अभूतपूर्व जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 01:34 AM2017-08-13T01:34:39+5:302017-08-13T01:35:32+5:30
मुंबईच्या ऐतिहासिक गवालीया टँक म्हणजे आजच्या आॅगस्ट क्रांती मैदानात ९ आॅगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाअधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देणारा ‘चले जाव, छोडो भारत’ ठराव झाला.
- उल्हास पवार
मुंबईच्या ऐतिहासिक गवालीया टँक म्हणजे आजच्या आॅगस्ट क्रांती मैदानात ९ आॅगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाअधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देणारा ‘चले जाव, छोडो भारत’ ठराव झाला आणि संपूर्ण भारत देश इंग्रजी सत्तेविरुद्ध पेटून उठला. या घटनेला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली. एक सामान्य अशक्त प्रकृतीचा, परंतु सशक्त मनाचे महात्मा गांधी ‘करो या मरो’चा नारा देतात आणि लक्षावधी लोक कशाची तमा न बाळगता, सत्याग्रहात सक्रिय सामील होतात, ही जगातील अभूतपूर्व घटना.
या आंदोलनात ४0 लाखांपेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली. शेवटी जागा पुरल्या नाहीत, म्हणून अटक करणे ब्रिटिशांनी थांबविले. ती त्यांची अवस्था झाली. इंग्रज हादरून गेले आणि स्वराज्याची पहाट जवळ आली. इतिहासाची ही पाने चाळताना मन आणि ऊरही भरून येतो. अक्षरश: हजारो माणसांचे बलिदान झाले. असंख्य लोक भूमिगत झाले. गावागावांत क्रांतीची मशाल फिरू लागली. इन्कलाब जिंदाबाद, आझाद हिंद जिंदाबाद, राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय, भारत माता की जय या घोषणांनी भारत दुमदुमून गेला. हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई, दलित आदी सर्व जातींचे धर्माचे आपली सर्व मतभेद विसरून, एका तिरंगा झेंडा खाली एका दिलाने उभे राहिले आणि सत्याग्रहाच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने कुठलीही हिंसक घटना न होता झालेले जगातील एकमेव आंदोलन केले गेले.
अर्थात, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली १८८५ पासून देशातील अभूतपूर्व ऐक्याचे दर्शन अनेक घटनांमधून भारताने पाहिले आहे. विशेषत: लोकमान्य टिळक, डॉ. गोपालकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, फिरोजशा मेहता, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल आणि १९१५ला राष्ट्रपिता महात्मा गांधी आफ्रिकेतून आले आणि स्वातंत्र्य आंदोलनाची चळवळ अधिक प्रभावी होत गेली. पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. त्या संघर्षातील टप्पा म्हणजे ९ आॅगस्ट १९४२ अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात झालेला ‘चले जाव’ प्रस्ताव. या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता, अधिवेशनाच्या पूर्व तयारीला सेवाग्राम वर्धा या ठिकाणी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत या ठरावाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी म. गांधींनी मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद या तिघांवर जबाबदारी सोपविली. तिघांनाही आपापल्या परीने प्रस्ताव तयार केले. वर्किंग कमिटीत सादर केले. विशेष म्हणजे, या तिघांनी आपल्यापेक्षा दुसºयाने प्रस्ताव किती चांगला आहे ते सांगितले आणि तिघांच्याही प्रस्तावातून मुद्दे एकत्र करून, ८ आॅगस्ट १९४२ गवाली टँकवर मध्यरात्री १२ वाजल्यानंतर हा प्रस्ताव प्रचंड जयघोषामध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. रात्री १२ नंतर बराच वेळ चर्चा झाली. त्यामुळे ९ आॅगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो.
लोकशाही, अहिंसा आणि सत्याग्रह या तीन शब्दांचा क्रियाशील अर्थ सर्व दुनियेने पाहिला. त्यागाची परिसीमा म्हणजे काय, याचे दर्शन जगाला झाले. त्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करीत असताना, त्या क्रांती मैदानाच्या भूमीला वंदन करीत असताना, आज आम्ही कुठे आहोत? लोकशाही, समता, बंधू भाव, सर्वधर्म समभाव, सहिष्णुता, ऐक्य, देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व या शब्दांचे अर्थ, आशय याची बूज राखली जाते का? कायदा व सुव्यवस्था आबाधित आहे काय? या शंका मनाला वेदना देतात. या हुतात्म्यांना वंदन करताना आमची मान लाजेने झुकावी, अशा अनेक दुर्दैवी घटना देशात घडत आहेत. आपण शपथ घेतली पाहिजे की, ज्या स्वातंत्र्यासाठी, ज्या स्वराज्यासाठी, सुराज्यासाठी आपण त्याग केला, त्या मूल्यांसाठी आम्ही कटिबद्ध राहू. देशातील असे एकही गाव शिल्लक नव्हते, जिथे हे आंदोलन पोहोचले नाही. असा हा ऐतिहासिक क्रांती दिन. (लेखक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.)