद्धव व नंतर आदित्य किंवा दत्ता मेघेंनंतर सागर किंवा समीर. जिल्ह्याजिल्ह्यात व गावागावात हा प्रकार दाखविता यावा असा आहे. घराण्यांना लाभलेली लोकप्रियता व अनुभव नंतरच्या पिढ्यांच्या वाट्याला येत असल्यामुळे हे बहुदा होते तसेच ते पुत्रप्रेम व अंधश्रद्धा यातूनही होत असते. अॅरिस्टॉटलच्या मते व्यक्तीने मिळविलेली संपत्ती व लोकप्रियता हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतो. ते सारे आपल्या पुढील पिढ्यांच्या वाट्याला यावे असेच त्यातल्या प्रत्येकालाही वाटते. सबब, घराणेशाही अखंड सुरू राहते. या प्रकाराला छेद देण्याचा पहिला प्रयत्न गांधीजींनी केला. घाम गाळील त्याला दाम आणि श्रम करील त्याला वेतन हा आपला विचार तार्किक शेवटापर्यंत नेत ते म्हणाले, या हिशेबाने बापाची संपत्ती मुलाच्या वाट्याला येऊ नये. प्रत्येक पिढीने आपली उपजीविका आपल्या श्रमावर प्राप्त केली पाहिजे. एकाच पिढीत सारी विषमता घालवण्याचा व आर्थिक समता प्रस्थापित करण्याचा गांधीजींचा तो क्रांतिकारी विचार प्रत्यक्ष गांधीवाद्यांनाच परवडणारा नव्हता. तो काँग्रेसला व देशाला परवडला नसेल तर त्याचे त्यामुळे आश्चर्य करण्याचेही कारण नाही. राहुल गांधींनी या वास्तवाची प्रथम कबुली दिली असेल तर त्यांचे कौतुक व अभिनंदनच साºयांनी केले पाहिजे. घराणेशाहीचा हा विळखा प्रामाणिक व होतकरू तरुणांना राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवणारा आहे आणि त्यामुळे लोकशाहीला एक साचेबंद स्वरूप येऊन तिचा कार्यभाग कालबाह्य व कालविसंगत होण्याचा धोका आहे. या प्रकारातील दुसरा दोष हा की या घराणेशाहीचा लाभ मिळविलेल्यांना ‘आपल्याला दुसरे कोणी प्रतिस्पर्धी नसल्याचा साक्षात्कार फार लवकर होतो व त्यामुळे आपल्याला सुधारणेची वा ज्ञानवृद्धीची फारशी गरज राहत नाही असेही वाटत असते.’ परिणामी ३० वर्षांपूर्वी होती तेवढीच ही माणसे शहाणी वा मठ्ठ राहतात. काळ बदलला तरी ती बदलत नाहीत आणि कालबाह्य झाली तरी बाजूला सरत नाहीत. या ठोकळेबाजीतून निर्माण होणारी यंत्रणा मग वाद आणि संवाद असे सारेच विसरते. मग ती कुणाच्या सूचना ऐकत नाही, कुणाचे शहाणपण ऐकून घेत नाही आणि चांगल्या उपदेशांची अवहेलना करायलाही मागेपुढे पाहत नाही. काँग्रेस पक्षातील संवाद डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसºया राजवटीच्या अखेरीस संपला व त्यामुळेच त्याला नंतरचे वाईट दिवस आले ही गोष्ट राहुल गांधींनी आपल्या या भाषणात सांगितली. संघटना, राजकारण आणि पक्ष यांचे स्वरूप नेहमी प्रवाही असले पाहिजे. ते काळासोबत विकसित होत वाढत गेले पाहिजे आणि त्याने नव्या पिढ्यांना त्यांच्या आकांक्षांसह सोबत घेतले पाहिजे. संस्थापकांच्या मनातले जुने विचार व जुन्या संकल्पना यावर विश्वास ठेवायला आणि त्यानुसारच पुढे जायला सांगणाºयांच्या संघटना भक्ती परंपरेच्या होतात. त्यांना राजकारणात स्थान उरत नाही. शिवाय घराणेशाही वा गुरूशाही या संस्था आतून बंद असतात. आपल्या संघटनेच्या म्हणजे ती चालविणाºयांच्या विचारावाचून वेगळे काही खरे वा चांगले असू शकत नाही. आपल्या श्रद्धा याच जगाच्या अंतिम कल्याणाच्या दिशा आहेत, अशी मानसिकता त्या घडवीत असतात. त्यामुळे पक्ष वा संघटना काळानुरूप बदलत नाहीत. १९२५ चा संघ, ३५ चा संघ, ५५ चा, ७५ चा व आताचा यांचा विचार यासंदर्भात तपासून पाहण्यासारखा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही ज्यांची मने व विचारसरणी अजूनही स्वातंत्र्यपूर्व काळातील संदर्भातच अडकलेल्या आहेत त्यांचीही नावे यासंदर्भात सांगता येतील. मार्क्स जगाने टाकला तरी भारतात मार्क्सवादी असतात आणि समाजवाद कालबाह्य झाला तरी आपल्या येथे समाजवादी आहेत. या साºयांना राहुल गांधींच्या आताच्या वक्तव्याने आपला फेरविचार करायला लावावा एवढेच.