शरद जोशी नसताना...

By admin | Published: January 5, 2016 12:05 AM2016-01-05T00:05:31+5:302016-01-05T00:05:31+5:30

शेतकऱ्यांच्या दु:खाशी एकरूप होण्यासाठी शरद जोशी शेतकरी झाले. त्यासाठी या शेतकरी योद्ध्याने स्वत:चा संसार स्वत:च्या हातानी मोडला. उबळ आली किंवा उमाळा दाटून आला

Without Sharad Joshi ... | शरद जोशी नसताना...

शरद जोशी नसताना...

Next

शेतकऱ्यांच्या दु:खाशी एकरूप होण्यासाठी शरद जोशी शेतकरी झाले. त्यासाठी या शेतकरी योद्ध्याने स्वत:चा संसार स्वत:च्या हातानी मोडला. उबळ आली किंवा उमाळा दाटून आला म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा उभारला नाही. शेतकरी विधवांना ‘एकरकमी’ मदत करायची, डोळ्यात पाणी आणायचे, अश्रूंचे आणि भावनात्मक संवादाचे फाऊंडेशन उभारायचे. एकदा हा भर ओसरला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपल्या मायावी जगात मग्न व्हायचे, अशी नाटके शरद जोशींना कधी जमली नाहीत. नंतर शेतकरी संघटनेची अनेक शकले झाली. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी सुरु झालेली ही लढाई केवळ वाटाघाटींच्या चौकटीत बंदिस्त होत गेली. राजकारण्यांच्या जाळ्यात जोशी अलगद सापडले. त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे चळवळीचेच नुकसान झाले. पण त्यांच्या त्यागाबद्दल कुणी शंका घेतली नाही. आज ते नसताना त्यांच्यानंतर शेतकऱ्यांच्या चळवळीचे काय, या प्रश्नाने विदर्भातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
शरद जोशींनी शेतकरी संघटना स्थापन केली, तोवर बहुतांश राजकीय पक्ष शेतकऱ्यांना कस्पटासमान वागवायचे. उद्योगांसाठी भांडवल उभारणी करायची असेल तर शेतमालाच्या किमती सातत्याने खालच्या पातळीवर स्थिर ठेवणे हेच सरकारचे धोरण होते. अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या दु:खाचे मूळ समजावून सांगण्यासाठी जोशींनी जीवाचे रान केले. या चळवळीचा झंझावात एवढा की, १९८० पूर्वी लाल किल्ल्यावरून भाषण देताना शेतकऱ्यांबद्दल चकार शब्द न काढणारे पंतप्रधान शेतकऱ्यांबद्दल बोलू लागले. ही किमया जोशींच्या आंदोलनाची होती. आंदोलनकर्त्यांची ताकद तरी केवढी? दिसायला अगदीच मरतुकडा, पोट खपाटी गेलेला, पिढ्यानपिढ्यांपासून गांजलेला, उभे राहण्याचेही त्राण नसलेला... जोशी सांगायचे, ‘‘तुम्ही काहीच करु नका, फक्त हातावर हात बांधून बांधावर बसून राहा, ‘आम्ही आमच्यापुरते पेरू, आम्हीच खाऊ, तुम्हाला देणार नाही,’ असे ताठर होऊन तेवढे सांगा.’’ राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याचा हा अहिंसक मार्ग गांधींच्या अधिक जवळ जाणारा होता. या आंदोलनाच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनासोबतच त्यांना लोकशिक्षणही घडवायचे होते. म्हणूनच शेतकऱ्यांच्या मागणीला त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईशी जोडले. जातीधर्मात विभागलेले राजकारण अर्थकारणाच्या दिशेने नेण्याचा क्रांतिकारक प्रयत्न जोशींनी केला. तो त्यांच्या हयातीत यशस्वी होऊ शकला नाही. पण भविष्यातील राजकारण त्यावरच केंद्रित राहणार आहे.
भारत आणि इंडिया यांच्यातील विसंगती शरद जोशींनीच पहिल्यांदा समोर आणली. कोट्यवधींचे कर्ज बुडविणारा मद्यसम्राट निर्लज्जपणे पार्ट्यांमध्ये मिरवतो. फुटपाथवर झोपलेल्या गरिबांना चिरडणारा दिवटा नट पंतप्रधानांसोबत पतंग उडवितो, हे इंडियाचे दृश्य आणि बँकेचे दहा हजाराचे कर्ज फेडू न शकणारा विदर्भातील शेतकरी बायको-पोरांसह जहर खाऊन मृत्यूला कवटाळतो, हे भारताचे विदारक वास्तव! ते काल होते, आज आहे, कदाचित उद्याही राहील. त्यांची लढाई यासाठीच होती. पुढच्या काळात तिचा वणवा होईल, पण त्यावेळी हा लढवय्या नेता नसेल. शरद जोशींनतर शेतकऱ्यांच्या चळवळीची धुरा समर्थपणे पुढे नेऊ शकणारा कुणी नेता अवतीभवती दिसत नाही. शेतकऱ्यांची आंदोलने ट्रेड युनियनच्या धर्तीवर, प्रादेशिक मागण्यांवर आधारित पुढे नेणाऱ्या शेतकरी नेत्यांचा हा काळ आहे. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई आता मागण्यांची झाली आहे. अशावेळी नेत्यांपुढे आश्वासनांचे तुकडे फेकून चळवळी मोडीत काढणे राज्यकर्त्यांना सोपे जाते. खासदारकी किंवा महामंडळांचा लाल दिवा बहाल केला की ‘शेतकरी नेते’ म्हणून त्यांना आपले अस्तित्वही टिकवून ठेवता येते. पुढच्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या मतांचा लिलाव करणारे असे पायलीचे पन्नास नेते येतील. त्यावेळीही शेतकऱ्यांना शरद जोशींची पदोपदी उणीव जाणवेल ती अशी...
- गजानन जानभोर

Web Title: Without Sharad Joshi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.