दिलखुलास संदीप कुलकर्णी
By Admin | Published: October 8, 2016 01:29 AM2016-10-08T01:29:26+5:302016-10-08T01:47:45+5:30
‘डोंबिवली फास्ट’फेम अभिनेता संदीप कुलकर्णीने विविध सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून रसिकांचे मनोरंजन केले
‘डोंबिवली फास्ट’फेम अभिनेता संदीप कुलकर्णीने विविध सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून रसिकांचे मनोरंजन केले आहे. डोंबिवली फास्ट या सिनेमासोबतच त्याने छोटा पडदाही गाजवला. आता जवळपास ७ वर्षांनंतर अनवरत थिएटर्स प्रस्तुत ‘नीलकंठी’ या हिंदी नाटकाच्या निमित्ताने तो रंगभूमीवर परततो आहे. याचनिमित्ताने संदीप कुलकर्णीशी साधलेला संवाद.
च् कोणताही नवा सिनेमा, मालिका आणि नाटक म्हटलं, की त्याची चर्चा होतेच. आपल्या नव्या नाटकाचीही चर्चा सुरू झालीय. मात्र, सगळ्यात जास्त चर्चा आहे ती तुझ्या लूकची, तर हा लूक आणि या नाटकाविषयी काय सांगशील?
ल्ल नीलकंठी या नाटकातील भूमिका म्हणजे एका कॉमन मॅनचे प्रतीक आहे. ती भूमिका म्हणजे भगवान शंकराचेही प्रतीक आहे. या नाटकात ताकद, राजकारण आणि सामाजिक आशय अशा तिन्ही गोष्टींचा मेळ जुळून आला आहे. प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार यांच्या एका मंचित न झालेल्या ‘एक कंठ विषपायी’ या नाटकावर आधारित हे नाटक आहे. या नाटकाचा आत्मा तोच असला, तरी ते वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. पुरातन काळात आणि देवलोकात जे घडत होते, ते आजही घडते आहे. एखाद्या अन्यायकारक गोष्टीने देव जागा झाला, तर तांडव होते. जे डोंबिवली फास्टमध्ये झाले. तसाच शिव आहे, जे कॉमन मॅनचे प्रतीक आहे. या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना आसाममधील ‘तांगठा’ फॉर्म बघण्याची संधी मिळणार आहे. या फॉर्ममध्ये मार्शल आर्ट आणि लोकनृत्याची झलक अनुभवता येईल. माझ्यासाठी हा प्रकार पूर्णपणे नवा आहे. दुसरी गोष्ट, तरुण पिढी नाटकाकडे वळत नसल्याचे ऐकायला मिळते; मात्र नीलकंठी हे नाटक या सगळ्या गोष्टींना अपवाद आहे. या नाटकात तरुण-तरुणींची संख्या जास्त आहे, हे खूप सुखद आहे. दर वेळी तेच-तेच कलाकार असण्यापेक्षा काही वेगळे कलाकार असणे गरजेचे असते. ते या नाटकात दिसून आले. त्यामुळे हे नाटक मी स्वीकारले. या नाटकातील तरुण कलाकारांचा उत्साह, त्यांचे थिएटरबद्दल असलेले प्रेम आणि मतं सारं काही वाखाणण्यासारखं आहे. त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळा उत्साह आणि ऊर्जा मिळते.
च् हिंदी नाटकानंतर तू मराठी नाटकात कधी येणार?
ल्ल मराठी नाटकासाठी चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहतो आहे. सध्या काही मित्रांकडून स्क्रिप्ट आल्या आहेत. विजय केंकरेंचं एक नाटक आहे. त्याविषयी बोलणी सुरू आहेत. ते एक खूप वेगळे नाटक आहे. मला नेहमीच वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारायला आवडतात, त्याच पद्धतीचे ते नाटक आहे. मात्र, काही व्यावसायिक गोष्टींमुळे ते नाटक रखडले आहे.
च् हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये तसेच नाटक, सिनेमा, मालिका या विविध माध्यमांमध्ये तू काम केले आहेस. यापैकी तुला भावलेलं माध्यम कोणतं?
ल्ल सिनेमा हे माझं आवडतं माध्यम आहे. कारण ते सर्वाधिक रसिकांपर्यंत पोहोचतं. तेच नाटकाच्या बाबतीत सांगू शकत नाही. कारण नाटकाचा एक विशिष्ट रसिकवर्ग असतो. तेच रसिक नाटक पाहण्यासाठी येतात; मात्र सिनेमा आणि मालिकांचं तसं नाही. या दोन्ही माध्यमांमधून अगदी शेवटच्या स्तरापर्यंतच्या रसिकांपर्यंत पोहोचता येतं. थोडक्यात सांगायचं झालं, तर ‘गुंतता हृदय’ ही मालिका पाहून अनेकांना वाटतं की, असं अफेअर करावं. भाषिक माध्यमाविषयी म्हणायचं झालं, तर मराठीत रसिकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र, हिंदीला जास्त आॅडियन्स आहे. कारण देशभर ही भाषा बोलली जाते. सत्यदेव दुबेंकडे थिएटर करीत असताना तिन्ही माध्यमांमध्ये नाटकं केली. त्यामुळे वेगवेगळ्या रसिकांपर्यंत पोहोचता आले. त्यांच्यासोबतचा वावर वाढतो.
च् सिनेमामध्ये तुझे आगामी प्रोजेक्ट कोणते आहेत?
ल्ल सध्या ‘सत्यशोधक’ नावाचा सिनेमा करीत आहे. हा सिनेमा महात्मा जोतिबा फुले यांच्यावर आधारित असून, त्यात जोतिबा फुले यांची भूमिका साकारतो आहे. हा सिनेमा पावसामुळे रखडला आहे. एकदा का पाऊस थांबला, की याचं शूटिंग सुरू होईल. याशिवाय, आगामी काळात एखादा विनोदी सिनेमा किंवा नाटक करायची इच्छा आहे. बासू चॅटर्जींसारखे सिनेमे करण्याची इच्छा आहे. तसंच एखादा ‘गैर’ या मराठी सिनेमासारखा थ्रिलर अॅक्शन सिनेमा आगामी काळात करायला आवडेल.
च् तू छोट्या पडद्यावरसुद्धा झळकणार आहेस. तर त्याविषयी काय सांगशील?
ल्ल छोट्या पडद्यावर ‘पीडब्ल्यूओ’ म्हणजेच प्रिझनर्स आॅफ वॉर नावाची सिरीज करतो आहे. निखिल अडवाणीची ही मालिका असून ‘२४’ या सिरीजप्रमाणे या मालिकेतही मोठमोठे कलाकार आहेत. ही मालिका जवळपास ६ ते ८ महिने चालेल. सध्या डिजिटलवरील कन्टेंट तरुणाईला आवडते आहे; त्यामुळे आगामी काळात छोट्या पडद्यावरही सीझनवाईज कन्टेंट रसिकांना आवडेल.
‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमाच्या सिक्वेलच्या चर्चा सुरू होत्या.. त्याविषयी काय सांगाल?
ल्ल ‘डोंबिवली रिटर्न’ नावाचा नवा सिनेमा येतो आहे. हा सिक्वेल नसून हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत हा सिनेमा असेल. डोंबिवली फास्ट या सिनेमाप्रमाणेच या सिनेमाची कथाही डोंबिवलीतल्या एका कॉमन माणसाची असून, ती डोंबिवलीतच घडते. विशेष म्हणजे, यात गाणी आहेत आणि ही गाणी या सिनेमाच्या कथेला अनुसरून आहेत. हा सिनेमा पूर्णपणे तयार आहे; मात्र या वर्षी रीलीज करायचा की पुढल्या वर्षी, याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत.